वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता ‘मानवते तु विधवा झालीस’ सुचली. त्यांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला. १९५६ मध्ये आकाशवाणीवर खेबुडकर यांचे पहिलेच गीत ऐकून नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी चित्रपटातील पहिले गीत लिहिण्याची संधी दिली. सांगली येथे सन १९६० साली ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटासाठी लावणी लिहिण्याची संधी दिली. आयुष्यातील पहिली लावणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारून अस्सल कोल्हापुरी नजराणाच खेबुडकर यांच्या लेखणीतून प्रकट झाला.
‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ या पहिल्याच लावणीच्या ठसक्याने मराठी गीतरसिकांना वेड लावले. ‘सामना’, ‘पिंजरा’, ‘साधी माणसं’ अशा सुमारे साडेतीनशे चित्रपटांसाठी जगदीश खेबुडकर यांनी तब्बल अडीच हजारांवर गाणी लिहिली. यांत ‘तुम्हावर केली मर्जी मी बहाल’, ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’ अशा एकाहून एक सरस लावण्यांबरोबर ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, ‘मला हे दत्तगुरू दिसले’ यांसारखी भक्तिगीते, तर ‘राजा ललकारी अशी दे’, ‘ही कशानं धुंदी आली’, ‘धुंदी कळ्यांना’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘बाई बाई… मनमोराचा’, ‘आकाशी झेप घेरे पाखरा’ अशा सर्वांगसुंदर गाण्यांचा समावेश आहे.
आजवर कोणत्याही मराठी गीतकाराने खेबुडकर यांच्याइतके काव्यप्रकार वापरले नाहीत. गण-गवळण, लावणी, भारुड, गोंधळ, सवाल-जवाब, बालगीत, प्रेमगीत, स्फूर्तिगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, मुक्तछंद, अभंग अशा मराठीत यच्चयावत काव्यप्रकारांत खेबुडकरांनी आपल्या शब्दसामर्थ्याने असामान्य गीते लिहिली. या काव्यसांभाराला तब्बल ४८ संगीतकारांचे संगीत मिळाले आणि ३६ गायक आणि ३६ गायिकांनी ही गीते सुमधुर बनवली. व्ही. शांताराम, पेंढारकर, दादा कोंडके, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके अशा दिग्गजांबरोबर जगदीश खेबुडकर यांनी काम केले. कमल हसन यांच्या ‘हे राम’ चित्रपटासाठी खेबुडकर यांनी गीते ही लिहिली होती.
‘काशीला श्रावण बाळ निघाला…’, ‘आज मरूनीया जीव झाला मोकळा…’, ‘जग ही पैशाची किमया…’, ‘नको नको बनू आंधळा…’, ‘आमुचा जीवन प्याला….’, ‘जागा हो माणसा…’, ‘दिला मृगानं हुंदका…’ अशा असंख्य कविता त्यांनी रचल्या. त्यांच्या कवितांना इतका बहर होता की, ते दिवसाला १० ते ११ कविता लिहू लागले होते. मा. जगदीश खेबूडकर यांना राज्य शासनाचे अकरा, ‘रसरंग फाळके’, चित्रपट महामंडळाचे दोन, ‘गदिमा जीवनगौरव’, ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’, ‘कोल्हापूरभूषण’, ‘मृत्युंजय’, ‘सुरसिंगार संसद’, पुणे फेस्टिव्हल, ‘छत्रपती शाहू पुरस्कार’, ‘करवीरभूषण’, ‘साहित्य पुरस्कार’, ‘मार्मिक गौरवचिन्ह’, ‘लावणीरत्न’, ‘नटराज’, केंद्र शासन, ‘कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार’, ‘यशवंतराव चव्हाण साहित्यगौरव’ असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. जगदीश खेबूडकर यांचे ३ मे २०११रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply