दिवेलागण झाली,देवळाम्होरची गर्दी वाढली.आमोस्या असल्यामुळं तेलवात घालाय-नारेळ फोडाय मान्सं येत हुते.पोरं शिवणापाणी तर पोरीव्हा ‘माय मला पुरी जाय त्या घरी’ खेळत व्हत्या.मधीच डाव सोडून शिर्णी वाटणा-याच्या पुडी हात करणा-यायचा गराडा पडत व्हता.मतारी मान्सं वट्यावर बसून गप्पात रंगली व्हती.काई पोरी आपल्या ल्हान भयन भावाला काखत घेऊन अंगोरा लाईत फिरत व्हत्या.बळजबरीनं मुंडकं टेकून लेकरायला पाया पडायला लावीत व्हत्या. पाराम्होरून येलायच्या बैलगाड्या जात व्हत्या.भयमुगाच्या शेंगासटी लोंबकळणारे पोरं दाताड काढत हीऽही करुन चार शेंगात आभाळभर आनंद मिळाल्यावाणी हुंदडत व्हती.
समद्या पोरायमदी संभ्या लयंच अज्यात पोरगा व्हता.लांबवर गाडीला लोंबकळत संभ्यानं चांगल्या मूठभर शेंगा खिशात भरल्या.तान भूक विसरुन ईल त्या गाडीत चढून शेंगा गोळा करु लागला.तवडयात संभ्याच्या आजीनं संभ्याला धरुन वडीत घ्राकडं जेवाय न्हेलं.घरी आल्यावर खिसा रिकामा केला,अर्धा किलो शोंगायचा ढिगोल लागला.हारात होरपळून देलेल्या शेंगा संभ्यानं गट्टम केल्या.पैलं उन्हाळ्यात आजी शेंगायला जात व्हती तवा उतरंडीची शेंग हाटली नव्हती.मातर या चार-पाच वर्सात आजीला शेतंचं काम व्हयीना गेल्तं मंग कसल्या शेंगा न कसंच काय ? इतं रोजच्या भाकरीला तेल हाय तर मीट न्हाय अशी गत व्हती.
आई-बापाचं छत्र ल्हानपणीच हरवलेला संभ्या आजी जवळच-हात व्हता.आजीनं निंदन-खुरपण करुन आई-बापाईना पोर संभाळलं काई मंता काही कमी पडू द्येलं न्हायी.आजी संभ्याचे लाड करायची,जीव लावायची परीक आता तिचाच जीव गळून गेल्ता.तीला संभ्याची काळजी वाटत हुती.आधीच थकलेला जीव पुन्हा पोराच्या घोरानं अजूनच गळाला व्हता.आपलं काय आता अर्ध्या गौ-या मसनात गेल्या मातर पोर अजून ल्हान हाये त्येच्यासाठी तरी जगावं लागल ! त्येचं कसं व्हाईल वाटायचं? आजीचा म्हतारपणीचा आधार मंजी संभ्याच व्हता.संभ्यामदी तर तिचा जीव आडकल्ता न्हायतर आजीसंगच्या स-या मता-या केवळाबाय,पारुबाय, वरी जाऊन जमाना झाल्ता.
संभ्या म्हणायचा,”आज्येव म्या मोटं झाल्यावर तुला लय सुखात ठुईन बघ!”
तर आजी म्हणायची,”तू मोटा होस्तोर मी वाचल व्हयं रं लबाडा?”असं म्हणीतंच तिला जगण्याचं बळ मिळत व्हतं.खंबीरहुन संभ्याचा आधार झालेल्या आजीलाबी संभ्याचाच आधार व्हता,दुसरं व्हतंच कोण तैला ?
संभ्या साळंत शिकायला हुशार व्हता, घरची गरीबी वह्या-पुस्कतं न्हाई मून तक्रार न्हायी,कायन्हाय.आजी लोकायचं दळण-कांडण करुन कसंतरी पोटाला घालत व्हती.तवडयातच संभ्या खूस व्हता.संभ्या सातवीला आल्ता मातर अजून आधार काल्ड नव्हतं.साळंत मास्तरानं तगादा लावला व्हता तालुक्याला जाऊन आधार काढून आणा परीक आजीला सुधरना अन् संभ्याला कळंना म्हणून रायलं व्हतं.गुरजीनं बकळबा-या सांगूनसुदीक गरीबीनं संभ्याचं आधार कार्ड काढायचं राह्यल्तं.दोघ्ं एकमेंकायला आधार देत व्हते परीक आधारच्या यादीत संभ्या निराधार व्हता.
इतक्यात “फूsफू फूरकन्” पारावरच्या मायकातून आवाज आला,
“ऐका हो ऐका उद्या शाळंतल्या लेकराव्हायचे आधार कार्ड वाले येणार हायेत तरी उद्या ज्यैच्या लेकरायचे आधार काल्ड काढायचेत तैनं धा वाजता शाळंत हाजर रवावं हो”
हे ऐकून आजीच्या अंगातलं बळ आजून वाढलं.दोघंबी आमोस्येच्या अंधाराकडं बघत सकाळची आधाराची सपनं फाहू लागले.
डॉ. संतोष सेलूकर,परभणी
मो.नं- 7709515110
Leave a Reply