नवीन लेखन...

जानेवारी १६ : सीमारेषा बनली पोलिसरेषा – बॉडीलाईनचा कहर

१३ जानेवारी १९३३ रोजी अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा सामना अ‍ॅडलेड ओवलवर सुरू झाला. हा सामना कालबद्ध नव्हता. निकाल लागेपर्यंत तो खेळला जाणार होता. डग्लस जार्डिनने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा डाव ३४१ धावांवर संपुष्टात आला.

तारीख १४ जानेवारी. इंग्लंडचा पहिला डाव सुरू झाला. पारंपरिक क्षेत्ररचना ठेवून लार्वूड आणि गबी अ‍ॅलनने गोलंदाजीची सुरुवात केली. लवकरच अ‍ॅलनने फिंगल्टनला बाद केले आणि पुढच्या षटकात लार्वूडचा एक चेंडू वुडफूलला लागला, छातीवर. मैदानावर उपस्थित असणार्‍या अर्ध्या लाखाहून अधिक लोकांनी आवाज केला. बिनटोल्या डॉन ब्रॅडमनला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात जार्डिन ओरडला, ‘वेल बोल्ड, हॅरल्ड’.

क्रिकेटच्या जन्मभूमीच्या संघाच्या कप्तानाने परदेश दौर्‍यावर शरीरवेधी गोलंदाजीसारखे तंत्र वापरावे ही सभ्यांच्या खेळाला काळिमा फासणारी घटना होती. मुद्दामहून फलंदाजाच्या छाताडाच्या दिशेने आपटबार आदळायचे, लेगसाईड खेळण्यासाठी मुश्किल करून ठेवायची – पाच-पाच क्षेत्ररक्षक लावून – आणि फलंदाजाचा अंत पहायचा असे हे तंत्र होते. यातील सर्वात वाईट गोष्ट अशी की फलंदाजाला गंभीर इजा होण्याचा संभव अशा गोलंदाजीतून उद्भवतो.

वुडफूल सावरला आणि पुन्हा खेळण्यासाठी उभा राहिला तेव्हाही जार्डिनने शरीरवेधी क्षेत्ररचना बदलली नाही. ब्रॅडमन आणि स्टॅन मॅक्केब लवकरच बाद झाले. बिल पॉन्सफोर्ड मुद्दामहून चेंडू अंगावर घेऊ लागला. अखेर वुडफूल बाद झाला तेव्हा कांगारूंची अवस्था ४ बाद ५१ अशी झालेली होती. इकडे पेल्हॅम वॉर्नर (फ्लॅशबॅकमध्ये पोंद्या वॉर्नर या शीर्षकाच्या फ्लॅशमध्ये हे साहेब आहेत) तेव्हा एमसीसीचे व्यवस्थापक होते. वुडफूलची वार्ता घेण्यास ते इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये आले तेव्हा वुडफूल त्यांना म्हणाला, “तुमचे तोंड पाहण्याची माझी इच्छा नाही मिस्टर वॉर्नर. इथे असलेल्या दोन संघांपैकी एकच संघ क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो आहे, दुसरा नाही.” त्याने हेही जोडल्याचे सांगण्यात येते : “हा सुंदर

खेळ नासवणार्‍या काही लोकांना

हाकलण्याची गरज आहे.”

१५ जानेवारी हा विश्रांतीचा दिवस होता.

१६ जानेवारीला ही बातचीत लोकांपर्यंत पोहचली. वॉर्नरच्या मते जॅक फिंगल्टनने ती फोडली होती (कांगारुंचा सलामीचा फलंदाज). ८५ धावा काढून पॉन्सफोर्ड अखेर लेग ट्रॅपची शिकार ठरला. नंतर क्लॅरी ग्रिमेट बाद झाला. जार्डिनने नवा चेंडू घेतला आणि लार्वूडचा एक चेंडू बर्ट ओल्डफील्डच्या बॅटला चाटून डोक्याला लागला. बर्ट कोसळला. लार्वूडने क्षमा मागितली पण बर्ट उत्तरला : “दोष तुझा नव्हता, हॅरल्ड.” वुडफूल मैदानावर आला आणि बर्टला घेऊन गेला.

प्रेक्षकांमध्ये प्रचंड प्रक्षोभ पसरला. मैदानाच्या सीमारेषांवर पोलिस उभे केले गेले आणि हत्यारबंद पोलिसांची कुमक तयार ठेवण्यात आली. जार्डिन मुद्दाम सीमारेषेजवळ उभा राहिला पण संत्र्याची साल लागल्यावर सरकला…

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..