२१ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील तसेच जगातील अनेक देशांमधील विविध समूहांच्या मातृभाषांचे जतन, संवर्धन करणाऱ्या विविध संस्था, जागतिक मातृभाषा दिवस साजरा करतात ! सर्व दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संस्था हा दिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा करतात.
हा जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्याची प्रथा कशी पडली त्याचा इतिहासही रंजक आहे.
पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांग्ला देश) भागात पाकिस्तानची उर्दू ही राष्ट्रभाषा लादण्याच्या अविचाराविरूद्ध आंदोलन सुरू झाले ! हे आंदोलन खूप भडकले तेव्हा आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी ढाक्का विद्यापीठात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पाकिस्तानी लष्कराने २१ फेब्रुवारी १९५२ या दिवशी गोळीबार केला. पूर्व पाकिस्तानात उर्दू लादू नये आणि सर्व शासकीय कारभार बंगालीतच असावा या जनतेच्या मागणीला उन्मत्त सत्तेने गोळीबाराने उत्तर दिले !
२१ फेब्रुवारी हा दिवस बांग्ला भाषेसाठीच्या तीव्र आंदोलनाचा प्रेरणा दिवस ठरला. १९५३ पासून दरवर्षी बांग्ला भाषेच्या आग्रहासाठी २१ फेब्रुवारी हा दिवस पूर्व पाकिस्तानात भाषाग्रह दिवस म्हणून साजरा होऊ लागला. पाकिस्तानचे केंद्र सरकार उर्दूचा हट्ट सोडत नाही आणि बांग्ला भाषेची जास्तच गळचेपी होतेय हे लक्षात आल्यावर या भाषाग्रहाचे रूपांतर पुढे ” पाकिस्तानच नको, स्वतंत्र देशच हवा ” या मागणीत झाले !
बांग्ला भाषाग्रहामुळे देश स्वतंत्र झाला याच भावनेतून बांग्ला भाषकांनी आपल्या नव्या देशाचे नाव बांग्ला देश ठेवले. जगात बहुतेक देशांच्या नावावरून त्या देशातील सर्वाधिक प्रचलित भाषेचे नाव ठरले आहे पण बांग्ला देशाचे एकमेव उदाहरण असे आहे की येथील प्रमुख भाषेचे नावच त्या देशाला दिले गेले आहे !
काही वर्षांनी बांग्ला देशाला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाल्यानंतर १९८२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ अधिवेशनात बांग्ला देशाच्या प्रतिनिधीचे पहिले भाषण झाले. त्यात या प्रतिनिधीने बांग्ला देशाच्या वतीने मागणी केली की, मातृभाषेच्या संरक्षण, संवर्धनासाठी दिलेल्या लढ्यातून निर्माण झालेला बांग्ला देश हा जगातील पहिला देश आहे. बांग्ला देशातील या यशस्वी भाषाग्रही लढ्याचा प्रेरणा दिवस २१ फेब्रुवारी आहे. आणि म्हणून संपूर्ण जगाने बांग्ला देशाचा हा प्रेरणा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा करावा.
ही मागणी संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ मध्ये मान्य केली आणि २१ फेब्रुवारी १९९२ पासून जगातील सर्व देशात दरवर्षी २१ फेब्रुवारी हा दिवस ‘ जागतिक मातृभाषा दिवस ‘ म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.
— निनाद अरविंद प्रधान
mahatv purn mahiti,dhanyawad