‘जे तुझ्याकडे आहे, ते मलाही पाहिजे’ अशा तीव्र इच्छेमुळे माणूस हा एखाद्याचं अनुकरण करु लागतो. माणूस हा सहवास प्रिय आहे, त्याला चार माणसांत मिसळायला, बोलायला आवडतं. अशावेळी आपली सर्वांवर छाप पडावी म्हणून तो सतत प्रयत्न करतो.
सर्वांत सोपं अनुकरण करणं जमतं ते, चित्रपटातील आवडत्या हिरोचं! तुम्हीच आठवा, तुमचे आजोबा अशोककुमार, सैगल सारखी हेअरस्टाईल करायचे. नंतर जमाना आला राजेश खन्नाचा. १९७० पासूनची तरुणपिढी ‘खन्नास्टाईल’ केसांचा भांग पाडायची. बरेच वर्ष रस्त्यावर असे अनेक ‘डुप्लिकेट’ राजेश खन्ना दिसायचे. नंतर विनोद खन्ना सारखी तरुण पोरं कल्ले ठेवू लागली.
देव आनंदच्या ‘हरे राम हरे कृष्ण’ चित्रपटाच्या लाटेमुळे हिप्पी पद्धतीच्या केशरचना दिसू लागल्या. ओशोंच्या रजनीश आश्रमामुळे भगवी वस्त्रे घालून हिंडणाऱ्यांची पुण्यातील कॅम्प भागात संख्या झपाट्याने वाढली.
सलमान खान, आमीर खान, हृतिक रोशन या हिरोंनी ‘सिक्स पॅक’चं फॅड आणलं. प्रत्येक तरुणाला त्यांचं अनुकरण करुन गर्लफ्रेंडवर इंप्रेशन मारावं असं वाटू लागलं. आता ‘डान्सरहिरों’ची चलती आहे. साहजिकच शहरांतून डान्स अकॅडमींचं पेव फुटलंय.
याच गोष्टी कपड्यांबाबतही झाल्यात. राजेश खन्नाचा गुरु कुडता त्याकाळी फेमस होता. नंतर जॅकेटचा जमाना आला. जितेंद्रचे कपडे टाईट फिटींगचे असायचे. तसे वापरले जाऊ लागले. आता तर फॅशनच्या नावाखाली मुद्दाम गुडघ्यावर फाडलेल्या पॅन्ट वापरल्या जातात.
हिरोईनचं अनुकरण न करेल तर ती मुलगी कसली? पूर्वी हिंदीमधील हिरोईन डोळ्यांना काळजाची जाडसर रेघ मारायच्या व शेवटी ती रेघ किंचित वळवायच्या. त्याकाळी ही फॅशन सर्वत्र दिसायची. ‘साधनाकट’ सारखे कपाळावर केस वळवले जायचे. फार छान दिसायचं ते. आशा पारेख सारखी घट्ट लपेटून साडी नेसणे ही त्या जमान्यातील ‘कौतुका’ची गोष्ट होती.
नंतर साडी इतिहासजमा झाली आणि सर्रास पंजाबी ड्रेसची लाट आली. मराठी, हिंदी चित्रपटातील पंजाबी ड्रेसचं अनुकरण मुली, स्त्रिया करु लागल्या.
कालांतराने पंजाबी ड्रेस जाऊन शर्ट पँट हे पुरुषांचे कपडे हिरोईन करू लागल्या. त्याचेच प्रतिबिंब समाजात आता दिसते आहे. आता साडी ही सणावाराला अथवा लग्नसमारंभातच दिसू लागली.
हे झालं अनुकरणाबद्दल. काही जण नक्कल करण्यात माहीर असतात. समोरच्या व्यक्तीच्या हावभाव व बोलण्याच्या पद्धतीचा अभ्यास करुन ‘नक्कल’ केली जाते.
माझे मित्र दिलीप हल्याळ हे त्यांच्या अनेक मित्रांची सही रे सही नक्कल करतात. चैताली देखील धमाल नकला करते. नकलेचा हेतू हा मनोरंजन एवढाच असतो. त्यात कुणालाही दुखावण्याचा हेतू नसतो.
हिंदी चित्रपटातील काही शब्द हे त्या त्या कलाकारांची आठवण करुन देतात व आपल्याला हसू फुटतं. ‘मोना डार्लिंग’ म्हटलं की, काळा गाॅगलवाला व्हिलन अजितच समोर येतो. ‘आऽऽऊऽ ललिता!’ म्हटलं की, नन्हासा, छोटासा शक्ती कपूरच आठवतो. ‘ये ढाई किलो का हाथ..’ म्हटलं की, बाॅडीबिल्डर सनी देओल दिसतो. ‘जिनके घर शिशेकें होते है, वो दुसरोंपर पत्थर फेंका नहीं करतें’ या संवादाने राजकुमार आठवतो. या सर्वांची आपल्यावर कळत नकळत छाप पडते. त्यांच्या संवादाचा उपयोग आपण कधीतरी बोलताना वाक्प्रचार म्हणूनही करतो.
आमच्या पिढीने हे सर्व थिएटरमधील भव्य पडद्यावर पाहिलंय. त्यामुळे आम्ही चित्रपट संपल्यानंतर बाहेर पडताना आमच्या डोक्यात हिरोच असायचा. त्याचं चालणं, बोलणं नकळत आमच्यामध्ये भिनलेलं असायचं. आता पडद्याचा जमाना गेला. आता चाळीस इंची टीव्हीवर तुम्ही जे पाहता त्याची नक्कल व अनुकरण केले जाते. मुळात आता जुनी गाणी किंवा चित्रपट कोणीही पहात नाही, नवीन आहे ते खूपच स्वप्नील आणि हायफाय आहे. वास्तवता कुठेही दिसत नाही. तंत्रज्ञान सुधारलं आहे, अभिनय मात्र सुधारायचा आहे. आमची पिढी पडद्यावरील आवाक्यातील स्वप्नं पहात होती. आताची पिढी चाळीस इंचामध्ये चाळीस कोटींची स्वप्नं पाहते आहे.
कालाय तस्मै नमः ..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१२-३-२१.
Leave a Reply