नवीन लेखन...

जकार्ता मेडिकल चेक अप

सकाळी सव्वा सात वाजता एजंट सैफुल हॉटेलच्या लॉबी मध्ये येऊन थांबला होता. अर्ध्या तासात हॉस्पिटल असलेल्या भागात पोचलो, पण माझे मेडिकल चेक अप नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये नसल्याने सैफुल ला थोडं शोधावं लागलं. जकार्ता मधील लिप्पो व्हिलेज या पॉश एरिया मध्ये सिलोम हॉस्पिटल ची मोठी शाखा होती. जकार्ता मधील गोल्फ क्लब ला वळसा घालून पंचतारांकित सिलोम हॉस्पिटल मध्ये मेडिकल चेक अप होणार होतं. जकार्ता मध्ये येऊन मेडिकल फेल होऊ नये आणि त्यामुळे जहाजाऐवजी मेडिकल क्लियर होईपर्यंत हॉटेल मध्ये राहायला लागू नये म्हणून मुंबईत संपूर्ण मेडिकल चेक अप करून रिपोर्ट्स नॉर्मल झाल्यावरच मला इंडोनेशिया मध्ये पाठविले होते. जहाज इंडोनेशियात असल्याने तिथल्या ऑइल कंपनीच्या नियमानुसार मेडिकल चेक अप हे इंडोनेशियन हॉस्पिटल आणि तिथल्या स्टॅंडर्ड मध्ये करण्याचे बंधन होते. मुंबईत असताना रक्तातील कोलेस्टेरॉल वाढल्याने काही दिवस गोळ्या देऊन रोज अर्धा पाऊण तास चालायला सांगितले आणि दहा दिवसानी पुन्हा रक्त तपासणी करून कोलेस्टेरॉल नॉर्मल झाल्याची खात्री कंपनीने करून घेतली होती.

सिलोम हॉस्पिटल हे ऑस्ट्रेलियन कंपनीकडून इंडोनेशियात चालविले जाते असं समजलं. हॉटेल चेन सारखी आंतरराष्ट्रीय हॉस्पिटल चेन पण असते हे जकार्ता मध्ये आल्यावर समजलं. आंतरराष्ट्रीय चेन पैकी हॉस्पिटल असले तरी तिथला सगळा कारभार इंडोनेशियन भाषेतच चालू होता. हॉस्पिटल चे सॉफ्टवेअर पासून ते सगळे रिपोर्ट्स इंडोनेशियन भाषेतच. सैफुल ने रिस्पेशनला जाऊन डॉक्युमेंट्स दिले, तिथून मग माझ्या नावाच्या पट्ट्या असलेले स्टिकर्स ची प्रिंटआऊट माझ्या हातात देऊन समोरच्या काउंटर वर जायला सांगितले. तिथं गेल्यावर कैद्यांना देतात काहीसे तसेच पण आकाशी निळ्या रंगाचे कपडे देऊन लॉकरची चावी आणि एक नवीन रबरची चप्पल देऊन कपडे बदलायला सांगितले.

तिथं असलेल्या नर्स ने मिस्तर यू स्पीक इंग्लिश?? विचारलं तिला म्हटलं लिट्ल लिट्ल कॅन.

मग तिने एका फाईल वर माझ्या नावाचा स्टिकर चिटकवला आणि ब्लड सॅम्पल घ्यायला पाठवले. पंचतारांकित हॉस्पिटल असल्याने ब्लड घेण्यासाठी शिरेतून सिरिंज ने एक दोन वेळा सॅम्पल न काढता नीडल आणि ट्यूब ला व्हॉल्व असलेली वेन फ्लो लावली आणि तीन ट्यूब मध्ये सॅम्पल घेतलं. मग वजन, उंची, ब्लड प्रेशर सगळं तपासून झाल्यावर नाश्ता करायला सांगितलं इंडोनेशियन ब्रेकफास्ट होता ब्राऊन राईस आणि सलाड आणि सूप सारखा पदार्थ, मी आपले अननस आणि कलिंगड खाऊन नाश्ता आटपला . लगेचच माझी साऊंड प्रूफ रूम मध्ये बसवून ऑडिओमेट्री टेस्ट घेतली दोन्हीही कानात आवाज कमी जास्त करून ऐकू येतो का ते तपासले. साऊंड प्रूफ रूमच्या काचेतून आवाज ऐकायाला येतोय हे इशाऱ्यानी न सांगता हातात एक बटण वाले ट्रिगर देऊन ते दाबायला सांगितले. ऐकू येतंय त्याची टेस्ट झाल्यावर, दारू पिलीय का त्याची टेस्ट म्हणजे स्पिरोमेट्री केली. मी कधीच दारू पीत नाही सांगितलं तरीपण स्पिरोमेट्री टेस्ट करावी लागेलच सांगून, मशीनच्या सेन्सर मध्ये जोर जोरात फुंकायला सांगितलं. हवा आत ओढून त्या मशीन ने सेन्स कारण्याइतपत मोठा उच्छवास काही सोडता येईना. सिस्टर ने सांगितल्या प्रमाणे चार वेळा प्रयत्न करून झाल्यावर तिने स्वतःच करून दाखवलं. तिला म्हटलं तूच दे सॅम्पल पण रिपोर्ट माझ्या नावाने बनव त्यावर तिने नो नो नॉट पॉसिबल बोलून मलाच स्पिरोमेट्री करायला लावली छातीत हवा भरून कसं तरी जोरानं हुफ केलं आणि एकदाचा सेन्सर कडून रिझल्ट आला.

नंतर दातांच्या डॉक्टर कडे पाठवले, नवीन फाईल त्यावर स्टिकर आत फाईल गेल्यावर काही सेकंदात डॉक्टर बाहेर येऊन बोलावून नेतो. ऑटोमॅटिक खुर्चीवर बटनांनी वरखाली सरकवून बसवून झाल्यावर मग सील्ड पॅक पाऊच मधून डेंटिस्ट त्याची हत्यार घेऊन जबडा उघडायला सांगतो. सराईतपणे एका एका दाढेच आणि दाताचे इन्स्पेक्शन सुरु होतं. इंडोनेशियन भाषेत डेंटिस्ट काहीतरी पुटपुटत असतो आणि त्याची असिस्टंट पेपर वर काहीतरी लिहीत असते. तपासणी झाल्यावर डेंटिस्ट बोलतो टीथस आर गुड बट टेक केअर.

नंतर एका वॉर्डबॉय सोबत मला खाली तिसऱ्या मजल्यावर पाठवले तिथे डोळ्यांची तपासणी, एक्स रे आणि सोनोग्राफी करणार होते.

कलरब्लाइंड आहे की नाही त्याची टेस्ट झाल्यावर, लहान होतं जाणारी अक्षरं एक एक डोळा झाकून बघायला सांगीतली. मग डोळ्यांच्या डॉक्टर कडून काही त्रास होतो का वगैरे वगैरे झाल्यावर जायला सांगितलं.

एक्स रे झाल्यावर सोनोग्राफी झाली. तिथं पण मुंबईत सांगितल्या प्रमाणे माईल्ड फॅटी लिव्हर आहे सांगितलं, सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टर ने विचारपूस करताना भारतीय आहे सांगितल्यावर, आम्हाला इंडियन डॉक्टर इथं येऊन शिकवतात असं सांगितले.

पुढं पंधरा मिनिटं स्ट्रेस टेस्ट साठी छातीला दहा बारा सेन्सर्स लावून कॉम्प्युटर कंट्रोल्ड ट्रेड मिल वर हळू हळू चालायला लावून धाप लागेपर्यंत पळायला लावलं. पळण्यासाठी स्पोर्ट्स शूज आणि नवीन सॉक्स ची जोडी दिली त्यावरून हॉस्पिटलचा मोठेपणा जाणवला. नाहीतर मुंबईत धावा ट्रेड मिल वर अनवाणी काही फरक नाही पडत त्याने अशा प्रकारची स्ट्रेस टेस्ट.

वर गेल्यावर ईएनटी सर्जन कडून तपासणी झाल्यानंतर कार्डियाक सर्जन ने पुन्हा ब्लड प्रेशर तपासले मग स्टेथोस्कोप लावून काहीतरी तपासतोय असं दाखवलं मग डायबेटीस आणि हार्टची फॅमिली हिस्टरी वगैरे विचारले आणि जायला सांगितलं. नाश्ता झाल्यावर दोन तास होऊन गेले होते आणि बाकी सगळ्या टेस्ट पण झाल्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा ब्लड सॅम्पल घेतलं, यावेळी स्प्रिंग लोडेड नीडल ने बोटावर ट्यूच्यूक करून रक्ताचा थेंब काढला आणि जायला सांगितलं. माझ्या नावाने काढलेले स्टिकर सगळ्या डॉक्टर आणि टेस्ट च्या फाईल लागून संपले होते. दुपारचे साडेबारा वाजले होते कपडे चेंज केल्यावर लंच करायला सांगितले. लंच साठी एग फ्राइड राईस चालेल का विचारले असल्याने पॅन्ट्री मध्ये एग फ्राईड राईस ची प्लेट माझी वाट बघत होती. कशीबशी अर्धी प्लेट खाल्ली आणि एकदाचा हॉस्पिटल मधून बाहेर पडलो. पॉश असू दे नाहीतर तारांकित हॉस्पिटल मध्ये काय करमतय का, सगळ्यांचे पडलेले, त्रासलेले आणि दुःखी चेहरे.

मेडिकल रिपोर्ट आठ दिवसात मिळतील आणि ते अप्रूव्ह झाल्यावर माझा जहाजावरील पंधरा दिवसांचा तात्पुरता पास पुढील एक वर्ष मेडिकल व्हॅलिड असेपर्यंत वाढविला जाईल असं सैफुल ने सांगितलं. साडे चारशे ते पाचशे डॉलर्स इतका खर्च सिलोम हॉस्पिटल मध्ये मेडिकल चेक अप साठी येतो असंही सैफुल कडून कळलं. मुंबईत डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग चे मान्यता असलेले डॉक्टर मेडिकल चेक अप करतात पण आंतरराष्ट्रीय कामगार संघटना किंवा इतर जहाजांवर जाण्याकरिता एवढी कडक तपासणी नाही केली जात. ब्लड टेस्ट, एक्स रे आणि सोनोग्राफी झाली की ऑल क्लियर.

सैफुल ला म्हटलं आता मला मोबाईल मध्ये इथलं सिमकार्ड घेऊन चालू करून दे एकदाच उद्या सकाळी सात वाजता जकार्ता हुन जहाजावर पोचण्यासाठी क्रु चेंज बोट मध्ये बसायचे होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी सैफुल आणि चायनीज टेक्निशियन ज्याला माझ्यासोबत जहाजावर यायचे होते असे दोघे सव्वा सहा वाजता हॉटेल वर आले. तिथून दहा मिनिटातच कालिजापात नावाच्या टर्मिनल जेट्टी वर पोचलो.

जहाज जकार्ता शहरापासून 55 नॉटीकल मैल म्हणजे जवळपास 100 किलोमीटर खोल समुद्रात उभं होतं. जेट्टीवर सव्वाशे पेक्षा जास्त लोकं जमा झाली होती. आमच्या जहाजावर काहीजणांना सोडून ऑइल फिल्ड मधील इतर लहान मोठ्या बोटी आणि एका आयलंड वर असणाऱ्या गॅस पॉवर प्लांट साठी जाणारे कर्मचारी आणि अधिकारी अशा सगळ्यांना एकाच क्रु चेंज बोट ने जायचे होते. क्रु चेंज बोट डबल डेकर आणि डबल इंजिन वाली होती. सव्वा तीन ते साडे तीन तासातच पाण्याला सपा सप कापत 100 km अंतर गाठते असं ऐकलं होतं त्याची खात्री बोट बघितल्यावर पटली.

बॅग स्कॅन झाल्यावर माझे कागदपत्र बघून बोटीत जायला परवानगी दिली. अडीच वर्ष घरी काढल्यानंतर पुन्हा जॉईन होताना सेकंड इंजिनियर म्हणून प्रमोशन आणि इंडोनेशियन जुनियर ऑफिसर व क्रु मॅनेजमेंट करण्याची नवीन जवाबदारी पडली होती. जहाजावर आम्ही फक्त पाच भारतीय आणि 55 ते 60 इंडोनेशियन असणार होते. जहाज माझ्या वयापेक्षा जास्त वयाचे होते. 1981 साली बांधणी केले गेलेले, या जहाजावर आतापर्यंत कामं केलेल्या जहाजांवर असतात त्याप्रमाणे जनरेटर नसून स्टीम वर चालणारे टर्बो अल्टरनेटर म्हणजे वाफेवर विद्युत निर्मिती केली जाणारी यंत्रणा आहे एवढीच जुजबी माहिती. पहिल्यांदाच पाच किंवा सहा ऐवजी तीनच महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. जमिनीवरून पाऊल उचलले आणि शिडीवरून जहाजावर जाण्यासाठी क्रु चेंज बोटीत टाकलेले पाऊल पुन्हा तीन महिने झाल्याशिवाय जमिनीला लागणार नाही यामुळे जड झाले. घरच्या, प्रियाच्या आणि मुलांच्या आठवणीने मन सुद्धा जड झाले. समोरचा अथांग समुद्र बघून डोळे पाण्याने भरले.

बोटीतला थंडगार ए सी सहन होत नव्हता म्हणून बाहेर येऊन पाहिले तर बोट वेगाने निळ्याशार पाण्याला कापत निघाली होती. पाठीमागे निळ्या पाण्याला बोटीचे दोन प्रोपेलर घुसळून पांढऱ्या फेसाळलेल्या लाटेत उसळवत होते. सकाळचे आठ वाजायला आले होते, बोटीला वेग होता वारा आणि लाटांमुळे थोडी हेलकावत असल्याने डोकं जड होऊन पुन्हा सकाळी सकाळी झोप येतेय असं जाणवायला लागलं.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर.

B. E. (Mech ), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..