ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे.ज्या ज्ञानेश्वरांनी ब्राहमण समाजाला समतेचे खडे बोल ऐकवले आणि ज्या बहुजन समाजांनी त्यांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली त्या एकूण मराठी भाषिक समाजाची एकी कुठेतरी भंग पावत चालली आहे हे कोपर्डीच्या निमित्ताने निघत असलेल्या मोर्चातून स्पष्ट होत आहे. मराठी भाषिक मराठा समाजाची ताकत निर्विवाद पणे स्पष्ट झाली असली तरी ज्ञानेश्वर आणि छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेला समाज हाच तो “मराठी” समाज हे स्पष्ट होते आहे कि नाही हे येणार काळ ठरवेल .
कोपर्डीत ज्या मुलीवर बलात्कार झाला व तिला नंतर मारून टाकले ती मराठा समाजाची होती. कोपर्डी परिसरात या आधीही शाळा-कॉलेजात जाणार्या मुलींवर विनयभंगाचे, बलात्काराचे प्रकार घडले. हे सर्व गुन्हेगार दलित समाजातील होते व फक्त त्यांची ‘जात’ म्हणून दांडगाईस आवर घालणे जमले नाही. मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याने दबलेल्या हुंदक्याचे रूपांतर आक्रोशात झाले.कोपर्डीच्या निमित्ताने दोन प्रमुख मागण्यांना तोंड फुटले. अॅट्रॉसिटी रद्द करा व मराठा समाजाला आरक्षण द्या.नोकरी मिळवताना एकदा घेतलेले आरक्षण एकवेळ ठीक, पण बदल्या आणि बढत्यांतही ‘आरक्षण’ हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे.
शिवरायांच्या नावाने मागितलेली मते !!!!
शिवरायांचे राज्य हे रयतेचे राज्य होते .अठरापगड जातीच्या मावळ्यांचे ते राज्य. महार, मांग, भिल्लांचे ते राज्य .शिवप्रभूंसाठी जीव देणार्यांत हेच लोक जास्त होते.
आरक्षण आणि आरक्षणाला विरोध या दोनच मुद्द्यावर जर महाराष्ट्राचे राजकारण फिरणार असेल तर पुढील काळ कठीण आहे. गब्बर झालेल्या समाजातील काही नेत्यांना हेच हवे आहे असे वाटते.
गरीब आणि श्रीमंत या दोनच बाबी आरक्षणात लक्षात घेतल्या तर या मंडळींचे राजकीय धंदे बसतील हीच भीती या मंडळींना वाटते.
महाराष्ट्रातील हा जातिभेदाचा गोंधळ महाराष्ट्राची पुढील दिशा दर्शक असणार आहे हे निश्चित .
मेहनत करणारे मेहनत करीत राहतील .रयतेला फसवून त्यांना झुंजवत ठेवणारे डोळे मिचकावत सत्तेचा लोण्याचा गोळा खाणारे खात राहतील हीच जर परिस्थिती राहणार असेल तर मग कठीण आहे.
खरोखरीच लब्ध प्रतिष्ठित नेत्यांना ” बाजूला ” करून जर मराठा मोर्च्याचे इतके सुंदर आयोजन होत असेल तर मात्र आयोजक या शिस्त असलेल्या मोर्च्याच्या आयोजनाबद्दल प्रशंसा होण्यास निश्चित पात्र आहेत .अॅट्रॉसिटी’चा बेगुमान वापर करणार्यांना यापुढे धडकी भरेल व तसे केले तर चवताळलेला समाज एकजुटीने लचके तोडेल हा संदेश पोहोचला आहे.
या सर्व वादातून चांगले घडो आणि शिवरायांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र पुन्हा उभा राहो हीच रयतेची अपेक्षा आहे.
चिंतामणी कारखानीस —
25 Sept 2016
Leave a Reply