(अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची जुनी प्रथा. आता सासूने आपल्या सुनेला वाण देऊन तिच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या तर)
अधिकाचे फळ अधिकच लाभते
अशा कथा ऐकते
तीसतीन ह्या वर्ष दिनाला
अभिनंदन करते ।
पोटी न आलीस
तुझ्या आईने भरली माझी ओटी
देवाजीने तुला नर्मिले
केवळ आमच्यासाठी ।
घरात आलीस घरची झालीस
दूधात साखर पडली
दुध कोठले साखर कुठली
अवघी गोडी उरली ।
किती करिशी तू आमची सेवा
होऊ कशी उतराई
ह्या वास्तूतील वस्तू वस्तू
तुझे गोडवे गाई ।
गृहलक्ष्मी तू स्थान तुझे ग
घरच्या देव्हार्यात
दुर्गा होऊन झुंजून
करसी संकटावरी मात ।
जगावेगळे असे कसे हे
सासूसुनेचे नाते
दृष्ट लागो तुझ्यावरोनी
शब्दफुले उतरते ।
Leave a Reply