ज्या पोह्यांच्या साक्षीने लग्नगाठी जुळतात, त्या पोह्यांना आपल्या खाद्यसंस्कृतीत विशेष स्थान आहे. सकाळचा नाश्ता पोह्यांशिवाय अधुरा आहे. म्हणूनच पोहेप्रेमी दरवर्षी ७ जून हा ‘विश्व पोहे दिवस’ म्हणून साजरा करतात. आज पोहे खाऊन, खिलवून आणि पोह्याची महती सांगून जगभरात हा दिवस उत्साहात साजरा करतात. पहिला जागतिक पोहे दिवस ७ जून २०१५ रोजी साजरा झाला. त्याचा नेमका प्रणेता कोण आहे हे सांगता येणार नाही. मात्र मॅगीच्या गुणवत्तेवरून वाद सुरू असताना नेमके ट्विटरवर गमतीने कुणी तरी पोहे दिवसाची संकल्पना मांडली आणि पोहेप्रेमींनी ती फार उचलून धरली. पोहे दिनाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.
ट्विटरवर तर जागतिक पोहे दिवस हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये राहिला. पोहे महाराष्ट्रात जितके लोकप्रिय तितकेच देशभरातही आहेत. प्रांत कोणताही असो… कांदे पोहे असो वा बटाटे पोहे दडपे पोहे…करण्याची पद्धत भिन्न असली तरी जिभेचे चोचले पुरवण्याची चव मात्र बदलत नाही.
पोहे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कोकणात विशेषत: भात पिकतं तिथे तर हातसडीचे पोहे, पटणीचे पोहे असे पोह्याचे अनेक प्रकार मिळतात.’दगडी पोहे, पातळ पोहे, जाड पोहे सुगंधी तांदळाचे सुगंधी पोहे तयार होतात. ’दगडी पोहे’ पोहे हे कांदेपोहेच असायला हवेत असं काही नाही. बटाट्याच्या काचऱ्या ही पोह्यात सुरेख लागतात. पण मग पोह्यात ‘ती’ गंमत येत नाही. वांगीपोहे मात्र कमी आवडीचे. तेलात नीट खरपूस तळलं गेलेलं वांगं पोह्यासोबत असं काही जमून येतं की ज्याचं नाव ते. मटारच्या मोसमात मटार घातलेले पोहे त्याच्या रंगामुळे साजरे दिसतात. एक वेळ कांदा नसेल, तर कोबी घालून पोहे करून बघा, छान लागतात. बटाटे-पोहे करत असताना भरपूर खोबऱ्याचा वापर केला तरी पोहे मऊ राहून ते खाता येतील याची खात्री नसते. मात्र पोहे करताना कांदा वापरला तर पोह्याचा ओलावा धरून राहतो, पोह्याची चव वाढते. कांदा-पोहे किंवा बटाटे-पोहे हा पदार्थ मुलीला उत्तम स्वयंपाक येतो हे दाखविण्यासाठी केले जातात असे दिसते, परंतु कांदा-बटाट्याशिवाय पोहे करायचे असले तर पोहे करणाऱ्याचे खरे स्वयंपाककौशल्य लक्षात येते. फोडणीच्या पोह्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर इटालियन लोकांना पास्ता तसे आपल्याला कांदे पोहे. पोहे ही एक टेम्पलेट आहे, कशीही सजवा. मस्त दिसते आणि लागते. बटाटे, कोबी, वांगी, दोडकी, घोसाळी ही प्रत्येक भाजी घालून होणारे फोडणीचे पोहेही चवीच्या बाबतीत स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व राखून आहेत. सुकी मिरची आणि लसणीची फोडणी घालूनही पोहे उत्तम होतात, पोहे भिजवून, त्यात हिंग, आलं, ओली मिरची, हळद, ओवा घालून बेसनाचं पीठ वापरून भजीही छान होतात, हे पोहा पॅटिस हा एक प्रकार अफलातून. मीठ-मिरचीचे पोहे करून, त्यात भाजलेले शेंगदाणे, आलं, कोथिंबीर, साखर घालून त्याचं सारण बनवायचं. उकडलेल्या बटाट्यांचा लगदा करून त्याची पारी करून त्यात हे सारण घालून तळलं, की पोहा पॅटिस तयार. . इंदोरला गेलात तर तिथले पोहे जरुर खावे. फ़ोडणीच्या पोह्यांसारखे दिसतात, पण असतात इंदोरी गोड…बढ़िया म्हणत आनंद घ्यावा. आणि नागपुरचे पोहे तर..? वर अशी झणझणीत तर्री….! अहाहा…मिसळीच्या बऱ्याच जवळ जाणारा हा पदार्थ आहे. नागपुरी झणझणीत पोह्याच्या प्रकारापेक्षा अगदी उलट म्हणजे गोडाचे पोहे. नारळाच्या वा साध्या दुधातले दूध गूळ पोहे पण गोडभक्तांना खूप आवडतात.
बेबीफूड म्हणून पोह्यांचा उपयोग करता येतो…. जाडे पोहे थोड्या तुपावर भाजायचे आणि त्याची पूड करायची. मग रोज थोडी पूड गरम दुधात घालायची. हवी तर साखर घालायची. छान लागते शिवाय पौष्टिक आहे. पोहे प्रेमीना जागतिक पोहे दिनाच्या शुभेच्छा.
संकलन : संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply