बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. त्यांचा जन्म ३ मार्च १९५५ रोजी झाला. महाविद्यालयीन काळापासूनच त्यांच्यातील तल्लख विनोदबुद्धीचा प्रत्यय परिचितांना येत होता. त्या काळात समाजातील भ्रष्टाचारावर विनोदाच्या माध्यमातून कोरडे ओढणारी त्यांची पथनाटय़े लोकांना हसवता हसवता अंतर्मुख करून गेली.
नंतर चंदीगढच्या ‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून ते रुजू झाले आणि राजकीय व सामाजिक विसंगतींवर बोट ठेवणारी त्यांची अर्कचित्रे व व्यंगचित्रे अत्यंत लोकप्रिय झाली. त्याच काळात ‘दूरदर्शन’ने त्यांचे लक्ष वेधून घेतले. व्यापक लोकसंपर्काची या माध्यमाची ताकद त्यांना खुणावत होती आणि या माध्यमातला ‘फ्लॉप शो’ हा त्यांचा पहिलावहिला कार्यक्रम आजही ‘हिट शो’ म्हणूनच गणला जातो. प्रमुख भूमिकेत भट्टींबरोबर त्यांची पत्नी सविता आणि दुसरे विनोदवीर विवेक शक अशी तीनच पात्रे असलेला हा अत्यंत कमी बजेटचा कार्यक्रम अवघ्या दहा भागांचा होता पण या कार्यक्रमाने समाजातील भ्रष्टाचार व वैगुण्यांवर हसवता हसवता असे मार्मिक भाष्य केले की आजही तो लोकांच्या लक्षात आहे. त्यानंतर ‘उल्टापुल्टा’ हा छोटय़ा तुकडय़ांचा कार्यक्रमही लोकप्रिय झाला होता.
विनोदाचा बादशाह ज्यांना म्हणता येईल अशा जसपाल भट्टी यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळी विनोदी होता, दररोजच्या घटनांवर मार्मिक टिप्पणी करणारा त्यांचा विनोद सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यातून, परिस्थितीतून आलेला होता. त्यामुळेच त्यांच्या ‘उल्टा पुल्टा’, ‘फ्लॉप शो’ या दूरदर्शनवरच्या दोन मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
कुठेतरी नोकरी करायची, पैसा मिळवायचा यात त्यांची भट्टी जमली नसावी बहुधा. सामान्यांच्या असहाय परिस्थितीची उपहासात्मक मांडणी करण्यावर त्यांचा भर होता. ‘जोक फॅक्टरी’ या स्टुडिओ सोबत ‘मॅड आर्ट’ही प्रशिक्षण संस्था ही स्थापन केली. मा.जसपाल भट्टी यांचे २५ ऑक्टोबर २०१२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
Leave a Reply