नवीन लेखन...

जन पळभर म्हणतील

जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय.
या कवितेमध्ये कविवर्य भा. रा. तांबे यानी जगातून गेलेल्या व्यक्तीच्या पश्चात काय परिस्थिती निर्माण होते त्याचं अगदी यथार्थ वर्णन केलेलं आहे. या कवितेत एक कडवं आहे.
“सगे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील.
उठतील बसतील हसुनी खिदळातील, मी जाता त्यांचे काय जाय.”
हे अगदी तंतोतंत खरं आहे. कुणाच्या घरी मृत्यू झालाय असं कळल्यावर आपण त्या व्यक्तीच्या किती जवळचे आहोत त्या प्रमाणात आपल्याला दुःख होतं. व्यक्ती अगदी जवळच्या नात्यातली असेल तर नक्कीच वाईट वाटतं. परंतू त्या वाईट वाटण्यातही कमी जास्त प्रमाण असतं. समजा गेलेली व्यक्ती वयस्कर असेल किंवा अनेक वर्ष अंथरुणाला खिळलेली असेल तर, “सुटली बिचारी” हा सूर असतो. तर अगदी तरुण वयात अपघाताने, अचानक काही कारणाने अथवा सध्याच्या कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असेल तर वाईट वाटण्याचं प्रमाण जरा जास्त असतं. आणि, “अरेरे ! फारच वाईट झालं “
हा सूर लागतो. हे झालं जवळच्या व्यक्तींबाबत. पण ओळखीचे, इमारतीत किंवा आजूबाजुला रहाणारे, परिचित असे अनेक विभाग असतात. इथे वाईट वाटण्याचं प्रमाण अल्प असतं आणि, “माणूस मात्र चांगला होता” हा सूर असतो. कारण त्यावेळी गेलेली व्यक्ती कितीही वाईट, खतरुड स्वभावाची, नकोशी वाटणारी असली तरी गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये या भूमिकेतून हे बोललं जातं.
आता मृत व्यक्ती किती जवळची लांबची यावर तिथे पोहोचण्याचं प्रमाणही अवलंबून असतं. म्हणजे जवळची असेल तर आपली सगळी कामं तिथेच टाकून आपण धाव घेतो. एखादी परिचित व्यक्ती गेल्याचं ज्याला पहिल्यांदा कळतं, त्याला तिथे पोहोचल्यावर जाणावतं की अजून कुणीच आलेलं नसतं आणि तो मात्र आयताच तिथे जाऊन अडकतो. आपला पूर्ण दिवस तर आता गेलाच असा विचार करत तो गेलेल्या व्यक्तीच्या परिचयाच्या सगळ्यांना ती दुःखद बातमी कळवून आपला जीव शांत करून घेतो. ही बातमी कळल्यावर प्रत्येकजण साधारण वेळ विचारून घेतो आणि कळलेल्या वेळेत अजून एक तासभर मिळवून तिथे पोहोचयचं ठरवतो. व्यवस्थित पोटोबा करूनच जाऊया म्हणजे कितीही वेळ लागला तरी हरकत नाही असा विचार करून (आणि प्रत्यक्षात तसंच करून )तिथे पोहोचताच, आपल्याला कळलं तस्सा लगेच निघालो, असा भाव चेहेऱ्यावर आणि बोलण्यातून प्रत्येकजण दाखवत असतो. बोलता बोलता, तरी अजून किती वेळ लागणार आहे हे सुद्धा आडून आडून विचारून घेतलं जातं. जो सगळ्यात आधी पोहोचलेला असतो तो बिचारा येणाऱ्या प्रत्येकाच्या प्रश्नांना तोंड देत इथून कधी सुटायला मिळतंय या विचारात असतो. मृत व्यक्तीचे लांबचे, जवळचे(जवळपास रहाणारे) नातलग येऊन आणि हाताची घडी घालून तीन-तीन, चार-चारच्या समूहाने उभे असतात. सुरवातीला,
“अचानक कसं?” “आजारी होते का?” “माझी महिन्यापूर्वीच भेट झाली होती” (हे भेट होण्याचे दिवस प्रत्येकाचे वेगळे असतात ) अशा चौकशीवरून, एका पायावरचा जोर दुसऱ्यावर टाकत हळुहळु राजकारण, जगाची सद्यस्थिती, भ्रष्टाचार, आपल्या ऑफिसमधली स्थिती, रस्त्यावरचा ट्रॅफिक, महागाई आशा अनेक विषयांवर चर्चा करत, सगळा हरामखोरांचा कारभार आहे या टप्प्यावर येऊन चर्चा थांबते . चर्चेतून बाहेर येत पुन्हा एकदा अंदाज घेतला जातो, तेव्हा कळतं की मृत व्यक्तीचं कुणीतरी सख्ख, किंवा आते मामे पैकी यायचं असतं. आणि, “त्यांचा खूप जीव होता” या सबबीवर घरचे थांबलेले असतात. प्रत्येकजण घड्याळावर किंवा मोबाईलवर नजर टाकतात. दुपार व्हायला लागलेली असते. अनेकांच्या तोंडातून चुकचुकल्याचा आवाज म्हटलं तर वैतागून म्हटलं तर सहज बाहेर पडतो आणि, ‘आटपा लवकर’ असं मनातल्या मनात म्हणत मोबाईल बाहेर काढला जातो आणि सगळी मंडळी आपापल्या भ्रमणध्वनीमध्ये चॅटिंग करण्यात गढून जातात. ऑनलाईन दिसताच घरून मेसेज येतो,
‘आटोपलं की नाही? आंघोळीचं पाणी काढून ठेवू का?
‘अगं कसलं आटोपतय अजून दोन तीन तास जातील’
तुम्हाला म्हटलं होतं मी फक्त भेटून या- म्हणून
अगं असं कसं निघणार एकदम?
क्या यार ऑफिसमे सब ओके ना?
क्या हुआ? आज आया नही, wife के साथ मजे कर रहा हैं क्या?
नही यार, कल बताता हूं
अहो, जरा लांबच उभे रहा इतरांपासून.
कोरोना गेला नाहीय माहितीय ना?
असं प्रत्येकाचं कुणा ना कुणाबरोबर चॅटिंग सुरु असतं. आता उन्हाचा कडाकाही वाढलेला असतो. प्रत्येकजण नजर आणि मान उंच करून गेलेल्या व्यक्तीच्या घरातलं कुणी दिसलं की शक्य तेव्हढं चेहऱ्यावर दुःख आणून मोबाईल लपवत अपेक्षेने त्यांच्याकडे पहात असतो. अनेकदा बिल्डिंगमधले कुणी सहृदयी खुर्च्यांची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. अगदी क्वचितप्रसंगी चहाचीही व्यवस्था होते. मंडळी वाटच पहात असतात. इतका वेळ उभं राहून किंवा कुठेतरी बुड टेकवून पाय तुटायलाच आलेले असतात. म्हाताऱ्या लोकांना पाहिल्या न पाहिल्यासारखं करून पटापट खुर्च्या अडवल्या जातात. जसजशी दुपारही टळायला लागते तसतशी पोटातली भूक वाढायला लागलेली असते. काही चणाक्ष लोकांनी आधीच जवळच्या हॉटेल किंवा वडापाव गाडीवर जाऊन क्षुधाशांती केलेली असते. सकाळी येताना रिचवलेला पोटातील कोटा कधीच रिकामा झालेला असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रयत्नपूर्वक बाळगलेल्या दुःखी मुखावर आता कंटाळा, त्रास, वैताग आणि भुकेने ताटकळलेले भाव दाटून आलेले असतात. जवळच्या चहा स्टॉलचा धंदा आज तेजीत असतो. इतक्यात ज्यांच्यासाठी नेणं खोळंबलेलं असतं ते अवतरतात आणि मंडळी सुटकेचा निश्वास टाकतात. आत्ता आलेली मंडळी आत शिरत असताना सगळ्यांच्या विविध भावांच्या नजरा त्यांच्या पाठीवर अक्षरशः खिळलेल्या असतात. सगळीकडे मरगळं जाऊन थोडा उत्साह संचारतो. अर्थात हा उत्साह आता लवकर सुटका होणार याचा असतो. या सगळ्यात अंत्ययात्रेची तयारी करणारी मंडळी कुठेही लक्ष न देता आपलं काम मनापासून करत असतात. त्यांच्यातली एक ज्येष्ठ व्यक्ती या सगळ्यावर बारीक लक्ष ठेवून सूचना देत असते, आणि त्याच्या सूचनाबरहुकूम सगळं काम होत असतं. प्रत्येक गोष्ट झाल्यावर ती व्यक्ती आपल्या हाताने त्याला फायनल टच देत असते. संपूर्ण तयारी करून ती व्यक्ती आपल्याकडून तयारी पूर्ण झाल्याचं कळवते आणि घरातल्या मंडळीना ग्रीन सिग्नल मिळतो. मग मात्र फार वेळ न दवडता गेलेल्या व्यक्तीला खाली आणलं जातं. रडण्याचा आर्त स्वर उमटतो. खाली आणताच ती ज्येष्ठ व्यक्ती सगळ्या गोष्टीचा पुन्हा ताबा घेते आणि आपल्या सहकाऱ्यांसह मृत व्यक्तीला तिरडीवर नेमक्या दिशेने आणि पद्धतीने व्यवस्थितपणे जोडून टाकते. आपल्याकडे निधन झालं की ती व्यक्ती देव योनीत गेली अशी समजूत आहे. जिथून ती आली तिथे ती परत गेली असं समजलं जातं. हार घालून पाया पडण्याची गडबड उडते. सुरवातीला मोठ्या जाड हारांपासून अखेर गुरुवारी देवाच्या तसबीरीला घालण्याच्या हारांपर्यंत मृत व्यक्तीला सजावलं जातं. आणि अखेर एकदा तिरडी उचलली जाते. मग कुणी स्वतःच्या स्कुटरवरून तर कुणी कुणाच्या मागे बसून, कुणाच्या गाडीतून, कुणी ऑटो पकडून पुढे होतात. तर कुणी सरळ घरचा मार्ग पकडतात. स्मशानात पोहोचल्यावरही तासभर मोडतोच. अखेर मृत शरीराला अग्नी दिला जातो आणि अंतिम कार्य करणाऱ्या व्यक्तीला भेटून सगळे भराभरा आपापल्या मार्गाला लागतात. घरची मंडळी सोडून आलेल्या लोकांसाठी गेलेल्या व्यक्तीचा विषय तिथेच संपतो. तसंही परदुःख शीतलच असतं म्हणा. स्मशानाच्या बाहेर सगळं जग आपापल्या दुनियेत मग्न असतं. सायंकाळ होते, रात्र होते आणि दुसरा दिवस उजाडतो. अगदी सगळं सगळं नित्यानेमाने सुरु होतं. नव्या दिवशी इतक्या नवनवीन गोष्टी समोर येतात की ही दुःखद घटना सगळे कधीच विसरून गेलेले असतात.
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल काहि का अंतराय ?
अशा जगास्तव काय कुढावे?
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय?
जन पळभर म्हणतील ‘हाय हाय’
मी जातां राहील कार्य काय ?
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..