जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९१६ रोजी हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी झाला.
नानाजी देशमुख यांचे शिक्षण राजस्थानातील सिकर येथे झाले. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक झाल्यानंतर नानाजी देशमुख यांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे प्रचारक म्हणून पाठविण्यात आले. भारतीय जनसंघात सक्रिय झाल्यानंतर उत्तर प्रदेशात चौधरी चरणसिंग यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्यामध्ये नानाजींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता. आणीबाणी संपल्यावर नानाजी देशमुख यांनी उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवून ते लोकसभेत गेले होते.
नानाजी देशमुख यांनी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात समाजकार्य केल्यानंतर शेवटी उत्तर प्रदेशातल्याच चित्रकूट येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालयाची स्थापना केली. भारतातले पहिले ग्रामीण विद्यापीठ म्हणून ते ओळखले गेले. याचा फायदा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना होतो.
चित्रकूटमधील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रकल्प हाती घेतला. चित्रकूटमध्ये त्यांनी गोशाळा स्थापन केली असून महिला सक्षमीकरणासाठी उद्यमकेंद्राची स्थापना केली आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पिकांवर संशोधन केले जाते. पिकांचे कोणते वाण वापरावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. मध्य प्रदेशातील विविध भागातील शेतकऱ्यांना येथून मार्गदर्शन होते. १९९९ ते २००५ या कालावधीमध्ये ते राज्यसभेचे सदस्य होते.
त्यांना १९९९ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली होती.
गेल्या वर्षी नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
नानाजी देशमुख यांचे निधन २७ फेब्रुवारी २०१० रोजी झाले.
Leave a Reply