१९८१ पासून जाहिराती व डिझाईनचे काम करीत असताना प्रत्यक्ष ग्राहक व आम्ही काम करुन देणारे, यांच्यामध्ये ‘मॅनेजर’ उर्फ मध्यस्थी म्हणून काम करणारी एखादी व्यक्ती असायचीच. काम करवून घेणे, त्या कामासाठी वारंवार आठवण करणे अशी त्या व्यक्तीची जबाबदारी असायची.
आम्ही नाटकांची डिझाईन करताना, रवींद्र डिसा निर्मित ‘आण्टी’ या नाटकासाठी वसंत आचार्य हा मॅनेजर आमच्याकडे येऊ लागला. त्याने दिलेल्या फोटोंचा वापर करुन आम्ही डिझाईन केली. त्या कामाचे पेमेंट मॅनेजरने न दिल्यामुळे शेवटी निर्मात्याच्या ऑफिसवर जाऊन, मला ते घ्यावे लागले.
हाच आचार्य पुन्हा भेटला, गजानन सरपोतदारांच्या ‘सासू वरचढ जावई’ चित्रपटाच्या वेळी. त्या चित्रपटाचे प्राॅडक्शनचे काम तो पहात होता. त्या निमित्ताने तो भेटत राहिला. गप्पांमध्ये त्याने शुटींगचे अनेक किस्से आम्हाला सांगितले.
वसंत आचार्य तिसऱ्यांदा भेटला तो अण्णा कोठावळेंच्या नाटकाचा मॅनेजर म्हणून.. अण्णांची पहिली निर्मिती होती, ‘कडी लावा आतली’ या वगनाट्याची. पहिला प्रयोग सासवडला होता. माझ्याकडे फोटो काढण्याचं काम होतं. आम्ही सर्वजण सासवडला गेलो. प्रयोग उशीरा सुरु झाला, उशीराने संपला. मध्यरात्री पुण्यास परतलो. त्यावेळची सर्व व्यवस्था, आचार्यने ‘पुलं’च्या ‘नारायण’ सारखी पार पाडलेली होती.
ज्येष्ठ अभिनेते नरेन डोंगरे यांनी रजनी चव्हाणला घेऊन ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याची निर्मिती केली. त्याची व्यवस्था आचार्याकडेच होती. नरेन डोंगरे आमच्या ऑफिसवर येणार असतील तर वसंत आचार्य आधी येऊन बसायचा. मग त्याच्या तोंडून पुण्या-मुंबईतील नाट्यव्यवसायातील अनेक किस्से ऐकायला मिळायचे. मग डोंगरे यायचे आणि कामाची बोलणी व्हायची.
विवेक पंडित यांनी ‘लफडा सदन’ या नाटकाची निर्मिती केली होती. त्यानंतरच्या सर्व नाटकांसाठी वसंत आचार्यच त्यांचा मॅनेजर होता. त्यामुळे वसंता आला की, कुणीतरी नवीन काम घेऊन येणार आहे, याची आम्हाला खात्री असायची.
नाट्यनिर्माते विजय जोशी यांच्या नाटकासाठी वसंत आचार्य व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. त्या दरम्यान त्याचं अपघाती निधन झालं. पुण्यातील नाट्यनिर्मात्यांच्या अनेक नाटकांसाठी, मॅनेजर म्हणून काम करणारा हा ‘वसंता’, आमचा एकमेव ‘परममित्र’ होता…
दिपक काळे हा बालनाट्यापासून आमच्या परिचयाचा. श्रीराम बडेंच्या बालनाट्य शिबीरातून सुनील महाजन, दिपक काळे, दिपक पंडित असे अनेकजण संपर्कात आले. दिपकने बॅकस्टेजची कामं करत करत मॅनेजरपद मिळविले. सुरेखा पुणेकरच्या ‘नटरंगी नार’ या कार्यक्रमाची डिझाईन व फोटोंची कामं करताना दिपकच्या भेटी होत असत. या कार्यक्रमाने दिपकचे जीवनच बदलून गेले. त्याने खूप प्रगती केली. त्याच्याएवढे जीवनातील चढ-उतार, नाट्य व्यवसायातील दुसऱ्या कुणीही अनुभवले नसतील.
नाट्यनिर्माते केशव करवंदे यांचे डिझाईनचे काम करीत असताना कधी वसंत आचार्य तर कधी राज बागडे येत असे.
नाट्य-सिनेअभिनेत्री आशूचे डिझाईनचे काम करुन घेण्यासाठी प्रमोद दामले येत असत. त्यांनी याआधी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक दादा कोंडके यांचेकडे बरीच वर्षे मॅनेजरचे काम केले होते. त्यांना नाट्यव्यवसायाचा मोठा अनुभव होता. त्यांचे किस्से ऐकून आम्ही त्यांना पुस्तक काढायला सांगितले. त्यांनी ते मनावर घेतले व एका छान पुस्तकाची निर्मिती झाली. त्या पुस्तकाची पहिली प्रत, आम्ही त्यांच्याकडून विकत घेतली..
पांडव निर्मित ‘चौफुला’चे काम करीत असताना त्यांच्या ऑफिसमधील कुंभार नावाचा एक मुलगा काम घेऊन येत असे, त्याला आम्ही जे बोलत असू, त्याचे एकाचे दोन करुन तो मालकाला सांगत असे. साहजिकच ती कामं अशा मॅनेजरमुळे बंद झाली.
अगदी सुरुवातीला आम्ही नगरमधील एका ग्राहकाचे डिझाईन व स्क्रिन प्रिंटींगचे काम करीत असू. त्याच्याकडील गुरू नावाच्या एका अत्यंत ‘गबाळ्या’ माणसातर्फे, तो आमच्याकडे काम पाठवीत असे. छोटे काम असेल तर आम्ही दोन तासात त्याला मोकळे करीत असू. जर प्रिंटींगचे काम असेल तर आठ दिवस मागून घेत असू. एकदा गुरुने ऑफिसवर आल्यावर काम दिले व स्वारगेटला संडासमध्ये गेल्यावर माझे पैसे पडले, असे सांगितले. आम्हाला ते खरे वाटले. आम्ही त्याला वाटखर्चीचे पैसे दिले. त्या ग्राहकाला फोन केल्यावर असे समजले की, त्या गुरूला जुगार खेळण्याचे व्यसन होते. मालकाने दिलेले पैसे तो असे परस्पर खर्च करीत असे. असेही पदोपदी, विद्या शिकविणारे आम्हाला ‘गुरू’ भेटले..
अरविंद सामंत यांच्या चित्रपटांची काम करताना त्यांचे मॅनेजर, नाना देसाई यांच्याशी संपर्क आला. हे नाना, सामंतांच्या अनुपस्थितीत स्वतः सामंत असल्यासारखे वागत. त्यांना मोठ्या आवाजात बोलण्याची सवय होती. हा डरकाळी फोडणारा वाघ, सामंत दोन दिवसांसाठी मुंबईहून पुण्याला आल्यावर शेळीसारखा वागत असे.
‘बिनधास्त’ चित्रपटाचे काम करीत असताना सादिक चितळीकर नावाचा प्रॉडक्शन मॅनेजर आमच्याकडे येत असे. सर्व कामं व्यवस्थित झाल्यावरही, पुढच्या चित्रपटाच्या वेळी मात्र त्याने आमच्याशी संपर्क केला नाही..
‘तू तिथं मी’ चित्रपटाच्या निमित्ताने संजय ठुबे यांनी अनमोल सहकार्य केलं. अशी माणसं फार दुर्मिळ असतात.
दादा कोंडके यांच्या ‘वाजवू का?’ चित्रपटाचे स्थिरचित्रण व जाहिरातींचे काम केले. दादांकडे जितेंद्र गोळे नावाचा सेक्रेटरी होता. त्याच्या मध्यस्थीने दादांच्या भेटीगाठी व डिझाईनची कामं होत असत.
अलीकडे मॅनेजर हा प्रकार राहिलेलाच नाही. जो तो प्रत्यक्ष येऊन काम करुन घेऊन जातो. गेल्या काही वर्षांपासून कामांची संख्याही कमी झाली. कोरोनामुळे तर गेले दिड वर्ष कामं ठप्पं झालेली आहेत. नाटक, चित्रपटांची थिएटर बंद आहेत.. पुन्हा परिस्थिती मूळपदावर आल्यानंतर कामांना सुरुवात होईल.. तोपर्यंत हे ‘स्मरणरंजन’ लेखन, चालूच ठेवायचं…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१८-७-२१.
Leave a Reply