।। चतुर्भुजाय नम: जाती पत्रं समर्पयामि ।।
जाईच्या फुलांच्या मंद सुवासाने प्रत्येक मनुष्य अगदी मंत्रमुग्ध होतो.बायकांना तर जाईच्या फुलांच्या गजऱ्याचे भारीच वेड असते.अगदी नाजुक,पांढरी फुले तर प्रत्यक्षात नभातील चांदणे वेलींवर फुलल्या सारखे वाटते.आणी म्हणूनच जाई देखील गणेश प्रिय आहे.
ह्याचा वेल असतो व फांद्यांना धारदार कडा असतात.पाने हि छोट्या पत्रकांच्या स्वरूपात ७-११ जोड्या असतात.फुले पांढरी,लांब,सुगंधी व पुष्पदंडावर उगवणारी असतात जी पावसाळयात फुलतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे पाने,मुळ,फुले व त्वचा.तसेच हि चवीला कडू,तुरट असून उष्ण गुणाची व हल्की,स्निग्ध व मृदु असते.जाई त्रिदोषशामक आहे.
आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात:
१)जाईची पाने चावल्यास दात व हिरड्या मजबूत होतात.
२)तोंडात उष्णतेचे फोड आल्यास जाईच्या पानांच्या काढ्याने गुळण्या करतात.
३)वात विकारात जाईच्या फुलांच्या तेलाने मालीश करतात.
४)जाईच्या पानांचा व मुळाचा काढा हा जखमा स्वच्छ होऊन भरून येण्यास वापरतात.
५)त्वचारोगामध्ये जाईच्या मुळांचा काढा उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply