नवीन लेखन...

जगण्याला प्रयोजन हवे

एक मोठे ध्येय डोळ्यासमोर होते. त्या ध्येयाने मला जिवंत ठेवले. त्या ध्येयाने मला तेथील छळ सोसायला बळ दिले. ज्याला जीवनाचे ध्येय मिळाले आहे, तो कोणतेही आघात सोसू शकतो, कोणतीही संकटे झेलू शकतो आणि कोणतेही दिव्य पार करू शकतो. फक्त मनुष्याला ध्येय हवे. जगण्याला प्रयोजन हवे.

नाझींच्या छळ छावणीत राहिलेला, अतोनात छळ सोसून सुद्धा त्यातून वाचलेला एक psychiatrist hmoVm Viktor E Franke. नंतर त्यांनी छळ छावणीतील दिवस कसे काढले, आजूबाजूच्या लोकांना कसा धीर दिला ह्याबद्दल पुस्तक लिहिले. Man’s Search for meaning ह्या पुस्तकात ते म्हणतात – मला छावणीतून सुटल्यावर, काय काम करायचे आहे, याचे एक मोठे ध्येय डोळ्यासमोर होते. त्या ध्येयाने मला जिवंत ठेवले. त्या ध्येयाने मला तेथील छळ सोसायला बळ दिले. ज्याला जीवनाचे ध्येय मिळाले आहे, तो कोणतेही आघात सोसू शकतो, कोणतीही संकटे झेलू शकतो आणि कोणतेही दिव्य पार करू शकतो. फक्त मनुष्याला ध्येय हवे. जगण्याला प्रयोजन हवे.

कित्येक जण असे असतात की ज्यांना ध्येय नसते. आयुष्यालाच काय, दिवसाला सुद्धा काही उद्देश नसतो. अंथरुणातून उठताना, सकाळी का उठायचे? उठून काय करायचे असा प्रश्न असतो. मनात येईल तेव्हा उठायचे. मनात येईल तेव्हा अंघोळ. वाटलं तर काम करायचं. वाटल तर फिरायला जायचं. नाहीतर घरात टीव्ही समोर बसून राहायचं. नेटवर तास अन् तास घालवायचे. अशा हेतुरहित असण्याचा परिणाम मनावर होतोच आणि शरीरावर पण होतो. कुणाला आपला उपयोग नाही, कुणाला आपली गरज नाही ह्या विचाराने आपले जगणे निरर्थक वाटते. आणि त्यातून शारीरिक व मानसिक व्याधी जडतात.

अमेरिकास्थित डॉ. अतुल गावंडे Being Mortal ह्या पुस्तकात एका वृद्धाश्रमातील प्रयोगाबद्दल लिहिले आहे. तेथील एकेकटे जीव उदास होते. चैतन्य नाही, आनंद नाही. मृत्यू येत नाही म्हणून जगत होते. एक एक दिवस काढत होते. एक प्रयोग म्हणून तेथील प्रत्येक वृद्धाच्या खोलीत एक कुत्रा, मांजर, पोपट, मासे किंवा झाडे लावली. त्यांच्यावर ह्या जिवांची देखभाल करण्याची जबाबदारी टाकली. त्यांना एक व्यवधान मिळाले …कुत्र्याला फिरायला न्यायचे आहे. मांजराला खाऊ घालायचे आहे. पक्ष्यांचा पिंजरा स्वच्छ करायचा आहे, झाडांना पाणी घालायचे आहे. इत्यादी दिवसाच्या वेळेशी बांधणारी कामे त्यांच्या मागे लागली. आपण पाणी घातले नाही, खाऊ घातले नाही तर तो जीव उपाशी राहील असे लक्षात आले. आपल्यावर एक जीव अवलंबून आहे… त्याच्यासाठी आपल्याला जगायचे आहे असे वाटू लागले. ह्या जाणिवेने त्यांना एक प्रयोजन दिले. त्यांचे जग बदलले. आणि त्याचा परिणाम त्यांच्या आनंदी असण्यातच नाही तर तब्येतीवर पण दिसून आला.

आधुनिक पाश्चात्त्य विज्ञानाने जे सांगितले आहे ते प्राचीन ऋषींनी पाहिले, जाणले असणार. त्यामुळे जीवनाला ध्येय हवे ह्या तत्त्वावर आधारित अनेक हिंदू परंपरा त्यांनी निर्माण केल्या. त्या पैकी काही परंपरा पाहू –

सणवार – संपूर्ण वर्षभर ओळीने एकापाठोपाठ एक सण लावून दिले आहेत. गणपती आले की – सजावट करायची आहे, रोजच्या रोज पूजा-आरती-नैवेद्य करायचा आहे. नवरात्रीत काही नेम केलेला पूर्ण करायचा आहे. दिवाळी आली की आकाशकंदील लावायचा, फराळ करायचा, सोयर्यांना भेटायला जायचे, आप्तांना फराळाला बोलावाचे … किती धांदल उडते! ही सगळी वर्षभर लावून दिलेले ध्येय आहेत. केवळ सणांचे नाही तर प्रत्येक वारासाठी ध्येय दिले आहे – सोमवारी शंकराच्या मंदिरात जायचे आहे, मंगळवारी उपास आहे, बुधवारी आणखी काही … हे कमी पडू नये म्हणून प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष, दोन एकादशी, दोन चतुर्थी, अमावास्या, पौर्णिमा, संक्रांत ह्यांचे काही नेम नियम सांगितले आहेत. किती हवे तितके हेतू आपापल्या इच्छेने, आपापल्या रुचीने, आपापल्या बुद्धीने प्रत्येक दिवसाला लावता येतील अशी व्यवस्था सणावारांनी करून दिली आहे. घ्या! हवे तितके हेतू घ्या. सकाळी उत्साहाने उठायचे प्रयोजन घ्या!

चार पुरुषार्थ – मानवी जगण्याला दिलेले चार अर्थ, ध्येय दिले आहेत – धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पहिल्या ध्येयाने प्रत्येकाला आपापल्या जबाबदार्या सांभाळायच्या आहेत. पितृधर्म, पुत्रधर्म, मातृधर्म निभवायचा आहे. दुसरे ध्येय आहे अर्थार्जन. धन, धेनु व धान्य मिळवणे, पैशांचा व्यय करणे, गुंतवणे आणि दान देणे. तिसरे ध्येय आहे इच्छापूर्ती. सर्व प्रकारच्या कामनांची पूर्ती. शरीरसुख उपभोगणे, चांगले कपडे,  दागिने परिधान करणे, घर घेणे, बंगला बांधणे, दवाखाना काढणे, विहीर खणणे, तलाव बांधणे इत्यादी. आणि अंतिम ध्येय आहे मोक्ष. मिळवणे. जितक्या प्रेमाने जगायचे आहे, तितकेच सहजपणे, कशातही न अडकता सगळे सोडून जाणे.

आश्रम व्यवस्था – आयुष्याच्या टप्प्यानुसार विविध ध्येय सांगितली आहेत ते चार आश्रम म्हणजे जिथे श्रम करावे लागतात, जिथे आश्रय मिळतो तो आश्रम. जिथे मनुष्य नेहमीसाठी नाही, तर काही काळासाठी निवास करतो, तो आश्रम. जीवनात असे चार आश्रम आहेत – ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम हे सर्वांसाठी आहेत. संन्यासाश्रम मात्र ज्यांना हवा केवळ त्यांच्यासाठी. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काय अपेक्षित आहे ते ह्या आश्रमात सांगितले आहे.

ब्रह्मचर्याश्रम – उपनयन संस्कारानंतर ब्रह्मचर्याश्रमास सुरुवात होते. त्यानंतर विद्याध्ययन हा एकच उद्देश असतो. गुरुसेवा, अध्ययन, संयम, विवेक, सहनशीलता, विचारक्षमता इ. गुण आत्मसात करावयाचे असतात. विद्यार्जन संपल्यानंतर जेव्हा जमेल तेंव्हा गुरुदक्षिणा द्यायची असते.

गृहस्थाश्रम – विवाह-संस्कारानंतर गृहस्थाश्रमास सुरुवात होते. या आश्रमाचा कालखंड सर्वात मोठा आहे. गृहस्थाश्रमात व्यक्तीला वैषयिक सुखांचा आनंद उपभोगता येतो. त्याचबरोबर कुटुंबाविषयीची व समाजाविषयीची कर्तव्ये पार पाडावयाची असतात. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ व संन्यास आश्रमातील सर्वजण ह्या आश्रमातील लोकांवर अवलंबून असतात. प्रत्येकावर असलेले ऋण केवळ ह्याच आश्रमात फेडता येते. ती तीन ऋण आहेत – ऋषिऋण, देवऋण आणि पितृऋण. ते फेडण्यासाठी पाच यज्ञ सांगितले आहेत.

ब्रह्मयज्ञ – आपल्याला जे शिक्षण मिळाले ते ऋषींचे ऋण आहे. त्याचे उपकार फेडण्यासाठी रोज ब्रह्मयज्ञ करायचा. म्हणजे आणखी शिकायचे, अभ्यास करायचा आणि कुणाला शिकवायचे. ते जमत नसेल तर एखाद्या वेदपाठशाळेला दान द्यायचे.

देवयज्ञ – देवऋण म्हणजे आपल्याला निसर्गाकडून, निसर्गाच्या देवतांकडून जे मिळाले आहे त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करायचे आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, नदी, अरण्य, वृक्ष इत्यादींच्या साठी रोज काहीतरी करायचे आहे. झाडे लावा, पाणी घाला, नदी स्वच्छतेसाठी काही करा, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काही करा.

पितृयज्ञ हा पितरांचे ऋण फेडायला. घरातील वडिलधार्यांची काळजी वाहणे आणि आणि उत्तम संतान निर्माण करणे.

मनुष्ययज्ञ म्हणजे आपल्यावर असलेल्या समाजाच्या ऋणाचे स्मरण ठेवून समाजातील गरजू व सत्पात्री व्यक्तीला मदत करणे.

भूतयज्ञ म्हणजे आपल्यावरील पशूंच्या ऋणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. आपल्या भोवतीच्या पशु-पक्ष्यांची देखभाल करणे.

गृहस्थाश्रमात करावयाचे वरील पंचमहायज्ञ प्रत्येक गृहस्थ व गृहिणीला जगण्यासाठी एक ध्येय देतात. आपापल्या शक्ती व मतिनुसार आपण ते लहान वा मोठ्या प्रमाणात करू शकतो.

वानप्रस्थाश्रम – Retired जीवन. आता आध्यात्मिक चिंतनासाठी वेळ द्यायचा आहे. संचय करायचा नाही. अर्थार्जन करायचे नाही. कमी बोलायचे. विचारले तर सांगायचे, शिकवायचे.

संन्यासाश्रम – संन्यास घेऊन, घरदार, कुटुंब, गाव सोडून मोक्ष मिळवण्यासाठी व समाजाच्या हितासाठी झिजायचे.

सणवार, आश्रमव्यवस्था, पुरुषार्थ हे सगळे उद्देश कुणाला उपलब्ध आहेत? तर ज्यांचा आपल्या परंपरांवर विश्वास आहे, आपल्या प्राचीन ऋषींवर श्रद्धा आहे आणि गुरु परंपरेवर निष्ठा आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांना मनापासून असे वाटते की आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या व्यवस्था आपल्या हिताच्या आहेत, त्यांच्यासाठी हा खजाना खुला आहे.

जे अश्रद्ध आहेत, ज्यांचा स्वत:च्या पूर्वजांवर विश्वास नाही, अगदी आपल्या आईवडिलांनी जरी काही सांगितले तरी त्याबद्दल संशय घेतात, गुरुवाक्यावर निष्ठा नसते.  त्यांना ह्या व्यवस्था उपलब्ध असूनही त्याचा फायदा नाही. जीवनाचे प्रयोजन शोधण्यात त्यांचे आयुष्य संपून जाते. ते शोधण्यासाठी त्यांना दारोदार भटकावे लागते. कुणाला मानसोपचार तज्ञांकडे, कुणाला Anti-depresion च्या गोळ्या आणायला औषधाच्या दुकानात जावे लागते. लाखात एखाद्याला आयुष्याचे ध्येय नाझी छळ छावणीत सुद्धा गवसेल. क्वचित कुणा वृद्धाश्रमातील वृद्धाला आयुष्याच्या शेवटी एखाद्या जीवाची सेवा करण्याचे ध्येय मिळेल. तर कुणा नारायणाला बालपणातच विश्वाची चिंता करण्याचे महान ध्येय मिळेल.

पण सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यात अशा घटना घडतील, अथवा असे चिंतन घडेल याची शक्यता जवळ जवळ शून्य. म्हणून आपले वाडवडील वा आपल्या धर्मातील श्रेष्ठ जन ज्या वाटेने गेले त्या वाटेने चालणे आपल्यासाठी इष्ट आहे. असे केल्याने आपल्याला विनासायास, आपोआप, रोजच्या रोज एक ध्येय मिळेल. आपल्या जगण्याला प्रयोजन प्राप्त होईल आणि जीवन सुंदर होईल!

–दीपाली पाटवदकर

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..