जगावे कसे पक्ष्यासारखे,
आभाळी स्वैर उडणारे,
ध्येय आपुले दिसताच,
पुन्हा जमिनीवर उतरणारे,–!!!
जगावे कसे केवड्यासारखे,
धुंद, मोहक वशीकरणाने,
समोरच्याला ताब्यात घेणारे,–!!!
जगावे कसे कापरासारखे,
स्वत:स अर्पण करुन,
ज्वलनही सोसणारे,–
ओवाळून ओवाळून ,
त्यात आनंदें संपणारे,–!!!
जगावे कसे चित्त्यासारखे,
संकटाच्या थेट भेटीस जाणारे,
निडरतेने दबा धरुन,
ताकदीने हल्ला करणारे,–!!!
जगावे कसे “अत्तरासारखे*,
स्वत: सुगंधित बंदिस्त राहून,
दुसऱ्याला दरवळून टाकणारे,–!!!
जगावे कसे उसासारखे,
स्वत: उन फार सोसून,
दुसऱ्यास ‘जीवनरस’ पाजणारे,–!!
जगावे कसे झऱ्यासारखे,
स्वत: शीतल राहून,
थेंबाथेंबाचे मोती,
एखाद्यावर सहज लुटणारे,–!!!
जगावे कसे फुलासारखे,
आयुष्य कमी असूनही,
ते दुसऱ्यास अर्पिणारे,–!!!
जगावे कसे चंदनासारखे,
उगाळले कुणी किती,
तरी त्याला सुगंधाने भारणारे,–!!!
जगावे कसे झाडासारखे,
दगड सोसून फळे देणारे,
जगावे कसे सिंहासारखे,
पारध्यालाही घाबरवणारे,–!!!
जगावे कसे माणसासारखे,
माणूस म्हणुनी माणसास जपणारे,
जगावे कसे प्रेमासारखे,
सर्वोच्च असूनही,
त्यागात धन्यता मानणारे,–!!!
हिमगौरी कर्वे
Leave a Reply