
या माझ्या आवडत्या चित्रपटातल्या गाण्यांपैकी असलेलं एक गाणं म्हणजे जांभूळ पिकल्या झाडाखाली.
याच गाण्यातील या खालील ओळी ठाऊक नाही का पण आज राहून राहून ओठी येत आहेत,
“समिंदराचं भरलं गाणं, उधानवारं आलं जी
येड्यापिश्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी
लागिरं झालं जी, लागिरं लागिरं झालं जी, पुरतं लागिरं झालं जी..”
गो नी दांडेकरांनी लिहून ठेवलेल्या अनेक अजरामर कांदबर्यांपैकी जैत रे जैत हि ठाकरवाडीतल्या ठाकरांची विशेषतः नाग्या अन् चिंधीची प्रेमकथा. महादेवाच्या गळ्यात बांधलेल्या पोळ्यात विराजमान असलेल्या राणी या मधमाशीविषयीची सूडकथा.
याच कथेचं रुपांतर दिग्दर्शक श्री. जब्बार पटेल यांनी पुढे श्री. मोहन आगाशे , दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील, निळू फुले, सुलभा देशपांडे अभिनीत एका सुंदर चित्रपटरुपी कलाकृतीत केलं. ना.धों.महानोर, पं हृदयनाथजी, लतादिदि, आशाताई या गीतकार, संगीतकार,गायकांनी चित्रपटासोबतच चित्रपटातील गाणीही अजरामर करुन सोडली.
जैत रे जैत म्हटलं कि डोळ्यासमोर उभा रहातो तो कर्नाळा किल्ल्यावरचा लिंगोबाचा अंगठारूपी सुळका. आजही गावावरनं येताना तो सुळका दिसला कि लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला हे गाणं ओठी आल्याशिवाय रहात नाही.
त्याचं ते वाकुल्या दाखवणारं गोंडस रुप पाहिलं रे पाहिलं कि मनाला वार्याची गार झुळक हलकेच स्पर्शून गेल्याचा भास होतो. सुखावतं मन नुसत्याच त्याच्या दर्शनाने.
कथेतला नायक नाग्या ठाकरवाडीच्या भगताचा लेक. ढोल वाजविण्यात पटाईत. तरणाबांड गडी. पुण्यवंत होण्यासाठी धडपडणारा अन् एके दिवशी मधमाशीने त्याचा डोळा फोडल्यावर तिचा सूड घेण्यासाठी पेटलेला.
याच नाग्याच्या ढोलाच्या तालावर अख्खी ठाकरवाडी बेभान होऊन नाचते. नाग्याच्या याच ढोल बडविण्याच्या अदाकारीवर लुब्ध झालेली असते चिंधी.
चिंधी कथेतली नायिका. तिच्या बेवड्या बापानं तिचं लगीन तिच्या मनाविरुद्ध एका कर्तबगार नसलेल्या पाड्यातल्या दारुड्या , भित्र्या युवकाशी लावलेलं असतं. चिंधीचं प्रेम मात्र नाग्यावर जडलेलं.
चिंधी मुळातच बाजिंदी अन् स्वतःची मनमानी करणारी. नाग्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव झाल्या दिवसापासनं आपल्या लग्नाच्या नवर्यासोबत काडीमोड घेण्यासाठी अन् तिच्या सासर्याला ठाकरांच्यि रितीनुसार नुकसानभरपाई देण्यासाठी पै पै जमवित असते. नाग्याचा डोळा मधमाशीने फोडल्यावर त्याची काळजी घेण्यासाठी ती त्याच्या घरी जाते , त्याची देखभाल करते. पण हे काही नाग्याच्या आईला पटत नाही. दुसऱ्या पुरुषासोबत पाट लागलेली “हि दुसऱ्याची बाईल मी माझ्या घरी ठेऊ कशी” असा प्रश्न मग ती ठाकरवाडीताल्यांना विचारते. अन् मग काही जण तिला समजवतात.कि हिच दुसऱ्याची बाईल तुझ्या घरात राबेल , तुला घरकामात मदत करेल, तुझ्या नाग्याचा संसार सोन्याचा करेल.
पुढे कथेतली नायिका चिंधी नाग्याच्या घरात त्याच्या आईला नुसती मदतच करत नाही तर पहिल्या नवर्यासोबत काडीमोड घेऊन नाग्याशी पाट लावते त्याला राणी माशीवरचा सूड घेण्यासाठी ठाकरवाडीच्या विरोधात जाऊन मदत करते. मी कात टाकली म्हणत मोडक्या संसाराची कात टाकून नाग्याशी नवा संसार थाटत फुलांत न्हाते.
प्रेमात लागिर झाल्यानंतरची हि नायिका गो नी दांडेकरांनी कादंबरीत आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी चित्रपटात अगदी हुबेहूब उभी केली आहे. तितकंच त्या भुमिकेला जिवंत केलं दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलजी यांनी . नाग्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली, ढोलिया – नाग्याचं प्रेम अंगात भिनलेली, त्याची भिंगर भिवरी बनू पहाणारी, ठाकरवाडीच्या विरोधात जाऊन नाग्याच्या पाठी ठामपणे उभी रहाणारी, कुणालाही न जुमनणारी बाजिंदी , स्वतःचच खरं करणारी मनमानी, राणीमाशीच्या सूड घ्यायला आतुरलेल्या , पुण्यवंत होण्यासाठी धडपडणार्या , भगताचा मान नाकारणार्या , ढोल बडवून ढोलाच्या तालावर आम्ही ठाकरं ठाकरं म्हणत ठाकरवाडीला नाचवणार्या ठाकरवाडीच्या या येड्यापिश्या भगतासाठी वेडी झालेली ऐन ज्वानीच्या भरात आलेली चिंधी प्रेमाची एक वेगळीच कथा आपल्यासमोर मांडते. नुसती मांडतच नाही तर ती कथा जगायला भाग पाडते. आपलं प्रेम मिळवण्यासाठी वाटेल ते करणाऱ्या बंड करणाऱ्या बंडखोर चिंधीची हि भुमिका खरंच भाव खाऊन जाते.
गो नी दांडेकरांच्या लिखाणशैलीची हिच खासियत आहे कि स्वतः लिहिलेली कथा ते स्वतःहि जगतात आणि इतरांनाही जगायला भाग पाडतात. आपल्या बोटाला धरुन अलगद फिरवून आणतात आपल्याला कथानकाच्या ठिकाणावरनं . पुस्तकाची पाने उलगडता उलगडता वाचक बसल्या जागेवरनं कर्नाळ्याच्या लिंगोबावर, ठाकरवाडीवर कधी जाऊन पोहोचतो ते त्याचं त्यालाच कळत नाही. कथा वाचता वाचता तो कथेचाच एक भाग होऊन जातो. स्वताःच्याही नकळत लिंगोबा नामक महाद्येवासमोर हात जोडून उभे रहातो.
येड्यापिश्या भगतापायी लागिर झालेल्या चिंधीसम आपणंही पुरतं लागिर होतो ते या कथेशी अन् कथेतल्या पात्रांशी.
प्रेम म्हटलं कि बंड करुन उठणं आलं, जुने रुढी रितीरिवाज पाळणार्या लोकांशी, घरच्यांशी, समाजाशी , प्रेमाला नुसताच विरोध करायचा म्हणून करणाऱ्यांशी. कथेतली नायिका नाग्याला मिळवण्यासाठी असाच बंड करते. त्याचं प्रेम मिळवते. त्याला त्याचं ध्येय गाठण्यासाठी त्याच्यासोबत उभी रहाते, त्यात त्याला पुरती मदत करते आणि नाग्याला जय मिळवून देते . नाग्याचा सूड पुरा होतो . पोळ्यातली राणी माशी निघून जाते पण मधमाश्यांच्या चाव्याने खर्या आयुष्यातील चिंधीरुपी राणी कायमची निघून जाते. राणीमाशीच्या बाबतीत नाग्याची जैत होते पण त्यात त्याला मदत करणारी राणी निघून जाते कायमची.. नाग्या जिंकूनही हरतो पण प्रेमात मात्र चिंधी जिंकते..
लेखक : चंदन विचारे
https://www.facebook.com/chandan.vichare.1/
`आम्ही साहित्यिक’ फेसबुक ग्रुपचे सभासद
©चंदन विचारे.
Leave a Reply