जपानला 1854 साली 8.4 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यापेक्षा अधिकचा म्हणजे 8.9 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप दिनांक शुक्रवार दिनांक 11 मार्च, 2011 रोजी जपानच्या वेळेप्रमाणे दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी झाला आहे. त्या वेळी भारतात सकाळचे 11 वाजून 16 मिनिटे झाली होती. पण 2004 साली सुमात्रा बेटात झालेला भूकंपही 8.9 तीव्रतेचा होता. म्हणजे तेव्हाचा सुमात्रातील भूकंप आणि आताचा जपानमधील भूकंप हे सारख्याच तीव्रतेचे होते.
पाण्याखालील भूकंप
सुमात्रातील भूकंपाचा केंद्रबिंदू पाण्याखाली 40 किलोमीटर खोलीवर होता, तर आताचा जपानचा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर होता. सुमात्रा भूकंपामुळे उठलेल्या त्सुनामी लाटांनी भारताच्या पूर्व किनार्याला तडाखा दिला होता आणि भारतातील 12,000 माणसे तेव्हा मेली; तेव्हा भारताने त्सुनामी लाटा म्हणजे काय याचा बऱ्याच वर्षांनी परत एकदा अनुभव घेतला होता. पूर्वी 1945 साली भारताच्या किनार्याला त्सुनामी लाटांचा तडाखा बसला होता.जपान देश हा भूकंपप्रवण देश म्हणून आपण भूगोलात लहानपणापासून वाचत आलो आहोत. 1854 सालापूर्वी जपानमध्ये झालेल्या भूकंपाच्या 4-5 नोंदीच उपलब्ध असल्या तरी 1854 सालापासून भूकंपाच्या नोंदी जपान व्यवस्थितपणे ठेवू लागला. या दीडशे वर्षांच्या नोंदीतील 11 मार्चचा भूकंप अधिक तीव्रतेचा ठरतो. दुसर्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर जपान फिनिक्स पक्ष्याप्रमाणे अक्षरश: राखेतून उठला आणि त्याने सर्वांगीण प्रगती केली. या प्रगतीमध्ये भूकंपरोधक घरे कशी बांधायची आणि भूकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखीसारखी संकटे आली असता त्यांना कसे तोंड द्यायचे याची सगळ्या प्रकाराची तयारी या देशाने मोठ्या शिस्तबद्ध रितीने केली आहे. आजची आपल्या देशातील शिस्त पाहता अशी तयारी करायला भारताला किमान 100 वर्षे तरी लागतील. पण चांगली सरकारे केंद्र आणि राज्यात आली, तर हे चित्र आपल्याला नक्कीच पालटता येईल.
चहूबाजूंनी आले संकट
पण जपानचे दुर्दैव असे की 11 मार्चला त्यांच्यावर कोसळलेले संकट प्रचंड तीव्रतेचा भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि आण्विक रिअॅक्टरचे स्फोट असे चहूअंगाने आले. संकट एकेकट्याने न येता झुंडीने येते म्हणतात, ते जपानच्या वाट्याला आता आले आहे. अशा संकटांना तोंड द्यायची पूर्ण तयारी असलेल्या जपानमध्ये पहिल्या दिवशी 300 माणसे मेल्याची बातमी होती; पण आता तो आकडा तेरा हजारांपर्यंत गेला असून आणखी एक-दोन महिन्यांत जेव्हा सगळीकडच्या बातम्या येऊन पोहोचतील, तेव्हा तो कुठवर गेलेला असेल हे सांगणे कठीण आहे. पण 1923च्या 8.3 तीव्रतेच्या भूकंपात जपानमध्ये एक लाख बेचाळीस हजार लोक मेले होते, त्या तुलनेने आता चहूबाजूंनी संकट येऊनही बळींची संख्या नक्कीच कमी असणार आहे.
जपानच्या ईशान्येस असलेल्या सेंदाई शहराजवळील समुद्रात 140 किलोमीटर दूर, पण 10 किलोमीटर खोल असा ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. साहजिकच, पाण्याखाली असलेल्या जमिनीत भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याने हललेल्या जमिनीने समुद्रात लाटा निर्माण केल्या आणि त्सुनामी उठली. ह्या लाटा जपानच्या पूर्वोत्तर असणार्या 2100 किलोमीटर लांबीच्या किनार्यावर येऊ लागल्या. सर्वांत जवळच्या ठिकाणी या लाटा किनार्यावर येईपर्यंत 10 मीटर उंचीच्या झाल्या.
त्सुनामी….
त्सुनामी हा शब्दही जपानी आहे. त्सु म्हणजे समुद्रकिनारा आणि नामी म्हणजे लाट (जपानी उच्चार सू-नाह-मी), लाटांची आगगाडी. एकामागे एक उठणाऱ्या लाटा. यामुळे पाण्याची उलथापालथ होऊन पाणी उंच उसळते. ज्वालामुखी, बॉम्बस्फोट यांमुळेही त्सुनामी लाटा उठू शकतात. जर भूकंप 8 तीव्रतेचा असेल आणि केंद्रबिंदू समुद्रात असेल, तर त्सुनामी लाटा उठतात. 8.9 तीव्रतेचा भूकंप म्हणजे एकाच वेळी कोट्यवधी हायड्रोजन बॉम्बांचा स्फोट झाल्यावर बसेल एवढ्या तीव्रतेचा तो धक्का असतो. जेव्हा लाटांची उंची आणि लांबी यांचा गुणाकार छोटा असतो तेव्हा लाटा उठतात. मग या लाटा प्रवेग (अॅक्सलरेशन) आणि गुरुत्वाकर्षण यांच्या गुणाकाराचे वर्गमूळ काढले तर जी संख्या येईल, त्या वेगाने वाहतात. उदाहरणार्थ, पॅसिफिक समुद्राची खोली 4000 मीटर असल्याने तेथे त्सुनामी लाटा 200 मीटर प्रतिसेकंद अथवा 700 किलोमीटर प्रतितास अशा प्रचंड वेगाने वाहतात.
सेंदाई जवळील समुद्रातील केंद्रबिंदू 140 किलोमीटरवर होता आणि तेथे उठलेल्या लाटा 300 किलोमीटर प्रतितास या वेगानेम्हणजे अर्ध्या तासात किनार्यापाशी येऊन थडकल्याने त्सुनामी येत आहे हे समजूनही तयारीला फारसा वेळ मिळाला नाही.
लाटांची ऊर्जालाटांची ऊर्जा तरंगलांबीच्या व्युत्क्रम प्रमाणात जाते. त्यामुळे लाटा जशा किनार्याकडे येतात, तशी त्यांची उंची वाढत जाते. 1960 साली दक्षिण अमेरिकेतील चिली येथे झालेल्या भूकंपामुळे निर्माण झालेल्या त्सुनामी लाटा, पॅसिफिक समुद्रातील 17,000 किलोमीटर अंतर पार करून जपानच्या किनार्याला थडकल्या होत्या, त्या ताशी 700 किलोमीटरचा प्रवास करून 24 तासांत आल्या होत्या. लाटेचा उच्च बिंदू अथवा शीर्ष, लाट पुढे सरकताना खाली वाकतो. यालाच वक्रीभवन म्हणतात.
समुद्राच्या पाण्याचे समुद्राच्या खोलीमुळे वेगवेगळे विभाग पडतात. लाटा जेव्हा असे विभाग पार करतात, तेव्हा लाटांचे शीर्ष बदलते. जमिनीच्या उलथापालथीत जेव्हा जमिनीचा भाग वर उचलला जातो, तेव्हा त्यावर असणारे पाणी वर उसळी मारते. टेक्टॉनिक (जमिनीची संरचना बदलणारे) भूकंप पाण्याखालील जमिनीत जेव्हा होतात, तेव्हा जमिनीच्या उंचसखलपणात फरक होतो, तेव्हा अशा जमिनीवर असणारे पाणी विचलित होऊन हालू लागते. पाणी स्थिर होण्याची खटपट करीत असता, खूप वेळ ते हालत राहते. (हा प्रयोग आपण घरीही करून पाहू शकतो. भांड्यात अर्ध्या उंचीपर्यंत पाणी भरून ते चमच्याने ढवळा. पाण्याची हालचाल होते आणि पाणी स्थिर होईपर्यंत बराच वेळ ते हालत राहते.)
त्सुनामीचा परिणामजमिनीचा प्रचंड भाग जेव्हा अशा हालचालीत भाग घेतो, तेव्हा त्सुनामी लाटा उठतात. जमिनीचे मोठे शिलाखंड जोडापाशी उभे उचलले जातात आणि
एकमेकांवर घासले जातात, तेव्हा आतील ऊर्जा बाहेर पडते आणि त्सुनामी लाटा निर्माण होतात. त्सुनामी लाटा समुद्राच्या खोल पाण्यातून किनार्याजवळच्या उथळ पाण्यात प्रवेश करतात, तेव्हा त्यांचा वेग मंदावतो. त्सुनामी लाटांचा वेग आणि उंची यांचा गुणाकार स्थिर असतो. उथळ पाण्यात लाटा आल्याने लाटांचा वेग मंदावतो आणि लाटेची उंची मात्र वाढते. त्यामुळे किनाऱ्यावर लाटांची भिंत तयार होते. अशा लाटांची भिंत 10 ते 30 मीटर अशी काहीही असते. या लाटांच्या मार्गात आलेल्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान होते. घरे पडतात, झाडे उन्मळतात, माणसे वाहून जातात.
इ. स. 1958मध्ये अलास्का या अमेरिकेच्या वायव्येकडील राज्यात सर्वांत मोठ्या त्सुनामी लाटेची नोंद झाली होती. तेथील लिटू या उपसागरात उसळलेली त्सुनामी लाट 524 मीटर उंच उठली होती. 524 मीटर उंचीची कल्पना आपल्याला फक्त तुलनेनेच करता येईल. ही उंची म्हणजे 175 मजली इमारतीएवढी उंच होईल. अथवा कुतुबमीनारच्या उंचीच्या सातपटीपेक्षा अधिक होईल. अलास्काचा किनारा विरळ लोकवस्तीचा असल्याने त्या वेळी, तेथे फारशी मनुष्यहानी झाली नाही.
आपत्कालीन तयारीजपानच्या 11 मार्चच्या भूकंपाला तोंड द्यायची तयारी जपानने केली होती, कारण जपानला भूकंपाचे धक्के वारंवार बसतात. त्यामुळे भूकंपाला तोंड देण्यासाठी घरबांधणी कशी करायची याची मानके जपानने तयार केली असून ती फार कसोशीने पाळली जातात. त्यामुळेच 1923 सालच्या 8.3 तीव्रतेच्या भूकंपात एक लाख बेचाळीस हजार माणसे मेली असताना आणि 11 मार्चचा भूकंप 8.9 तीव्रतेचा असताना आतापर्यंत 13,000 लोक मृत्युमुखी पडल्याचे वर्तमान आले आहे. हळूहळू अधिक माहिती जमा झाल्यावर तो आकडा खूप वाढला तरी 25-30 हजारांपर्यंत जाईल; पण तो एक लाख बेचाळीस हजार असणार नाही. या आकड्यावरून हेच जाणवते, की असा आपत्काल हाताळायची जपानची तयारी किती आहे.
या वेळी जपानमध्ये भूकंप झाला, दहा मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा उठल्या, ज्वालामुखीचा स्फोट झाला या सगळ्याला तोंड द्यायची तयारी जपानने पूर्वीच केली होती. पण या वेळी आलेल्या चौथ्या संकटाने जपानची भंबेरी उडवली आणि ते संकट म्हणजे फुकोशिमा येथे अणुवीज बनविणारे जे रिअॅक्टर्स आहेत, त्यांना पोहोचलेला धोका. रिअॅक्टरमध्ये अणुभंजन होताना निर्माण होणारी उष्णता वापरासाठी पाण्यामार्फत काढून घेतली जाते. पाण्याची वाफ बनवून त्या वाफेवर टर्बाइन फिरवून त्याला जोडलेल्या जनित्रावर वीज निर्माण केली जाते. त्सुनामीमुळे विद्युत्पुरवठा खंडित झाला. तेथे पाणी येणे बंद झाले. अणुभंजन मात्र चालूच राहिल्याने उष्णता सतत निर्माण होत राहिली. परिणामी, रिअॅक्टर्सचे तापमान आणि दाब वाढू लागला, रिअॅक्टर्सचे स्फोट झाले आणि त्यामुळे किरणोत्सर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाला.
किरणोत्सर्गाचा प्रादुर्भावशुक्रवार दिनांक 11 मार्चला भूकंप झाला; शनिवार दिनांक 12 मार्चला एका रिअॅक्टरचा स्फोट होऊन किरणोत्सर्ग निर्माण झाला; सोमवार दिनांक 14 मार्चला दुसऱ्या रिअॅक्टरचा स्फोट झाला आणि किरणोत्सर्ग सुरू झाला; बुधवार दिनांक 16 मार्चला तिसर्या रिअॅक्टरचा स्फोट झाला आणि किरणोत्सर्ग सुरू झाला. चौथ्याचे भवितव्य अजून माहीत नाही. यामुळे जपानने प्रथम दहा किलोमीटरच्या त्तिज्येतील लोकांना हालविले, नंतर वीस किलोमीटरच्या परिसरातील लोकांना हालविले, मग 30 किलोमीटरच्या परिसरातील लोकांना हालविले.या एकूण प्रकरणाची शहानिशा व्हायला 4-6 महिने जातील. आज जपान त्यांना लागणार्या विजेपैकी 14 टक्के वीज अणुप्रकल्पातून मिळवतो. ही सगळी वीज काही एकट्या फुकोशिमाच्या प्रकल्पातून बनत नाही. परंतु 11 मार्चच्या धोक्यामुळे जपान तर आपल्या सगळ्या अणुप्रकल्पांची पुनर्तपासणी करेलच; पण यामुळे जाग्या झालेल्या जगाने आपापल्या देशातील अणुप्रकल्पांची तपासणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. भारतातही पंतप्रधानांनी असेच आदेश दिले आहेत. भारतातील अणुप्रकल्पांच्या सुरक्षेचा इतिहास चांगला आहे; पण सध्या जैतापूर प्रकल्प चर्चेत आहे. त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्याच्या वेळीच जपानमधील हा अपघात झाल्याने आता त्याचे भवितव्य काय हे हळूहळू समजेल.
अ.पां. देशपांडे
कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद
इ-मेल : apd1942@gmail.com
sunami is most of the natural disaster it can not control but it can prevent.