नवीन लेखन...

जसबीरची फरफट

१९७० साली हिंदी सिनेसृष्टीतील देव आनंदने ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटाची निर्मिती सुरु केली. त्याला या चित्रपटातील त्याच्या बहीणीची भूमिका करण्यासाठी नवीन चेहरा हवा होता. तेव्हा ओ.पी. रल्हनच्या ‘हलचल’ व ‘हंगामा’ या दोन चित्रपटांतून काम केलेली एक मुलगी त्याच्या समोर आली. तिला चित्रपटातील ‘जसबीर’ नावाच्या ‘बहिणी’च्या भूमिकेसाठी देव आनंदने करारबद्ध केले.
चित्रपट प्रदर्शित झाला. तुफान यशस्वी ठरला. ‘दम मारो दम’ हे पडद्यावर गाणारी, लहान वयातच आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे भावाच्या प्रेमाला पारखी झालेली ‘जसबीर’ उर्फ झीनत अमान ही अभिनेत्री रातोरात सुपरस्टार झाली व फिल्मफेअरचा बेस्ट सपोर्टिंग ॲ‍क्ट्रेसचा पुरस्कारही तिला मिळाला.
झीनत अमानचा जन्म मुंबईत १९ नोव्हेंबर १९५१ साली झाला. तिचे वडील चित्रपटासाठी स्क्रिप्ट रायटिंगचे काम करायचे. ‘मुघल-ए-आझम’ व ‘पाकिजा’ च्या श्रेयनामावलीत त्यांचे नाव आहे. झीनत लहान असताना त्यांनी आपल्या पत्नीशी घटस्फोट घेतला. तिच्या आईने दुसरं लग्न केलं. झीनत तेरा वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. झीनतला पांचगणी येथे शिक्षणासाठी ठेवलं गेलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती परदेशात गेली. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती मुंबईत परतली व तिने मिस एशिया पॅसिफिक व फेमिना मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत यश मिळविले.
जाहिरातींमध्ये माॅडेल म्हणून तिने अनेक जाहिराती केल्या. मायानगरीचे आकर्षण तिलाही होतेच. ओ.पी. रल्हन यांच्या दोन चित्रपटात काम करुन तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, मात्र ते दोन्ही चित्रपट अयशस्वी ठरले.
देव आनंद हे तिच्या दृष्टीने ‘गाॅड’फादरच ठरले. ‘हरे राम हरे कृष्ण’ च्या यशानंतर त्यांच्याच ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटाची ती नायिका होती. ‘हिरा पन्ना’, ‘वाॅरंट’, ‘प्रेमशास्त्र’, ‘डार्लिंग डार्लिंग’ अशा चित्रपटांतून ती देव आनंद बरोबर पडद्यावर दिसत राहिली.
‘यादों की बारात’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर तिला अनेक नवीन चित्रपट मिळाले. गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित राजेश खन्नाचा ‘अजनबी’ चित्रपट सुपरहिट ठरला. ‘हम किसी से कम नहीं’ या चित्रपटाने सर्वत्र रौप्यमहोत्सव साजरे केले. त्यातील कव्वालीने तर त्या काळात तरुणवर्गाला वेड लावले होते. ‘रोटी कपडा और मकान’ या मनोज कुमार निर्मित व दिग्दर्शित चित्रपटाने तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला पुरस्कार मिळवून दिला.
१९७६ साली राज कपूरने झीनतला ‘सत्य शिवमय सुंदरम्’ चित्रपटात घेतले. या चित्रपटाच्या पुण्यामधील राजबागेत शुटींग प्रसंगी भेटून, मी झीनतचे चित्र काढून त्यावर तिची स्वाक्षरी घेतली. त्यावेळी मी अकरावीला होतो. तिनं चित्राखाली सही केली व शुभेच्छा दिल्या.
चित्रपटातील तिच्या राज कपूर स्टाईल ‘सौंदर्यदर्शना’ने हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर यशस्वी झाला. झीनतने राज कपूरच्या ग्रुपमध्ये काम केल्याबद्दलची नाराजी देव आनंदने एका मुलाखतीत बोलून दाखवली होती.
अमिताभ बच्चन बरोबर ‘डाॅन’, ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘पुकार’, ‘महान’, ‘दोस्ताना’, ‘लावारिस’ चित्रपटात तिची केमेस्ट्री छान जुळली. फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील तिच्यावरील चित्रीत ‘आप जैसा कोई, मेरे जिंदगी में आए.तो बात बन जाए.’ या नाझिया हसनच्या गाण्यामुळे ती चित्रपटाचा केंद्रबिंदू ठरली.
बी. आर. चोप्रा यांनी ॲ‍गाथा ख्रिस्ती हिच्या एका रहस्यकथेवरुन ‘धुंद’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली, त्यातील मनोरुग्ण डॅनीच्या पत्नीची भूमिका झीनतने निभावली. याच दरम्यान तिचा चित्रपटातील सहकलाकार संजय खानशी संपर्क आला.
‘अब्दुल्लाह’ या संजय खानच्या चित्रपटात तिने नायिकेची भूमिका केली. या चित्रपटास अभूतपूर्व यश मिळाले.
संजय खानशी झालेल्या मैत्रीचे रुपांतर त्यांच्या ‘छुप्या’ लग्नात झाले. काही दिवसांतच संजयचे तिच्याशी वाद होऊ लागले. एका वादप्रसंगी संजयने तिच्यावर केलेल्या अत्याचाराने झीनतच्या उजव्या डोळ्यास गंभीर दुखापत झाली. एका वर्षातच ते दोघे, वेगळे झाले.
‘शोले’च्या यशानंतर रमेश सिप्पीने ‘शान’ नावाचा ‘जेम्स बाॅण्ड’ धर्तीचा चित्रपट १९८० मध्ये दिग्दर्शित केला. या मल्टिस्टार चित्रपटात मजहर खान नावाच्या कलाकाराने अपंग खबऱ्याची भूमिका केली होती. हाच छोटी मोठी कामं करणारा कलाकार झीनतच्या जीवनात ‘शुक्लकाष्ठ’ होऊन आला.
१९८५ साली झीनतने मजहर खानशी दुसरा विवाह केला. चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर झाल्यावर ती चारचौघींसारखा संसार करण्याची स्वप्नं पहात होती. तिला कल्पनाही नव्हती की, मजहरशी लग्न करुन ती आगीतून फुफाट्यात पडणार आहे. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून सलग तेरा वर्षे ती अंधारमय जीवनात चाचपडत राहिली. हाती काहीच लागले नाही. दोन मुलांना जन्म दिला व मजहरकडून होणारा शारीरिक व मानसिक छळ भोगत राहिली. शेवटी ९८ साली त्याच्या मृत्यूनंतरच तिची ‘सुटका’ झाली.
दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीत भरपूर बदल झाला होता. २००३ च्या ‘भोपाळ एक्स्प्रेस’ चित्रपटातून तिने पुनरागमन केलं. २००४ मध्ये ‘द ग्रॅज्युएट’ या इंग्रजी नाटकातून काम केलं. वय वाढत होतं, सौंदर्य मावळतीला लागलं होतं. २०१९ मध्ये ‘पानिपत’ चित्रपटासाठी ती पुन्हा मेकअपला बसली व ‘सकिना बेगम’ पडद्यावर साकारली. तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.
आज जागतिक महिला दिनाच्या चार दिवस आधी एक स्त्री म्हणून झीनतचा विचार करायला गेलं तर एक प्रकर्षानं जाणवतं की, अजूनही समाजात स्त्रीला ‘दासी’ म्हणूनच वागवलं जातं आहे. संजय खान आणि मजहर खान यांनी तिच्यावर अमानुषपणे अत्याचारच केले. ‘इन्साफ का तराजू’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला पुरस्कार मिळाला, मात्र त्यातील प्रसंगाहून विदारक प्रसंग तिच्या वास्तव जीवनात आलेले आहेत. तरीदेखील ती गप्प राहिली. कारण तिला पक्कं माहीत होतं की, चित्रपटातील न्याय आणि खऱ्या जीवनातील न्याय यात पराकोटीचा फरक आहे. ती पडद्यावरची कथा असते, जीवनात ती ‘सत्यकथा’ असते!
आज तिच्याकडे पैसा आहे, प्रसिद्धी आहे, मालमत्ता आहे, मात्र समाधान? ते मात्र अजिबात नाहीये. जसबीर सारखी फरफट चुकूनही कुणाच्या वाट्याला येऊ नये, इतकंच या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला सांगायचं आहे.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
४-३-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..