१८ जानेवारी १९७२ रोजी विनोद गणपत कांबळीचा जन्म झाला. आपल्या निसर्गदत्त प्रतिभेला पैलू पाडण्यात आणि तिला उचित न्याय देण्यास कांबळी असमर्थ ठरला आणि त्यामुळेच तो दीर्घकाळ भारतीय संघाकडून खेळू शकला नाही असे नेहमी बोलले जाते. सचिन तेंडुलकरसारख्या त्याच्या शाळूसोबत्याच्या तुलनेत तर हे अधिकच उठून दिसते.मुंबईतील एका
सामान्य कुटुंबात विनोदचा जन्म झाला. सरावासाठीही मोठे मैदान उपलब्ध नव्हतेच. चेंडू जितका जास्त उंचावर जाईल तितक्या धावा अधिक अशा दंडकांमध्ये कांबळीचे बालपण गेले. विनोद कांबळी हा फिरकीपटूंचा कर्दनकाळ का ठरे याचे उत्तर त्याच्या या बालपणात दडलेले आहे. सचिनसोबत सेंट झेवियर्सविरुद्धच्या सामन्यात विनोदने ६६४ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. या दोघांचेही गुरुवर्य आचरेकर सर यांच्या आग्रहावरून डाव घोषित केला जाण्यापूर्वी विनोदने या डावात ३४९ धावा काढलेल्या होत्या. सचिन-विनोदला एकत्र खेळताना पाहिलेल्या अनेकांच्या मते विनोदचा खेळ सचिनपेक्षा उजवा होता. रमाकांत आचरेकर सरांनाही सचिनपेक्षा विनोदच जास्त नाव कमावेल असे वाटले होते.झाले मात्र उलटेच. सचिनच्या रणजी पदार्पणानंतर तीन वर्षांनी विनोद कांबळीचे रणजीपदार्पण झाले. रणजी स्पर्धेत सामना केलेल्या पहिल्यावहिल्या चेंडूवर विनोद कांबळीने षटकार मारला होता ! २९ जानेवारी १९९३ रोजी विनोद कांबळीचे कसोटीपदार्पण झाले ईडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्ध. १६ आणि नाबाद १८ धावा त्याने पदार्पणात काढल्या. तिसर्या कसोटी डावात त्याने आपले पहिले अर्धशतक झळकावले. १९ फेब्रुवारी १९९३ रोजी वानखेडे स्टेडिअमवर सुरू झालेल्या कसोटीत विनोद कांबळीने आपले पहिले शतक झळकावले – प्रत्यक्षात ते होते द्विशतक – २२४ धावा. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील केवळ चौथाच डाव होता. पाचव्या डावातही त्याने
्विशतक झळकावले. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर झिम्बाब्वेविरुद्ध २२७ धावा !कारकिर्दीतील सहाव्या डावातही कांबळीने शतकाचा उंबरठा ओलांडला. श्रीलंकेविरुद्ध सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर १२५ धावा !सातव्या डावात चार धावांवर बाद होऊन अखेर कांबळी सामान्य
माणसांमध्ये आला. त्याला राहवलेच नसावे : आठव्या डावात त्याने पुन्हा शतक केले : १२० धावा. यानंतर अनुक्रमे डावांमध्ये त्याने ५, ८२, ५७, ९, १९ आणि ४० अशा धावा काढल्या. पहिल्या चौदा कसोटी डावांनंतर अशा रीतीने कांबळीच्या खात्यात १००५ धावा जमा झालेल्या होत्या. यापुढच्या दोन्ही डावांमध्ये त्याला भोपळाही फोडता आला नाही.ऑगस्ट २००९ मध्ये कांबळीने मुंबईत खेल भारती स्पोर्ट्स अकादमी स्थापन केली. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोक भारती पक्षातर्फे उमेदवार म्हणून कांबळी विक्रोळी मतदारसंघातून उभा होता पण तो पराभूत झाला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply