नवीन लेखन...

जरा विचार करा

विक्रोळाच्या पार्क साईट पोलीस स्टेशनचे सब-इन्स्पेक्टर प्रमोद पवार आपल्या समोर बसलेल्या वृद्ध माणसाकडे आणि त्याच्या बरोबर आलेल्या एका सात-आठ वर्षाच्या चुणचुणीत मुलाकडे मोठ्या आश्चर्याने पाहत होते. त्या वृद्ध माणसाने आणलेली तक्रारच फार अजब होती. त्यांच्या बरोबर आलेल्या त्या छोट्या मुलाच्या अपहरणाची ती तक्रार होती.

आता तुम्ही म्हणाल अशी अपहरणे नेहमी होत असतात, त्यात अजब ते काय? हो, खरे आहे. पण बहुतेक अपहरणे ही खंडणी वसुलीसाठी होतात. त्यात एखाद्या लहान मुलामुलीचे, क्वचित मोठ्या व्यक्तीचेही अपहरण होते. मग एक / दोन दिवस घरातील माणसांना यथोचित ताणतणाव दिला जातो. मग कोणीतरी एखादा फोन करतो. भाईच्या रुबाबात धमकी देतो की, अमुक अमुक रक्कम, अमुक अमुक ठिकाणी पोहोचवा. पोलीसांच्या नादी लागलात तर याद राखा. तुमचा मुलगा किंवा जिचे अपहरण झाले ती व्यक्ती पुन्हा जिवंत दिसणार नाही. असा सज्जड दम दिला जातो. आणि शंभरातले नव्वद टक्के असे गुन्हे हे एखाद्या श्रीमंत, मालदार, धंदेवाला, कारखानदार, डॉक्टर किंवा तशाच पैसेवाल्या लोकांच्या बाबतीत घडतात. जिथे खंडणी मागणाऱ्याला चागल्या उत्पन्नाची खात्री असते ! ही सर्वसाधारणपणे अपहरणामागची कार्यप्रणाली असते. पण इथे उलटा प्रकार होता.

ते वृद्ध आजोबा एक निवृत्त गिरणी कामगार. त्यांचा नातू एका म्युनिसिपल शाळेत इयत्ता दुसरीत. त्याचे आई-वडील सामान्य नोकरदार. तर या अशा कुटुंबातील मुलाचे अपहरण होते आणि त्या मुलाच्या आई-वडिलांकडे नाही तर त्या मुलाकडेच दहा हजार रुपयाची खंडणी मागितली जाते आणि उद्या दुपारपर्यंत घेऊन ये, नाहीतर तुला ठार मारीन अशी धमकी देऊन त्याला सोडण्यात येते. म्हणजे आहे की नाही अजब? ना कभी देखा ना कभी सुना ! पण ते आजोबा तर हीच तक्रार घेऊन गुन्हा नोंदवायला आले होते.

तक्रार अशी होती, श्री. नामदेव सकपाळ याचा नातू मनोज गायकवाड, नामदेवरावांच्या मुलीचा मुलगा, आज शाळेतून दोन तास उशिरा आला. उशीर का झाला म्हणून त्याला विचारले तर त्याने सांगितले की तो शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे घरी यायला निघाला तेव्हा वाटेतच त्याला एका गुंडाने पकडले म्हणे. तो त्याला शाळेच्या मागे घेऊन गेला. त्याचे हात बांधले. त्याला एका लोखंडी पाईपाला जखडले, दोन मुस्कटात दिल्या आणि धमकावले की, उद्या दुपारपर्यंत दहा हजार रूपये घेऊन इथेच ये. कोणाला सांगशील तर खबरदार ! नाही आलास तर तुला मारून टाकीन. दोन तास बांधून ठेवल्यावर त्याने मला सोडले, मग मी घरी आलो.

आता धमकी देणारा इतक्या लहान मुलाला काय धमकी देणार ? शिवाय त्याला सोडून देऊन त्याला एवढे पैसे आणून दे म्हणून कसा सांगेल? इन्सपेक्टर पवारांना सगळाच मामला गडबडीचा वाटत होता. बरे त्या छोट्या पोराला आत घेऊन चौकशी करणे शक्य नव्हते. त्याच्याशी गोडीगुलाबीनेच घेणे भाग होते. त्यांनी वरिष्ठांना तक्रारीची माहिती देऊन सल्ला विचारला. तर मुलगा सुखरुप आहे ना? आणि उद्या दुपारपर्यंत वेळ आहे तेव्हा तपास करा. सध्या तरी फार गंभीर वाटत नाही असा सल्ला मिळाला. पोलीसांचे कामच आहे, अहर्निश सेवामहे । गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता आपले काम करावे लागते. कदाचित काही कौटुंबिक दुश्मनीचाही प्रकार असेल, काय सांगावे? आणि उद्या यातून काही भानगड उत्पन्न झाली, पोराचा जीव गमवायची पाळी आली तर आम्ही आधीच तक्रार केली होती, पण गरिबाला कोण वाली? असा प्रकार व्हायचा! पेपरवाले तर अशा वेळी टोचायला बसलेलेच असतात. तेव्हा तक्रार नोंदवून पुढचा तपास करायचे त्यांनी ठरवले.

ड्युटी हवालदार माने यांना बोलावून तक्रार दस्त करून घेतली आणि ते आजोबांना आणि नातवाला गाडीत घालून त्यांच्या घरी रवाना झाले.

घर कसले? एक जुनाट चाळ होती. तिथे पहिल्या मजल्यावर मनोजचे वडील प्रकाश गायकवाड, आई प्रमिला गायकवाड राहत होते. पुढे बैठकीची खोली, मांगे स्वयंपाकघर – मोरी एवढेच घर. समोर सगळ्या खोल्यांना जोडणारा व्हरांडा, पोलीस आले पाहताच आजूबाजूचे लोक गर्दी करू लागले. एवढ्यात मनोजचे आई-वडीलही आले. त्यांना ही हकिगत समजली तशी प्रमिला, मनोजची आईपण धास्तावली. गायकवाडांचे वडील नुकतेच वारले होते. घरी वडीलधारे कोणी नव्हते. दोघेही आई-वडील कामासाठी बाहेर जायचे ते संध्याकाळी उशिरा यायचे. मनोजकडे लक्ष द्यायला कोणी नव्हते म्हणून प्रमिलाने आपल्या वडिलांना रोज संध्याकाळी थोडा वेळ घरी यायला सांगितले होते. ते तिथे जवळच लुईसवाडीत राहत होते. मनोज शाळेतून आला की त्याला काही खायला घ्यायला द्यायचे. मग तो चाळीतच खेळायला जायचा किंवा टीव्ही पाहत बसायचा. आजोबा शेजारी शिंदेकाकाकडे गप्पाटप्पा करून प्रमिला आल्यावर परत जायचे ते अत्यंत तापट स्वभावाचे होते. मनोजला यायला थोडा जरी उशीर झाला तरी ते भयंकर संतापायचे. त्याला झोडपायचे. त्यांचा असा जबरदस्त धाक होता. त्यामुळे मनोजची उशिरा यायची हिंमतच नव्हती. घरातल्या लोकांशी जुजबी चर्चा करून पवार साहेबांनी शाळेकडे मोर्चा वळवला.

मनोजने त्यांना शाळेच्या मागे नेले. तिथला लोखंडी पाईपही दाखवला. आसपासची पाहणी उरकून त्याना घरी सोडले. त्याच चाळीत मनोजच्याच शाळेत जाणाऱ्या काही मुलांकडे चौकशी केली तेव्हा शाळा सुटल्यावर तो त्यांच्या बरोबरच बाहेर पडला हे त्यांनी सागितले. पण तो घरी आला किंवा नाही हे त्यांना सांगता आले नाही. एकदा शाळा सुटली म्हणजे मुलं घराच्या ओढीनं धूम पळत सुटतात.

ज्याला-त्याला आपल्या घरी जायची घाई! एवढेच समजले की तो शाळा सुटेपर्यंत तरी होता. पुढचे शोधायचे होते. पवार साहेबांनी प्राथमिक तपासणी उरकली. त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. परंतु एक स्पष्ट झाले की त्या काही कौटुंबिक वैमनस्य, प्रॉपर्टीच्या, पैशाच्या भानगडी नाहीत. आजोबांच्या धाकामुळे मनोज वेळेवर घरी येत होता. उशिरा येण्याची त्याची हिंमतच नव्हती. तसा तो फार लहान होता त्यामुळे दोन- अडीच तास उशिरा येण्याचे त्याचे कारण चिंताजनक होते. पवारसाहेबांनी आजची इतर कामे उरकून उद्या सकाळीच या केसचा तपास थंड डोक्याने करायचे ठरवले. परत आल्यावर त्यांनी डयुटी हवालदार माने, सावंत, पाडले यांना उद्या सकाळी म्युनिसिपल शाळेच्या आसपास साध्या वेषात फिल्डिंग लावायच्या सूचना दिल्या. कोणीही संशयास्पद हालचाल करताना दिसले तर लक्ष ठेवा अशा सूचना दिल्या आणि आजचे काम संपवून ते निघाले. त्यांनी उद्या मनोजला नेहमीप्रमाणे शाळेत पाठवा, घाबरू नका अशाही सूचना त्याच्या आई-वडिलांना आजोबांना दिल्या होत्या. मी उद्या ठीक साडेदहा वाजता शाळेत येतो असे बजावून ते घरी गेले.

दुसरे दिवशी सकाळी साडेदहा वाजता ते शाळेत गेले. मुख्याध्यापकांची भेट घेतली त्यांना सर्व प्रकार सांगितला. शाळेत याची काहीच माहिती नव्हती.

मुख्याध्यापिका बाईपण आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी ताबडतोब मनोजच्या वर्गशिक्षिका सौ माने यांना बोलावले. त्या आल्या. तिथे बसलेला पोलिस अधिकारी पाहून त्या दचकल्या. त्यांना कळेना की त्यांना कशाला बोलावले ?

या या माने बाई.  हे इन्स्पेक्टर पवार साहेब. तुमच्या क्लासमध्ये तो मनोज गायकवाड आहे ना त्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाला त्यांना त्या संबंधित थोडी चौकशी करायची आहे.

”अपहरण? मनोजचे? काय सांगता काय?”

“होय मानेबाई त्याने स्वतःच तसे सांगितले आहे. तुमचे मनोजबद्दल काय मत आहे?”

“पवारसाहेब, मनोज तसा चांगला मुलगा आहे. अभ्यासात फारशी गती नाही पण धीट आहे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये चांगली कामे करतो. यंदाच्या कार्यक्रमात त्याने एका छोट्या नाटिकेत छान काम केले आणि एक रेकॉर्ड डान्सचा आयटेमही अगदी धमाल केला.”

“असं? कोणत्या रेकॉर्डवर?”

“अहो अलीकडे मुलांना ते गोविंदा, सलमान, संजय, हृतिक यांचे फार वेड असते. त्याने गोविंदाचा एक डान्स तो, उसने बोला केम छे? केम छे? केम छे? मैने बोला ए तो प्रेम छे। प्रेम छे। प्रेम छे! अगदी हुबेहूब गोविंदा स्टाईलमध्ये केला. तसा फार चुणचुणीत आहे मनोज !”

“असं का? बरं चला आपण भेटू त्याला.”

दोघे वर्गावर आले. वर्गात शिक्षिका नसल्यामुळे पोरांनी वर्ग अगदी डोक्यावर घेतला होता. त्या दोघांना आत येताना पाहताच एकदम चिडीचूप झाला वर्ग. सगळी पोरं आज नवीनच आलेल्या पोलीसाकडे आश्चर्याने पाहत होती. पवारसाहेबांनी एकदा सर्व वर्गावरून नजर फिरवली. त्यांना मनोज दिसला. त्याच्याच शेजारी बसलेल्या मुलाकडे बोट करून पवारसाहेबांनी त्याला जवळ बोलावले. तो घाबरत घाबरतच पुढे आला.

“काय रे तुझे नाव काय?”
“सुरेश भोळे”
”चल जरा. ये. माझं काम आहे तुझ्याकडे.”
सुरेश, सौ माने आणि पवारसाहेब वर्गाच्या बाहेर आले.

“काय रे सुरेश, तुझ्या शेजारी बसतो तो मनोज तुझा दोस्त ना?”
“हो साहेब”
“मग मला सांग शाळा सुटल्यावर काल संध्याकाळी तुम्ही घरी गेलात का दुसरीकडे कुठे”

पवारांनी हा प्रश्र अगदी सहजच मुलाला बोलते करावे म्हणून विचारला होता. पण त्याचे उत्तर ऐकून त्यांनाच आश्चर्यचकित व्हावे लागले.

“काल ना? काल मनोज माझ्या घरी आला होता”
“’तुझ्या घरी? कशाला?”
“आम्ही पूर्वी मनोजच्याच चाळीत रहात होतो. आता आम्ही नाईकवाडीत दुसरी चांगली जागा घेतली आहे. मनोज म्हणाला, चल आज तुझ्या घरी जाऊ तुझी जागा पहायला. मी म्हणालो. पण मनोज तुला उशीर होईल ना घरी जायला? तुझे आजोबा मारतील तुला. मनोजचे आजोबा त्याला घरी यायला उशीर झाला की खूप झोडपतात. मला माहीत आहे पण मनोज म्हणाला काही नाही रे, मी बघेन काय करायचे ते. तू चल. मग आमची जागा पाहिली. थोडा वेळ आमचा टीव्ही बघितला आणि सहानंतर तो घरी गेला.”

“आजोबांना काय सांगणार होता तो उशिराचे कारण?”
“मला माहीत नाही. तो थापाड्या आहे. काहीतरी थाप मारली असेल. मी पण नाही विचारलं त्याला”
“बरं सुरेश, तू आत जा आणि मनोजला बाहेर पाठव.”

मनोज बाहेर आला तसं मानेमॅडमनी त्याला जरबेत विचारलं
“मनोज, खरं सांग, काल काय झाल? मला सगळं कळलंय, खोटं बोलू नकोस नाहीतर बड्या बाईंकडे नेईन.” मग मनोजने आजोबाचा मार चुकविण्याकरिता आपण ही अपहरणाची कहाणी तयार केली आणि तसं नाटक केलं हे खरं खरं सांगितलं.

“अरे, पण हे तुला सुचलं तरी कसं?”
“मॅडम, टीव्हीवर मी सगळ्या मालिका बघतो. त्यात अपहरणाच्या खूप कथा असतात. त्यावरून मला सुचली ही कथा.” त्याच्या बालबुद्धीमुळे त्याने कथा रचली पण त्यातले कच्चे दुवे समजण्याइतके त्याचे वय नव्हते. परतु थोडावेळ का होईना पण घरच्याना आणि पोलिसांनाही चकवा देण्याची क्षमता निश्चितच होती. ही बुद्धी अशीच अयोग्य दिशेला वळली तर त्यातूनच मोठी गुन्हेगारी निर्माण होण्याची बीजे दिसत होती. पवारसाहेब मानेबाई त्याला घेऊन मुख्याध्यापिका बाईंकडे गेले.

पवारसाहेबांनी त्यांचे बाहेर पाळतीवर असलेले साथीदार बोलावले.  मनोजचे आई वडील आजोबा आणि मुख्याध्यापिका बाई आणि माने बाई यांना पोलिस स्टेशनला बोलावले तेथे मनोज आपली कहाणी पुन्हा सांगितली सगळे फक्त झाले सर्वांच्या सह्या घेतल्या.

“आजोबा आता घरी जा. पण घरी गेल्यावर मनोजला मारू नका.” पवारसाहेब म्हणाले तसे सगळे हसू लागले.

पण ही खरंच हसण्यासारखी गोष्ट आहे का? इतक्या लहान मुलाने हा अविचार का केला असावा याचा विचार करण्याची आवश्यकता आहे असे नाही वाटत? कोणत्या परिस्थितीमुळे हा मुलगा गुन्हेगारी विचाराकडे वळला?

मनोज एक चुणचुणीत मुलगा. त्याच्या वयाच्या मानाने जास्तच. कितीही गरिबी असली तरी अलीकडे काही गोष्टी घरीघरी अगदी अपरिहार्य झाल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे टीव्ही ज्याला मॅड बॉक्स असेही एक यथार्थ नाव आहे. कुठलीही सुविधा, सुविधा म्हणून वापरली जाते तोवर ठीक पण तिचा जेव्हा अतिरेकी वापर होतो तेव्हा त्यातून अतिरेकीच विचार बाहेर पडतात. धाकाने ते अधिक फोफावतात.

टीव्ही च्या बाबतीत गायकवाड कुटुंबही अपवाद नव्हते. एका छोट्या खोलीत संसार. त्यातच टीव्ही बघणारे निरनिराळ्या आवडीनिवडीचे. नको ते कार्यक्रम मुले पाहणार कारण आई-वडिलानाही मुलांसमोर काय पहावे, काय नको याचे तारतम्य नाही. उलट मनोज गोविंदा स्टाईलने ऐ तो प्रेम छे सारख्या गाण्यावर धमाल नाचतो याचे कौतुक ! त्याच्या आईची तर आपल्या मुलाला सीरीयलमध्ये किंवा अॅडमध्ये चान्स मिळावा म्हणून धडपड चाललेली. झटपट पैसा मिळवायची हौस. त्यामुळे मनोजचा चुणचुणीतपणा एक प्रकारच्या बेडर धीटपणाकडे आणि पर्यायाने मग्रुरीकडे जात चालला आहे याचे त्यांना भान नाही.

घरात टीव्ही चे अवास्तव स्तोम माजू न देणे, मुलांच्या अभ्यासाच्या वेळात जागा कमी असेल तर आपल्या आवडी निवडींवर ताबा ठेवणे हे मोठ्या माणसाचे कर्तव्य आहे. त्यांनीच जर ताळतंत्र सोडले तर मुलांवर काय संस्कार होणार? त्यांची बुद्धी मग अशाच गैरमार्गाकडे वळणार.

तेव्हा म्हणावेसे वाटते की बाबांनो, जरा विचार करा !

— विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..