नवीन लेखन...

जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर

आज जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर यांचा जन्म दि. २५ फेब्रुवारी भंडारा येथे झाला.

मिलिंद तुळाणकर हे सुमारे ३५ हून अधिक वर्षं जलतरंग वाजवत आहेत. जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी ते वाजवितात. भांड्यातील पाण्याची पातळी कमी-जास्त केल्यास स्वर बदलतात. जलतरंगाचा आवाज थेट अंतर्मनात जातो. त्यामुळे संगीतोपचारामध्ये त्याचा वापर करतात, या जलतरंग वादकाच्या पैकी मिलिंद तुळाणकर हे एक ज्येष्ठ कलाकार आहेत.

मिलिंद तुळाणकर यांचे आजोबा (आईचे वडील) पंडित शंकर कान्हेरे हे त्यांचे जलतरंगातले गुरू होत. मिलिंद तुळाणकर यांच्या घरी आणि आजोळीही सांगीतिक वातावरण होतं. त्यांची आजी स्नेहलता कान्हेरे साताऱ्याच्या होत त्या शाळेत संगीत शिक्षिका होती. त्या दिलरुबा वाजवत असत. मिलिंद तुळाणकर यांची आई सरिता तुळाणकर गायिका तर वडील श्रीराम तुळाणकर हे सतारवादक. त्यामुळे ओघानंच त्यांची सांगीतिक प्रगती झपाट्याने होत होती. मिलिंद तुळाणकर यांचे १ ते ४ थी चे प्राथमिक शिक्षण अमरावती येथे मुधोळकर पेठ महिला मंडळ प्राथमिक शाळा येथे झाले.

पुढे मिलिंद तुळाणकर यांचे दहावीपर्यंतचं शिक्षण सातार्‍यात झालं. सहावी- सातवीत असल्यापासून ते हार्मोनियम वाजवत असत. कडक शिस्तीच्या आजोबांनी मिलिंद तुळाणकर यांना जलतरंग शिकवायला सुरुवात केली तीही योगायोगानेच. आजोबा घरात नसताना छोटा मिलिंद आजोबांचं जलतरंग वाजवत असत, राग कोणता? वगैरे त्यावेळी समजत नसलं तरीही आजोबा जसे वाजवत तसेच वाजवायचा. एक दिवस त्यांच्या आजीनेच आजोबांना सांगितले की ‘मिलिंद अगदी हुबेहूब तुमच्यासारखा वाजवतो’, तेव्हा आजोबांसमोर मिलिंदजींनी पहिल्यांदा जलतरंग वाजवले आणि आजोबांनी जलतरंगासारख्या दुर्मिळ वाद्याचा वसा मिलिंदजींना दिला. अर्थात, घरात सांगीतिक वातावरण असलं की लोकांच्या अपेक्षाही खूप असतात आणि त्याचा कधी कधी तोटाही होतो. पण सुदैवाने मिलिंदजींच्याबाबतीत असं घडलं नाही. उलट बी.ए च्या शेवटच्या पेपरच्याच दिवशी आकाशवाणीवर ऑडिशन असूनही आजोबांनी ‘पेपर नंतर देऊ शकशील, आत्ता ऑडिशन दे’ असा पाठिंबा दिला होता. मिलिंद तुळाणकर यांचे भारतात आणि भारताबाहेरही जलतरंगवादनाचे अनेक कार्यक्रम होत असतात. मिलिंदजी मलेशिया इथल्या एका विद्यापीठात काही काळ संगीतशिक्षकही राहिले आहेत. मिलिंद यांनी भारतातल्या अनेक गायक-वादकांबरोबर जलतरंग जुगलबंदी सादर केली आहे. त्यांनी बी.बी.सी चॅनलतर्फे छायाचित्रित करण्यात आलेली उस्ताद तौफिक कुरेशी यांच्याबरोबरची जलतरंग आणि झेंबे या तालवाद्याची जुगलबंदी उल्लेखनीय आहे. मिलिंद तुळाणकर यांनी अनेक परदेशी वाद्यवादकांबरोबरही जुगलबंदी केली आहे. गुड डे बिस्किटांच्या जाहिरातीच्या संगीतात मिलिंद तुळाणकर यांनी वाजवलेल्या जलतरंगाचा प्रामुख्याने वापर झाला आहे. मिलिंद हे रागदारी बरोबर, पण सर्वसामान्यांमध्ये या वाद्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी नाट्यगीत, भावगीत व चित्रपटगीतंही वाजवतात. चित्रपटांसाठी त्यांनी जलतरंगवर हिंदी, मराठी, इंग्रजी व तमीळ गीतंही वाजवली आहेत. मिलिंद तुळाणकर हे आपल्या जलतरंग वादनासाठी सहा-साडेसहा इंच व्यासापासून दोन इंच व्यासाचे चिनी मातीचे बाउल्स यासाठी वापरतात. मिलिंद तुळाणकर हे चिनी मातीच्या ज्या भांड्यांमध्ये कमी-अधिक पाणी भरून तुळाणकर बहारदार वादन करतात, ती भांडी सुमारे ८० वर्षं जुनी आहेत. जास्त व्यास मंद तर कमी व्यासाच्या बाउलमधून तार (उंच) स्वर निघतो. पाण्याची पातळी कमी-जास्त करत बाउल सुरांत लावले जातात. यावर गुंजन निघणं, स्वरांना आस राहणं हे बाउलवर आघात करणाऱ्या रॉडच्या तंत्रावर अवलंबून असतं. याचा किणकिणता नाद निर्झर, नदी अशा निसर्गरम्य जागांची आठवण करून देतं.
जलतरंगाखेरीज मिलिंद हार्मोनियम, सतार, संतूर, तबलातरंग, पियानो, काष्ठतरंग आणि नलिकातरंग अशी इतरही अनेक वाद्ये वाजवतात. काष्ठतरंग आणि नलिकातरंग ही त्यांनी स्वतः तयार केलेली छोटेखानी वाद्ये. काष्ठतरंग म्हणजे लाकडी पट्ट्या विशिष्ट आकारात कापून त्यातून आघाताने स्वरनिर्मिती करतात तर नलिकातरंग हे वाद्य धातूच्या नलिका वेगवेगळ्या आकारात कापून तयार केलेलं वाद्य. नलिकातरंगही आघाताने वाजवतात. मिलिंदजींनी दगड विशिष्ट आकारात तासून त्यातूनही स्वरनिर्मिती होऊ शकते याचे प्रयोग केले आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक तानपुराही तयार केला आहे. त्या तानपुर्‍याचं वैशिष्ट्य म्हणजे यातून हार्मोनियमचा सूरही ऐकू येतो. जो इतर इलेक्ट्रॉनिक तानपुर्‍यात नाही. मिलिंदजींचे वडील सतारवादक असल्याने ते सतारही उत्तम वाजवतात. वाद्यवादना शिवायही त्यांच्या अंगी अनेक कलागुण आहेत. ते उत्तम गायन करतात. काही मराठी कवितांना, त्यांनी स्वतः लिहिलेल्या हिंदी कवितांना आणि संतकाव्याला त्यांनी चालीही लावल्या आहेत. मिलिंदजींचं लिखाण मुख्यत्वे हिंदीत आहे. मिलिंद तुळाणकर यांना सुरसिंगार संसदेचा सुरमणी पुरस्कार, पुण्याचा कलागौरव पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

जलतरंग आणि मिलिंद तुळाणकर यांच्याबद्दलची अधिक माहिती आणि त्यांच्या जलतरंगवादनाचे काही ऑडिओ/व्हीडिओ तुम्हाला त्यांच्या www.jaltarang.com या वेबसाईट वर पाहता येतील.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..