१९७९-८० सालं असावं .त्याकाळी सांगली आकाशवाणीवर रात्री दहा वाजता “माझी आवड ” असा कार्यक्रम लागत असे. २-३ आवडती गाणी आणि त्यावर ती कां आवडतात असे भाष्य सादरकर्ते करीत असतं.
एके दिवशी माझ्या एका कवियित्री -मैत्रिणीने (ती तोपर्यंत माझी पत्नी झालेली नव्हती.) तिचा “माझी आवड ” कार्यक्रम ऐकण्याबद्दल सुचविले. कालच माझा फेसबुकवर मित्र झालेला ( आणि त्याही आधीपासूनचा जिवलग) जयंत असनारे आणि मी वालचंदवर कोठूनतरी रेडिओ पैदा करून त्यारात्री नीरव विश्रामबाग स्टेशनवर गेलो आणि कार्यक्रम लावला. इतर गाण्यांबरोबर तिने कार्यक्रमाच्या शेवटी हे गाणे ऐकविले –
जाहल्या काही चुका
अन् सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे
आवडीने गायिले!
चांदण्यांच्या मोहराने
रात्र केव्हा दाटली
काजळी काळ्या ढगांनी
हाक केव्हा घातली
मी स्वरांच्या लोचनांनी
विश्व सारे पाहिले !!१!!
सौख्य माझे, दु:ख माझे
सर्व माझ्या भावना
मोर स्वप्नांचे निळे अन्
विंधणाऱ्या वेदना
मी असे गीतांतुनी
सर्वस्व माझे वाहिले !!२!!
संपता पूजा स्वरांची
हात तू देशील का ?
दाटुनी काळोख येता
तू घरी नेशील का ?
पूर्णतेसाठीच या मी
सर्व काही साहिले !!३!!
एक अत्यंत नितांत सुंदर भावना शब्दबद्ध करणं हे खूपच अवघड काम पण पाडगावकरांनी ते लीलया पार पाडले. खळेंसारख्या श्रेष्ठ संगीतकाराने आपल्या चालीने आणि संगीताने त्यात आणखी गहिरे रंग भरले.
आणि लताने ती आर्तता, लीनता, अत्यंत संयमित, संतुलित आणि शांत स्निग्ध स्वरात परीपक्वपणे मांडली. या गाण्यातील शब्दाशब्दांचे विवेचन आमच्या मैत्रिणीने तितक्याच तोलामोलाने सिद्ध केले -अभिनिवेश न आणता !
खूपवेळा ऐकलेलं हे आवडीचं गीत त्यारात्री आम्हांला नव्याने समजलं. विश्रामबाग स्टेशनचा शांत परिसर भरजरी झाला आणि आम्ही कायमचे श्रीमंत ! कोणाकोणाचे आभार मानायचे ? आम्ही आमच्या समृद्ध नशिबाचे आभार मानले.
आज कोणीतरी WA वर हे गाणं पाठविलं आणि नकळत भूतकाळ जिवंत करून गेलं.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply