नवीन लेखन...

जाहल्या काही चुका… एक रसग्रहण

या स्वर्गीय गीताचा आनंद घेता घेता खालील रसग्रहण वाचा..एक अनाकलनीय अनुभूती येते..केवळ अप्रतिम..

“अशीच गेली हयात सारी
कथा असे हीच जीवनाची
करायचे ते कधी न जमले
नको नको ते करून झाले

हसून झाले रडून झाले
भलेबुरे ओळखून झाले
आता निघू दया मला सुखाने
बरेच माझे जगून झाले ”

आयुष्याच्या उत्तरार्धात सगळीच माणसं आपापल्या परीनं आपल्या आयुष्याचा हिशेब मांडत असतात.

खरंच आपण काय कमावलं ? आणि काय गमावलं ? याचा ताळेबंद मांडतात, आणि तो सादर करतात विधात्यासमोर…

आणि नेमकी हीच काहीशी भावना मंगेश पाडगावकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून एका काव्यात अवतरली.

जाहल्या काही चुका
अन्‌ सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे
आवडीने गायिले

पाडगांवकरांनी आयुष्यालाच गीता ची उपमा दिलीय.
ते म्हणतात की हे आयुष्य गीत गाताना किंवा सादर करताना, हे ईश्वरा माझ्या काही चुका झाल्या, काही सूर राहून गेले पण तरी देखील तू हे दिलेलं आयुष्य (गीत) मी आवडीने जगलो (गायलो).

पहिल्या अंतऱ्यात ते म्हणतात…

चांदण्यांच्या मोहराने
रात्र केव्हा दाटली
काजळी काळ्या ढगांनी
हाक केव्हा घातली
मी स्वरांच्या लोचनांनी
विश्व सारे पाहिले

आयुष्यात चांदण्यांची रात्र म्हणजे सुख आणि काजळी काळ्या ढगांची हाक म्हणजे दुःख, हे दोन्ही अनुभवले आणि तू दिलेल्या गीताच्या स्वरातून (आयुष्याच्या माध्यमातून) मी सगळं जग पाहिलं (अनुभवलं).

दुसऱ्या अंतऱ्यात पाडगांवकर लिहितात…

सौख्य माझे, दु:ख माझे
सर्व माझ्या भावना
मोर स्वप्नांचे निळे अन्‌
विंधणाऱ्या वेदना
मी असे गीतांतुनी
सर्वस्व माझे वाहिले

मी भोगलेली सारी सुखं आणि दुःख, बघितलेली सुंदर स्वप्न आणि ठसठसणाऱ्या वेदना ह्या आयुष्य भर ओझं म्हणून वाहिल्या (आणि आज त्या तुझ्या चरणावर वाहतो आहे असा सुप्त अर्थ सुद्धा निघतो)

शेवटच्या कडव्यात पाडगांवकर आणखी भावुक होऊन लिहितात.

संपता पूजा स्वरांची
हात तू देशील का ?
दाटुनी काळोख येता
तू घरी नेशील का ?
पूर्णतेसाठीच या मी
सर्व काही साहिले

संपता पूजा स्वरांची म्हणजे माझं हे आयुष्य गीत संपल्यावर हे विधात्या तू मला हात देशील ना ? आणि काळोख दाटून आल्यावर म्हणजे माझ्या मृत्यूनंतर तू मला तुझ्या घरी नेशील ना ? किंबहुना तू मला तुझ्या घरी ने, कारण या पूर्णतेसाठीच, पूर्ततेसाठीच तर आतापर्यंतचा हा सुख दुःखाचा आयुष्य प्रवास मी सहन केलाय.

एक अत्यंत नितांत सुंदर, पण तितकीच आर्त अशी ही आयुष्याच्या संध्याकाळची भावना शब्दबद्ध करणं हे खूपच अवघड काम पण सिद्धहस्त कवी मंगेश पाडगावकरांनी ती भावना अगदी सहज कागदा वर उतरवली.
खळे काकांसारख्या अत्यंत श्रेष्ठ संगीतकाराने आपल्या चालीने आणि संगीताने त्यात आणखी गहिरे रंग भरले.
आणि लताबाईंनी तर ही कवीच्या शब्दातली आर्तता, ईश्वराच्या चरणी नतमस्तक होतानाचा शरणभाव, लीनता आणि आपल्या संपूर्ण आयुष्याचा हिशेब त्याच्या समोर मांडतानाचे अत्यंत संयमित संतुलित आणि शांत स्निग्ध भाव आणि त्यातली परिपक्वता मांडताना कुठेही कसूर ठेवलेली नाही.

ह्या सगळ्याच भाव छटा लता मंगेशकर यांच्या गंभीर स्वरांतून ऐकतांना आपणही भावविभोर होतो, अस्वस्थ होतो.

श्रीनिवास खळे यांची ही संथ चाल हळूहळू आपल्या मनात झिरपत आपल्या मनाची पकड घेते आणि गाणं संपल्यावर आपल्याला अंतर्मुख करते.

संपूर्ण गीतात सुरुवातीचा, आणि अंतऱ्यामधल्या जागा गाण्यातली आर्तता वाढवतात एकंदरीत हे गाणं आपल्या जिव्हारी लागतं, आपल्याला घायाळ करतं…

जाहल्या काही चुका

संपूर्ण अर्थ वाचल्यानंतर, आता पुन्हा एकदा डोळे मिटून हे नितांतसुंदर गीत तुम्ही ऐकणारच…हो ना ..??

— व्हॉटसऍप वरुन आलेले 

Avatar
About संगीत WhatsApp ग्रुप 23 Articles
श्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....

2 Comments on जाहल्या काही चुका… एक रसग्रहण

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..