जागतिक बुद्धिबळदिनाच्या निमित्ताने बुद्धिबळ पटू, प्रशिक्षक रोहित पवार यांनी घेलेला आढावा.
बुद्धिबळाला खेळ म्हणून समाजात प्रतिष्ठेचे स्थान आहे. २० जुलै १९२४ साली फिडे या इंटरनॅशनल बुद्धिबळ फेडरेशन ची स्थापना झाली. या मुळे २० जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो.
जेव्हा जेव्हा माणसासमोर महामारी किव्वा अन्य बिकट संकटांनी हल्ला केला, तेव्हा तेव्हा खेळांनी त्याला मानसिक स्वास्थ्य राखण्यात मदत केली. इतिहास उघडून पहिला तर त्याची अनेक उदाहरणे मिळतील. त्याचप्रमाणे बुद्धिबळ यंदाच्या २०२० च्या महामारीतही लोकांच्या मनाचे स्वास्थ्य सुधारण्यात मदत करतो आहे. विशेष म्हणजे कोरोना च्या साथीमुळे जेव्हा बाकीच्या खेळांचे प्रमाण कमी झालेले आहे तेव्हा बुद्धिबळाचे प्रमाण अनेकपटीने वाढलेले आहे.
बुद्धीबळामुळे एकाग्रता, धोरणात्मक विचारसरणी, नियोजनक्षमता अशा कौशल्यांचा विकास होतो या गुणांबरोबर बुद्धीबळामुळे खेळाडू म्हणून येणारा आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती निश्चितच जीवनात यशस्वी होण्यात महत्वाचा वाटा उचलतात.
आजच्या जागतिक बुद्धिबळदिनी हे मला निश्चित सांगू वाटते कि, बुद्धिबळाचे समीकरण गेल्या काही दशकात खूपच बदललेले आहे. एक काळ असा होता कि क्रीडाक्षेत्र म्हणलं कि मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त क्रिकेटच दिसायचं. टीव्हीवर दिसणारे क्रिकेटचे सामने, वर्तमानपत्रात येणाऱ्या खेळाडूंच्या बातम्या यामुळे जरी ती उत्सुकता असली तरी इतर खेळांबाबत असलेल्या अनुक्सुतलेला मुखत्वे माहितीचा-प्रशिक्षणाचा-वातावरणाचा अभाव जबाबदार होता.
सध्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून बुद्धिबळाचा प्रसार जोमाने होताना दिसतो. सध्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने सर्वाधिक खेळला जाणारा खेळ बुद्धिबळच असेल यात शंका वाटत नाही. इतकी लोकप्रियता या खेळाला का मिळाली असेल याचा विचार केला तर असे लक्षात येईल कि, बुद्धिबळ हा सर्वांना परवडण्याजोगा आणि सामावून घेणारा, कुठेही खेळाला जाऊ शकणारा आणि वय, लिंग, भाषा, सामाजिक दर्जा आणि शारीरिक क्षमता याचे बंधन नसलेला अद्वितीय खेळ आहे.
सध्याची आपल्या देशातील बुद्धिबळाची प्रगती पाहता सांगताना आनंद होतो कि, आजतागायत भारतामधे ग्रँड मास्टरच्या संख्येमधे झपाट्याने वाढ होत आहे. बुद्धिबळ खेळणाऱ्या मुलांच्या तुलनेत मुलींचीही संख्या काही कमी नाही, आपला ठसा उमटवण्यात त्यांनीही कोणती कसर ठेवलेली नाही. भारता मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फक्त खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक आणि पंचही निर्माण झाले आहेत. रॅपीड, ब्लिट्झ, क्लासिकल अशा स्पर्धेच्या सर्वच प्रकारात आज खेळाडू नाव कमावत आहेत. सरावासाठी आज बऱ्याच च प्रशिक्षण अकॅडेमी, वेबसाईटस, कॉम्पुटर सॉफटवेअर्स, ई-बुक्स उपलब्ध आहेत आणि त्यांचा खेळाडू पुरेपूर लाभ घेत आहेत.
बुद्धिबळाची उपयुक्तता लक्षात घेता काहीं देशामध्ये बुद्धिबळ शैक्षणिक अभ्यासक्रमात रुजू केल्याने तसेच शैक्षणिक क्षेत्रात बुद्धिबळाचा फायदा विचारात घेता दिले जाणारे क्रीडा गुण यामुळे बुद्धिबळास वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.
सध्या अनेक लहान मुलांसोबत त्यांचे पालक सुद्धा ऑनलाईन बुद्धिबळ प्रशिक्षण घेत आहेत. तर बरेच महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा बुद्धिबळ शिकण्यात रुची दाखवीत आहेत. हे चित्र मनाला वेगळ्याच प्रकारचा दिलासा देणारे आहे. आज काही उत्साही बुद्धिबळप्रेमी फक्त खेळ म्हणूनच नाही तर करिअर म्हणून त्याकडे गंभीरपणे बघताना दिसतात. बुद्धिबळ या खेळामधे करिअर करण्याची कल्पना जरी आपल्या देशात पचायला अवघड असली तरी सृजन आणि दर्जेदार क्रीडासंस्कृती उभारणीसाठी असे शिलेदार जरुरीचे आहेत.
बुद्धीबळाचे सर्व फायदे लक्षात घेता यावर्षीच्या कठीण काळात जागतिक बुद्धिबळ दिनाला युनेस्को आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचेही विशेष समर्थन मिळाले आहे.
चला तर घरबसल्या बुद्धिबळाचा आनंद घेत हा बुद्धिबळ दिन साजरा करू.
— रोहित पवार
बुद्धिबळ पटू, मुख्य प्रशिक्षक आर.चेस. वर्ल्ड
Leave a Reply