आज आपण अशा एका व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देणार आहोत की ज्यांनी मुंबईच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गोष्टींच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. अशी ही महान व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, म्हणजेच नाना शंकर शेठ. आधुनिक मुंबईचे शिल्पकार. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे ६५ व्या वर्षापर्यंत मुंबईच्या जडणघडणीत त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. या महिना अखेरीस , म्हणजे, 31 जुलै 2021 ला त्यांचा 156 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमिताने हा त्यांच्या योगदानाचा उहापोह !
दैवज्ञ कुटुंबात जन्मलेल्या नानांनी त्यांच्या पूर्वजांप्रमाणेच व्यापार केला. एक अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी म्हणून त्याची सर्वत्र ख्याती पसरली. अरब, अफगाण आणि इतर परदेशी व्यापारी’ त्यावेळी आपली मालमत्ता बँकेत न ठेवता नानांच्या हवाली करत असत. परदेशी व्यापाऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास होता. १७९९ च्या म्हैसूरचा टिपू सुलतान – इंग्रज यांच्या लढाईत त्यांच्या वडिलांना अमाप पैसा मिळाला होता. तो पैसा व स्वतःचा व्यापारातील पैसा त्यांनी मुंबईच्या विकासासाठी वापरला.
त्यांची शरीरयष्टी धिप्पाड आणि रुबाबदार होती. राजबिंडी चर्या, डोक्यावर पगडी, पांढरे स्वच्छ धोतर, सफेद अंगरखा आणि खांद्यावर जरीबुट्टीचे उपरणे, हातात पुस्तक. असा पेहराव, पण बोलणे अगदी मृदू आणि लाघवी. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.
आजही दक्षिण-मुंबई दिमाखाने उभ्या असलेल्या आणि कोट्यावधी विद्यार्थ्यांना, जनतेला आपल्या आकांक्षा पूर्ण करता येतील अशा संस्थांच्या पायाभरणीत, स्थापनेत, त्यांचा जमशेदजी बाटलीवाला यांच्या बरोबरीने सक्रिय सहभाग होता. एल्फिस्टन कॉलेज, मेडिकल कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज, जे. जे. स्कुल ऑफ आर्टस्, निधी विद्यालय, वास्तुसंग्रहालय, मुलींसाठी कन्या शाळा आणि तसेच महत्वाचे म्हणजे ‘मुंबई विद्यापीठ’ यांच्या सारख्या मुंबईचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या संस्था. मुंबई शहरातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबरच इतर सोयींसाठी, मुंबईसाठी ‘स्वतंत्र म्युनिसिपल आयोग’ नेमला. पुढे त्याचे ‘BMC , ‘मुंबई महानगरपालिकेत’ रूपांतर झाले. आज मुंबई महापालिकेचा भव्य- दिव्य’ डोलारा दिसतो आहे, त्याचे रोपटे नानांनी लावले होते.
शैक्षणिक सुधारणांप्रमाणेच विहिरी, आरोग्य तलाव योजना’, गॅस कंपनी, प्रेक्षागृह, सोनापूर स्मशानभूमीचे रक्षण, धर्मार्थ दवाखाने, यांच्या स्थापनेचे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. आशिया खंडातील पहिली ‘मुंबई- ठाणे’ रेल्वे, १६ एप्रिल १८५३ साली धावली, त्याच्यामागे होते नानांचे अथक परिश्रम! त्यामुळेच त्यांना, ‘भारतीय रेल्वेचे जनक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. CST च्या प्रवेशद्वारासमोरील त्यांचा पुतळा याचीच साक्ष देतो.
गिरगाव तर त्यांची कर्मभूमी. त्यांचे महान कार्य जाणून, ‘ग्रँट रोड’ येथील चौकाला ‘नाना चौक’ असे संबोधले जाते. त्यांचा येथील पुतळा आजही लक्ष वेधून घेतो. त्यांनी शेकडो संस्थांना देणग्या दिल्या. त्याचप्रमाणे विविध पदे भूषविली. त्यांच्या स्मरणार्थ ‘एस.एस.सी. ला’ संस्कृत विषयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यास अथवा विद्यार्थिनीस ‘जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप’ आजही दिली जाते. त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’, ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’, ‘मुंबईचे शिल्पकार’ असे संबोधिले जाते.
पण…. ज्या ‘नाना शंकरशेठ’ यांनी ‘मरीन लाईन्स पासून मलबारहिल’ पर्यंत सारा समुद्र किनारा असलेली, त्यांच्या मालकीची, शेकडो एकर जमीन मुंबईच्या कल्याणासाठी दिली, त्यांच्या स्मारकाला दक्षिण मुंबईत, गिरगावात, जागा मिळत नाही याचा दोष कोणा-कोणाला’ द्यायचा? त्यांच्या १५० व्या स्मृतिदिनाची सांगता 31 जुलै २०१५ रोजी, ‘वडाळा’ येथे फक्त छोटे स्मारक उभारून व्हावी, यासारखा दैव – दुर्विलास कोणता ?
आणि आता ३१ जुलै २०२१ रोजी त्यांचा १५६ वा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने जगन्नाथ शंकरशेठ यांच्या महत- कार्याकडे लक्ष देऊन त्यांचे ‘भव्य- दिव्य’ लोकोपयोगी ‘स्मारक’ उभारण्यासाठी नव्याने पुढाकार कोणी घेईल का ?
मी व्यवसायाने आणि अंर्तमनाने एक शिक्षिका. माझी शाळा ‘गावदेवी’ येथे असल्यामुळे ‘ग्रॅन्टरोड’ रेल्वे स्थानकावर उतरून ‘नाना चौकातूनच’ शाळेत जावे लागत असे. साहजिकच त्यांच्या पुतळ्याचे दर्शन दररोज घडत असे आणि ‘नानांकडे’ पाहून आमची मन त्यांच्यापुढे आदराने नतमस्तक होत असे. सेवानिवृत्त होऊन इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही प्रत्येक जुलै महिन्यात त्यांच्या स्मृतिदिनी त्यांची आठवण येतेच येते आणि म्हणावेसे वाटते.–
“दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती”.
जन्म- १० फेब्रुवारी १८०३
मृत्यू- ३१ जुलै १८६५
— वासंती गोखले
Leave a Reply