” अंखियों के झरोखोंसे ” हा चित्रपट जरी पुण्याला “मंगला “टॉकीजला लागला होता तरी मी तो सांगलीला मित्रांच्या आग्रहाखातर “प्रताप ” चित्रपटगृहात पाहिला – बहूधा १९७९ साली ! “खेल खेलमें ” टाईप महाविद्यालयीन जीवनावरील हा टिपिकल हंसी -मजाकचा चित्रपट असला तरी “लिली” च्या (रंजिता) अखेरच्या आजारपणापाशी जेंव्हा तो येऊन ठेपला , तेंव्हा आमचाही मूड बदलला. तिला आणि त्यालाही “तिचं “जाणं कळलंय. तारुण्यातील विवाह ठरण्याच्या वेळी तिचं आजारपणामुळे संपणं हें दुःखद तितकेच धक्कादायक !
आणि मग ती अरुणपाशी (सचिन) एक जगावेगळा हट्ट धरते – ” पुन्हा जुनं जगूया ! आपल्या सहक्षणांच्या सर्व जुन्या जागांना भेट देऊ या !! ”
पाहताक्षणी आणि ऐकताक्षणीं मी या कल्पनेच्या प्रेमात पडलो. ( ” चलो एक बार फिरसे ” च्या धर्तीवर ही हाक मला वाटली.)
सर्व शक्ती एकवटून ती अरुणच्या मदतीने निघते -जुनं जगायला ! तो घायाळ /विद्ध , पण सतत असतोच तिला सावरायला ! आणि अचानक पार्श्वभूमीवर रवींद्र जैनच्या आवाजातील खालील ओळी कानावर आल्या आणि थरारायला झालं –
” जाते हुए, यह पल छीन, क्यों जीवन लिए जाते
जाते हुए, यह पल छीन, क्यों जीवन लिए जाते !
जोड़े, यही जोड़े, यही तोड़े, सब नाते
जाते हुए, यह पल छीन, क्यों जीवन लिए जाते !! ”
क्षण जातात ते जातात (त्यावर आपला काही अधिकार नसतो) पण जाताने ते आपलं आयुष्यही का घेउन जातात? (आपण तर समजून चाललो असतो की ते तसंच राहणार !) मग इथे जोडलेली सगळी नाती इथेच तुटतात, हा आणखी एक वार ! ( ती नाती कां नाहीं येत बरोबर ?)
खूप अर्थपूर्ण पण तितकंच अप्रसिध्द आहे हे गाणे ! अरुण तिला महाविद्यालयातील वर्गात नेतो, समुद्रकिनारी नेतो आणि शेवटी चर्चमध्येही ! सतत (रम्य, हवाहवासा वाटणारा ) भूतकाळ आणि (नको नकोसा पण अपरिहार्य) वर्तमानकाळ यांच्यातील पाठशिवणीचा खेळ तिन्ही कडव्यात आणि तोही तात्विक भाषेतील ! ती स्तब्ध, तो अंतर्बाह्य हललेला ! तिने निमूटपणे स्वीकारलेलं आणि तो अजूनही अस्वीकाराच्या काठावर ! चर्चच्या कडव्यात तो क्षणभर नजरेआड झाल्यावर तिची मुखवटा सोडून त्याला “अरुण “अशी आर्त हाक आणि अखेरपर्यंत मी आहेच तुझ्यापाशी असे त्याचे आश्वासक “लिली ” म्हणणे आणि ते चर्चमध्ये घुमणे ! सुंदर प्रतीकातून लढ्याचा त्यांचा निर्धार ! शेवटी ही “हरणारी ” लढाई अपेक्षेप्रमाणे संपते.
आजही ४० वर्षांनी हें गाणं लख्ख आठवतंय आणि त्यावेळची तारुण्यातील ती न सोसलेली लढाई !!
रवींद्र जैन संगीतकार आणि विशेषतः गायक म्हणून मर्यादीत यशस्वी झाला, पण एवढया एका हळव्या, कातर गाण्याने तो मला कायमचा प्रिय झाला. सगळं संपलेले सूर त्याने कमालीच्या ताकतीने सादर केले. या गाण्याव्यतिरिक्त त्याने आणखी काही केले नसते तरी चालले असते !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply