नवीन लेखन...

जपणुक भारतीय संस्कृतीची

 

‘हॅलो फ्रेंडस्!

वुई आर इंडियन्स अँड हॅव प्राऊड टू बी इंडियन्स !’

हे वाक्य होतं हॅलिफक्समधील ‘इंडिया फेस्टीव्हल’ कार्यक्रमातलं. मी ते ऐकलं नि छाती अभिमानाने भरून आली. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच सूत्रसंचालक बोलत होता. त्याचे ते शब्द केवळ शब्द नव्हते; तर स्वदेश प्रेमाने भारलेला मंत्रोच्चार होता, भारतीय असल्याचा त्यात गर्व होता, त्यात होती भारतीय संस्कृतीची महती! ज्या शिकागो शहरात स्वामी विवेकानंदांनी,हिंदुत्व हा एक संस्कार आहे, जगण्याची एक जीवन पद्धती आहे, बंधुत्वाचा एक साक्षात्कार आहे’ हे जगाला पटवून दिलं, त्याच अमेरिका खंडातल्या एका दुसऱ्या शहरात

गर्वसे कहो, हम भारतीय है’

असेच जणु ती व्यक्ती अभिमानाने सांगत होती. कॅनडातील अनेक गोष्टी मला भावल्या, अनेक गोष्टींनी भुरळ घातली, त्या पाहून मी प्रभावित झालो, परंतु भारतीयत्वाचा अभिमान मनांतून यत्किंचितही कमी झाला नव्हता. जिथे जाईन, तिथे भारतीयत्व शोधण्याचा प्रयत्न करीत होतो.

एक दिवस हॅलिफॅक्स फोर्ट पहाण्यासाठी जात असता, रस्त्याच्या बाजुला इंडिया फेस्टीव्हल कार्यक्रमाची लावलेली जाहिरात वाचली नि मनाला स्वाभाविक ओढ लागली….. मायभुमीपासून दूर आलेल्या या अनिवासी भारतीयांना भेटण्याची, त्याना जाणून घेण्याची नि स्वदेशाविषयीच्या त्यांच्या भावना समजून घेण्याची! मी कन्येकडे तसे बोललो. कार्यक्रम रविवारीच होता, त्यामुळे आम्हाला कार्यक्रमाला घेऊन जाण्यात त्यांना कोणती अडचण नव्हती.

ठरल्या प्रमाणे आम्ही कार्यक्रमस्थळी येऊन दाखल झालो. प्रथमदर्शनी भारतातच आल्यासारखे वाटले. तीन महिने कॅनडात होतो. घरचे लोक वगळता क्वचितच भारतीय लोकांचे दर्शन व्हायचे. बाहेर फिरायला गेलो की, ‘हाय,…. हॅलो !’ शब्दांची कानाना आता सवय झाली होती. गोरे लोक वाटेत भेटायचे, कॅनडाच्या इंग्रजीत बोलायचे. त्यातील बरेचसे डोकीवरून जायचे. परंतु जमेल तसा मी माझ्या इंग्रजीत त्यांच्याशी संवाद साधायचो. त्यांच्या एका गोष्टीने मला भुरळ घातली नि ती म्हणजे त्यांचे सौजन्य ! गोऱ्या अनोळखी व्यक्तीसुध्दा आमच्याशी ‘हाय !…… हौऊ आर यु ?’ असे हटकून बोलायच्या. त्यामुळे त्यांच्याविषयी मनात न कळत आपुलकीची भावना निर्माण झाली होती. नाहीतर आपल्याकडे…..! ओळखीची माणसंही मान वाकडी करून जातांना आपण पहातोच की !

रोज येता-जाता कानावर पडणारे इंग़्रजी शब्द, समोर येणारे गोरे चेहरे …… मी कांहीसा होमसिक बनलो होतो. इंडिया फेस्टीव्हल कार्यक्रमात त्यावर इलाज सापडला. बऱ्याच दिवसानंतर आपली माणसं भेटली. आपण विदेशात जातो, तेंव्हा भारताच्या सगळ्याच प्रांतातील तिथे रहाणारी माणसं आपली वाटतात. मन न कळत प्रसन्न झाले. आपल्या लोकांत आल्यासारखे वाटले. हो, आपलेच ते! कित्तेक वर्षे मायभूमीपासून दूर राहूनही ते आपली संस्कृती विसरले नव्हते. भारतीय संस्कारांचे ते जतन करीत होते.
तब्बल तीन महिन्यानंतर भारतीय वेशभुषेतील लोक मी पहात होतो. कित्तेक वर्षे विदेशात राहिल्याने विदेशी संस्कृतीत एकरूप झालेले लोकही कार्यक्रमाच्या निमित्ताने हटकून भारतीय वेशभुषेत आले होते. कोणी साडी परिधान केली होती, कोणी पंजाबी पोशाख घातला होता, कोणी गुजराथी, कोणी तमिळ….. पण भारतीयत्वाच्या जाणीवेने ते आज एकत्र आले होते.

‘विविधतेत एकता; हीच आमची विशेषत:’ हे तत्व ते विदेशातही जतन करीत होते.

हॅलिफॅक्समध्ये स्थायिक झालेल्या भारतीय लोकांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर भारताच्या तिरंग्याच्या जोडीला कॅनडाचा राष्ट्रीय ध्वजही लावला होता. आपल्या मायदेशाबरोबरच ज्या देशात आपण वास्तव्य करतो, जिथे आपण सेवा बजावतो, त्या देशाचाही तेवढाच अभिमान बाळगणं यात दुमत होण्याचं कारण नव्हतं.

भव्य सभागृह, त्यात समोरच्या बाजूला व्यासपीठ. व्यासपीठासमोर प्रेक्षकांसाठी मांडलेल्या खुर्च्या, दोन्ही बाजुला भारतीय वस्तू व खाद्यपदार्थांचे प्रदर्शन वजा विक्री ! सगळेच कांही भारतातल्यासारखे. खुर्च्यांवर बहूसंख़्येने भारतीय लोक बसले होते. गोऱ्या लोकांची उपस्थितीही लक्षणीय होती. भारतीयांमध्ये कोणी मराठी, कोणी तमिळ, कोणी गुजराथी….. त्यात पंजाबींची संख्या अधिक. धर्म, जात, प्रांत, भाषाभेद बाजूला ठेऊन भारतीयत्वाच्या धाग्याने ते एकत्र आले होते. सर्वांना उत्कंठा होती कार्यक्रम पहाण्याची.

‘वुई आर इंडियन्स’

या वाक्यावर साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यात होता देशाभिमान, देशप्रेम नि भारतीय असल्याचा गर्व ! भारतातील कला, संस्कृती, परंपरा यावर अँकरिंग करणारी व्यक्ती बरच कांही बोलली. कित्येक वर्षापासून हे लोक देशापासून दूर आहेत;

परंतु आपल्या मायभुमीला ते विसरले नाहीत, याचा मला सार्थ अभिमानही वाटला.
भारतीय संस्कृतीचं दर्शन घडविणारे एकामागून एक कार्यक्रम सुरू झाले. मी मन लाऊन पहात होतो, एकाग्रतेने ऐकत होतो. भारतात अशा कार्यक्रमाचे तसे महत्व वाटले नसते; परंतु सातासमुद्रापलिकडे गोऱ्यांच्या साम्राज्यात त्याचे प्रदर्शन घडत होते, ही बाब निश्चितच कौतुकास्पद होती. जुन्या लोकांना आपल्या कला, संस्कृती व परंपरांची माहिती आहे; परंतु त्यांची नवी पिढी मात्र या सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञच ! बालपणापासून त्यांच्यावर कॅनेडियन संस्कृतीचा प्रभाव पडलेला. त्यातूनही त्यांच्या मनावर आपली संस्कृती बिंबविण्याची त्यांची ही एक धडपड ! अशा कार्यक्रमांचे आयोजन करून आपण भारतीय आहोत याची नव्या पीढीला जाणीव करून देण्याचा त्यांचा हा एक प्रयत्न होता.

हिंदी, पंजाबी, तमिळ….. भारतीय भाषातील एकामागून एक कार्यक्रम व्यासपीठावर सादर होऊ लागले; मुलींच्या नृत्याने तर भारतीयांचेच नव्हे तर उपस्थित गोऱ्या लोकांचेही चांगलेच मनोरंजन झाले. भारतीय नृत्य प्रकार, गायन, बासरी व व्हायोलिन वादन….. एकापेक्षा एक सरस कार्यक्रम सादर करून मुला-मुलीनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. कित्तेक वर्षे विदेशात राहूनही आपली कला-संस्कृती त्यांनी जतन केली होती. पण एक गोष्ट खटकली, ती म्हणजे इंग़्रजी भाषेच्या प्रभावाची. हिंदीत किंवा स्वत:च्या मायबोलीत ते क्वचितच बोलत. संस्कृती भारतीय; परंतु भाषा मात्र विदेशी अशी त्यांची स्थिती! अर्थात हे बरोबरही होते. भारतातील प्रादेशिक भाषेत शिक्षण देणाऱ्या तिथे शाळाच नाहीत. शिवाय त्यांच्या करियरच्यादृष्टीने त्याचा उपयोगही होणार नव्हता. त्यामुळे इंग्रजी माध्यमाशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नाही. कांही कुटूंबे घरात मातृभाषेत बोलतात. त्यातून नव्या पीढीला आपल्या मातृभाषेचे थोडेफार ज्ञान झाले असेल तेवढेच ! परंतु बहूसंख्य भारतीयांची इंग्रजी हीच आता मातृभाषा बनली आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी नागपूरचे एक मराठी कुटूंब भेटले. त्यांच्या सोबत त्यांची दोन मुलेही होती. 25 वर्षापासून ते कॅनडातच रहात आहेत.

‘आम्हाला मराठी येते; परंतु आमच्या मुलांना मराठी समजतही नाही. आमच्याशी त्यांचा संवाद इंग्रजीतूनच चालतो.’ ते म्हणाले.

बऱ्याच कुटूंबांची हीच अवस्था आहे. परंतु माझ्या व्हँकुव्हरच्या भेटीत मला परिस्थिती कांहीशी वेगळी वाटली. मला तिथले मातृभाषेच्या संवर्धनाचे उपक्रम पाहून कौतुक वाटले. व्हँकुव्हरसह सरी व डेल्टा उपनगरी भागात भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. येथे मराठी, हिंदी, पंजाबी भाषा शिकविण्याचे खासगी वर्ग चालतात. इथल्या मराठी मंडळाने आठवड्यातून दोन दिवस मराठी शाळाही चालविली आहे.

हॅलिफॅक्समधील परिस्थिती काहीशी वेगळी होती. त्यांच्यावर इंग्रजी भाषेचाच प्रभाव अधिक. भारतीय भाषांचे तोकडे ज्ञान असूनही कार्यक्रम बसविण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद होते.

व्यासपीठावरील कार्यक्रम आता अंतिम टप्यात आले होते. माझं लक्ष वेधून घेतलं ते भारतीय वेशभुषेच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमाने. गोऱ्या लोकांना भारतीय साडीचे मोठे कौतूक ! त्याचे प्रत्यंतर आम्ही फिरत असतांना अनेक वेळा मला आले होते. आम्ही फिरायला गेलो असता सौभाग्यवतींची साडी पाहून-

‘ओऽ, ब्युटीफुल, व्हेरी नाईस !’

असे गोऱ्यांचे उद्गार मी ऐकले होते. इंडिया फेस्टीव्हल कार्यक्रमांत गोऱ्या महिलेला साडी परिधान करण्याचा एक अनोखा कार्यक्रम आयोजकांनी मोठ्या कल्पकतेने आयोजित केला होता. निमंत्रित गोरी महिला व्यासपीठावर आली. एका भारतीय महिलेने साडी आणि साडीचे प्रकार याविषयी इंग्रजीतूनच माहिती दिली. साडी परिधान करण्याची पध्दत सांगत तिने गोऱ्या बाईला साडी नेसविली. मुळातच सुंदर असलेल्या त्या गोऱ्या महिलेचं सौंदर्य भारतीय साडीत अधिक खुलून दिसत होतं. त्या महिलेलाही साडीचे तेवढेच नवल वाटले असावे. समोरच्या प्रेक्षकांना भारतीय पध्दतीने हात जोडून तिने ‘नमस्कार’ केला. उपस्थितांनी टाळ्यावाजवून तिचे कौतुक केले. फॅशन शोत सुंदर मॉडेलने साडीचे प्रदर्शन करीत ठुमकत, ठुमकत जावे, तशी ती व्यासपीठावरून खाली उतरली.

साडी….. स्त्रीचे सौंदर्य खुलविणारा एक अलंकार, तर फेटा पुरूषाच्या पराक्रमाची बहार ! मग तो मराठमोळा केसरी मर्दानी फेटा असो, गुजराती वा मोरपंख़ी पंजाबी! फेटा घातला की पुरूषाचा भारदस्तपणा वाढतो. साडीच्या प्रात्यक्षिकानंतर फेटा बांधण्याचा कार्यक्रम झाला. एका गोऱ्या पुरूषाला व्यासपीठावर बोलाऊन त्याला फेटा बांधण्यात आला. परंतु हा मराठमोळा फेटा नव्हता, तो होता पंजाबी! त्यामुळे मन कांहीसे नाराज झाले; परंतु किमान एक भारतीय कलाविष्कार गोऱ्या लोकांपुढे सादर केला गेल्याचा सार्थ अभिमान वाटला. फेटाधारी गोरा रुबाबात व्यासपीठावर फिरून खाली उतरला नि प्रेक्षकांनी त्याचंही टाळ्याच्या गजरात कौतुक केलं.

अजूनही कार्यक्रम बाकी होता. रात्रीचे साडेआठ वाजले होते. उन्हाळ्यात तिथे रात्री नऊ वाजेपर्यंत लख्ख प्रकश दिसतो नि पहाटे चार वाजताच संधी प्रकाश दिसू लागतो. आम्हाला आता घरी परतने भाग होते. सभागृहाच्या दोन्ही बाजूला विविध भारतीय वस्तूनी स्टॉल सजले होते. एका बाजुला भारतीय पध्दतीचे तयार कपडे, साड्या,  बांगड्या, विभुषणे, खेळण्या….. एक ना अनेक ! स्टॉलमधून वस्तूंचे प्रदर्शन वजा विक्री सुरू होती. दुसऱ्या बाजुला भारतीय खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री करण्यात येत होती. कामधंद्याच्या निमित्ताने भारतातून आलेले लोक आता अनिवासी भारतीय बनले होते. त्यांच्या मुलांचा तिथेच जन्म झाल्याने ते जन्माने कॅनडाचे नागरिक होते. कित्तेक वर्षे विदेशांत राहूनही त्यानी आपली संस्कृती जतन केली होती. कोणाही भारतीयाला त्यांचा अभिमानच वाटावा!

15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्य दिनही येथे मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात येतो. या निमित्तांनेही अशाच सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रदर्शन पहाण्याची संधी मिळाली. विदेशात राहूनही देशाभिमान व भारतीय संस्कृतीचे जतन करण्याची त्यांची धडपड पाहून  मन भरून आले.

***

अध्यात्म ही भारतीयांची शक्ती, मानसिक स्वास्थ्य व आत्मिक बळ प्राप्त करून देणारं माध्यम ! जगात वैज्ञानिक क्रांती झाली, तरी भारतीयांनी आपली अध्यात्माची परंपरा सोडलेली नाही. कॅनडात आलेल्या बहूसंख़्य लोकांमध्ये पदवीधर त्यातही तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक…. नोकरीच्या निमित्तांने त्यांनी देश सोडला; परंतु आपली आध्यात्माची परंपरा कायम जतन केली.

मंदिर म्हणजे भारतीय संस्कृती आणि संस्कारांचे केंद्र ! भारतीय लोक जिथे, जिथे गेले, तिथे त्यांनी मंदिरं उभारली, आपल्या धार्मिक, अध्यात्मिक परंपरा जपल्या. कॅनडात भारतीयांची संख्या तर लक्षणीय !  त्यामुळे हिंदू मंदिर नाही, असे एकही शहर सापडणार नाही.

कॅनडात आल्यापासून मंदिरात जाण्याचा योग आला नव्हता. त्यात सौभाग्यवती धार्मिक वृत्तीच्या. दर संकष्टीला मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेण्याचा त्यांचा परिपाठ कायम होता. आता कॅनडात आल्यानंतर त्यात खंड पडणार अशी त्यांना धास्ती वाटली. इथे कुठे गणेशाचे मंदिर आहे का ? तिने कन्येकडे सहज चौकशी केली. जावईबापूंनी ते ऐकले नि लागलीच म्हणाले,

‘मम्मी, उद्या आपण सारेच मंदिरात जाऊ. रविवारी इथल्या हिंदू मंदिरातून विशेष कार्यक्रम असतो.’

जावईबापू व कन्येलाही रविवारची सुटी होती.  आम्ही मंदिराशेजारी आलो. इमारतीला आपल्याकडील मंदिराचा साज नव्हता; परंतु सुंदर नि निटनेटकी इमारत मन वेधून घेणारी होती. मंदिरासमोर स्वामी विवेकानंदांचा पुतळा होता. अमेरिका, कॅनडातील लोकांत स्वामी विवेकानंदांबद्दल आदराची भावना आहे. स्वामीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत स्वामीजीनी हिंदु धर्माची महती, हिंदू धर्मातील बंधुत्वाची भावना दाखवून दिली  होती. त्यांच्या विचारने प्रभावित झालेले असंख़्य अनुयायी आजही केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण अमेरिका खंडात आहेत. विवेकानंदामुळेच भारतीय संस्कृतीची खरी ओळख जगाला झाली. या महामानवाच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या प्रार्थनागृहात गेलो.

भव्य सभागृह ! समोर विविध हिंदू देव-देवतांच्या मनोवेधक मुर्त्या विराजमान झालेल्या. भटजींचा मंत्रोच्चार सुरू होता. सभागृहात ओळीने मांडलेल्या खुर्च्यांवर हिंदु भाविक आसनस्थ झाले होते. सभागृहात उदबत्तीचा आल्हादकारक सुगंध दरवळत होता. आम्ही रिकाम्या खुर्च्यांवर आसनस्थ झालो. सभागृह भरगच्च भरलेले; परंतु भटजींच्या मंत्रोच्चाराशिवाय सगळे कसे शांत व शिस्तबध्द! इतकी निरव शांतता, स्वच्छता, शिस्त नि भक्तांमधील उत्कट भक्तीभाव भारतातील मंदिरात मी क्वचितच पाहिला आहे.

मंदिरात विधिवत पूजा संपन्न झाली. सामूहीक आरतीचा कार्यक्रम झाला. दर रविवारी इथे विशेष प्रार्थना व महाप्रसादाचे आयोजन असते. आठवडाभर आपल्या कामात व्यग्र असलेले भाविक रविवारी मंदिरात येऊन प्रार्थना करतात. माणसिक व आत्मिक स्वास्थ्य मिळवितात. भारतातून ईथे आलेल्या लोकांत बहूसंख्य अभियंतेच आहेत, आधुनिक विज्ञानाची त्यांनी कास धरलेली असली तरी, त्यांची  अध्यात्मिक भावना कमी झालेली नाही.

‘मंदिरात आल्यानंतर आत्मिक बळ व माणसिक स्वास्थ्य लाभते…. त्यातून आमची कार्यशक्ती वाढते’, अशी भावना एका भारतीय अभियंत्यांने आमच्याजवळ बोलून दाखविली.

शिवाय त्यांना इथे भेटतात स्वदेशी बांधव, त्यातून एकमेकाशी परिचय होतो, स्नेहभाव वाढीस लागतो. अशीच अनेक हिंदू देवदेवतांची मंदिरे मी टोरेंटोमध्ये पाहिली, व्हॅंकुव्हरमध्ये पाहिली….. मंदिरांमध्येच भारतीय लोकांच्या गाठीभेटी झाल्या; बऱ्याच गोष्टींची त्यांच्याकडून माहिती मिळाली. कित्येक वर्षापासून हे लोक स्वदेशापासून दूर सातासमुद्रापार रहातात, तरीही त्यांनी आपले भारतीयत्व सोडलेले नाही.


….. (मनोहर) बी. बी. देसाई

 

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 23 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..