लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा जन्म २ जुलै १९२३ रोजी झाला.
लोकमतचे संस्थापक-संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि मंत्री म्हणून राज्यात विविध खात्यांची जबाबदारी ज्यांनी यशस्वीपणे हाताळली असे जवाहरलालजी दर्डा लोकमत परिवाराचे ते बाबूजी. यवतमाळमध्ये भय्याजी आणि मंत्रालयात दर्डासाहेब. बाबूजी कोणत्याही नावाने वावरले तरी ‘बाबूजी’ याच नावाने ते सर्वप्रिय होते. त्यांच्यासोबत आयुष्यातील उमेदीची जवळजवळ २७ वर्षे काढली. त्याअगोदर ऐन तारुण्य आणि जोशातील १२ वर्षे आचार्य अत्रे यांच्यासोबत होतो. अत्रेसाहेब आणि बाबूजी विचारभिन्न, प्रकृतीभिन्न पण दोघांमध्ये समान धागा होता तो म्हणजे जे का हाती घेऊ ते झपाटून करायचे आहे.
‘लोकमत’चा आजचा वाढलेला प्रचंड पसारा पाहात असताना ५0 वर्षांपूर्वीची बाबूजींची दूरदृष्टी, त्यांचे कष्ट आणि पत्रकारितेतील समर्पण अशी बाबूजींची विविध रूपे उभी राहतात. मला सातत्याने असे वाटते की, बाबूजींचे मोठेपण महाराष्ट्राला फारसे कळले नाही. महाराष्ट्राचा हा एकमेव नेता असा आहे की, ज्याने कधीही काँग्रेस पक्ष सोडला नाही.
१९४२ साली स्वीकारलेला काँग्रेस पक्ष, १९४२ साली स्वीकारलेले खादी वस्त्राचे व्रत २५ नोव्हेंबर १९९७ पर्यंत म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी निष्ठेने जपले त्यांचे नाव बाबूजीच आहे. तुलनेकरिता म्हणून सांगत नाही. परंतु महाराष्ट्रातील कोणत्याही दिग्गज नेत्याचे नाव घ्या… अगदी यशवंतराव, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, बॅ. अंतुले या पहिल्या फळीतील मोठ्या नेत्यांनी काही ना काही कारणामुळे काँग्रेस पक्ष सोडला होता. माझ्या डोळ्यांसमोर बाबूजी एकमेव असे आहेत की ज्यांनी काँग्रेस पक्षाला नेहमीच साथ दिली. १९९५ साली महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले तेव्हा अनेक जणांनी पळापळ केली होती. पण, त्या पळापळीत बाबूजी स्थिर होते. २ जुलै १९९६च्या त्यांच्या वाढदिवशी मुंबईमध्ये मीच त्यांची एक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत त्यांनी ठामपणे सांगितले होते की, ‘एकटा राहिलो तरी चालेल… काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन लढत राहीन.’ आणि बाबूजी तसे खरोखर लढत राहिले. १९७७ च्या काँग्रेसच्या पराभवानंतर अनेक जण दूर झाले; पण बाबूजींनी इंदिराजींची साथ सोडली नाही. प्रिय मित्र वसंतराव नाईक यांच्यापासून वैचारिकदृष्ट्या अलग होताना व्यक्तिगत नात्याचे संबंध कायम ठेवून राजकीय भूमिकांवर किती ठामपणे उभे राहता येते हे बाबूजींनीच दाखवून दिले आणि त्या निर्णयानंतर ‘ऋणानुबंधाच्या तुटून पडल्या जाती’ असा नितांत सुंदर अग्रलेख वाचकांच्या भेटीला आला. बाबूजींचे हे वैशिष्ट्य होते. मतभेदाला त्यांनी भांडणात रूपांतरित केले नाही. काँग्रेसची साथ सोडली नाही. पण लोकांच्या प्रश्नावर पक्षाच्या पलीकडे जाऊ न ते सातत्याने वाचकांच्या सोबतच राहिले.
इंदिराजींनी १९७८ साली मुंबईच्या जाहीर सभेत सांगितले होते की, ‘विदर्भ मे मैं लोकमत के हत्यार से लढ रही हूँ’ बाबूजी त्याचवेळी हे स्पष्ट करायचे की मी आणि माझा लोकमत ४ वर्षे ११ महिने लोकांच्या सोबत आणि १ महिना पक्षासोबत. बाबूजींची ही तात्त्विक भूमिका होती. वृत्रपत्र चालवताना त्यांनी कधीही जात, धर्म आणि प्रादेशिक भावना यांचे समर्थन केलेले नाही. स्वर्गीय बापूजी आणे यांनी सुरू केलेला लोकमत त्यांच्याकडून बाबूजींनी घेतला. तेव्हा ‘हे वृत्तपत्र राष्ट्रीय भावनेने मी चालवीन’ हा शब्द बाबूजींनी बापूजींना दिला होता. आणि तो शब्द बाबूजींनी शेवटपर्यंत पाळला.
बाबूजींच्या आयुष्याकडे पाहताना काही गोष्टी विलक्षण वाटतात. यशाने ते कधीही हुरळून गेले नाहीत आणि अपयशाने कधीही खचून गेले नाहीत. सत्ता असो किंवा नसो त्याची त्यांना कधीही फिकीर वाटली नाही. सत्तेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ दर्जाचे लोकमतचे व्यासपीठ हातात असताना सत्तेची पत्रास काय, असे ते म्हणायचे… आणि म्हणून संपादकीय विभागातील सर्व सदस्यांना त्यांचे सांगणे असायचे की, ‘वृत्तपत्राचा खरा मालक वाचक आहे हे लक्षात ठेवा. सरकारच्या भरवशावर वृत्तपत्र चालवू नका. तुमच्या गुणवत्तेवर चालवा. सरकारे येतील आणि जातील.’
बाबूजींसमवेत होणाऱ्या कोणत्याही बैठकीत अतिशय सोप्या शब्दांत ते एक जीवनाचे सूत्रच सांगायचे. मला त्यांचा आणखी एक गुणविशेष जाणवतो. लोकमतच्या कार्यालयात ते संपादक असायचे, मंत्रालयात ते मंत्री असायचे. टिळक भवनात ते काँग्रेसचा नेता असायचे. यवतमाळ किंवा भिलवलेच्या शेतात ते शेतकरी असायचे. पाने, फुले, झाडे, फळे, पक्षी यांच्याविषयीचा त्यांचा अभ्यास कितीतरी विलक्षण होता. यवतमाळच्या शेतात अनेक पक्षी सकाळी सुंदर स्वर काढायचे. तेव्हा ते एकदा मला म्हणाले होते की, ”भारतीय संगीताच्या सा रे ग म प ध नी सा या सप्तसुरांचा जन्म पक्षांच्या स्वरातून झालेला आहे.” औरंगाबादला राजेंद्रबाबूंचे घर बांधताना ते सिव्हिल इंजिनीअर आहेत, असे वाटायचे. नागपूर लोकमतच्या मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार मूळ आर्किटेक्टने सहा फुटांचे केले होते. बाबूजींनी ते ३0 फूट करून घेतले. प्रत्येक विषयाची त्यांना परिपूर्ण माहिती होती. पण आपल्याजवळच्या ज्ञानाचा आव त्यांनी कधीच आणला नाही किंवा दाखवला नाही.
काळाबरोबर राहणे बाबूजींनीच लोकमतला शिकवले. २७ वर्षांपूर्वी वृत्तपत्रीय जगात पहिला कॉम्प्युटर लोकमतच्या टेबलांवर येऊन बसला. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेला स्वातंत्र्यसैनिक, देश स्वतंत्र झाल्यानंतर यवतमाळ येथे त्यांनी सुरू केलेल्या मासिकाचे नाव होते ‘नवे जग’. काळ बदलत असतो. स्वत:ची भूमिका न बदलता बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारून बाबूजींनी लोकमतमध्ये काळानुसार बदल केले. त्यांच्या दोन्ही सुपुत्रांची त्यांना केवढी मोठी साथ मिळाली. त्यामुळेच यवतमाळसारख्या त्या वेळच्या आडगावात सुरू झालेले एक पाक्षिक वाढता वाढता वाढले आणि महाराष्ट्र व्यापून गेले. नंतर त्या पाक्षिकाचे महाराष्ट्रात क्रमांक १चे दैनिक झाले ही गोष्ट सोपी नाही.
बाबूजी दहा विद्यापीठांचे कुलगुरू असावेत, इतका त्यांचा कामाचा आवाका होता. विरोध करणाऱ्यांनी खूप विरोध केला. बदनामीचे रतीब घातले जात होते. पण जीवनात इतकी समतोल समवृत्ती मी अन्य कोणत्याही नेत्यामध्ये पाहिली नाही. आपण वरच्या पायंडीवर उभे आहोत, आपण खालच्या पायंडीवर उतरायचे नाही. खालच्या पायंडीवर असलेल्याला शक्य झाल्यास वरच्या पायंडीवर घ्यावे, या त्यांच्या जीवनसूत्रामुळेच बाबूजींच्या तोंडून कोणाबद्दलही अपशब्द कधीही ऐकायला मिळाला नाही.
लोकमतचे यश हे निव्वळ वृत्तपत्राचे यश आहे असे मी मानत नाही. ते संस्काराचे आणि भूमिकेचेही यश आहे. वृत्तपत्रीयसृष्टीत ‘परिवार’ हा शब्द बाबूजींनीच आणला. आणि त्याच बाबूजींनी पत्रपंडित पा. वा. गाडगीळ यांना लोकमतचे पहिले संपादक म्हणून आणले. ज्यांना गाडगीळसाहेबांचा स्वभाव माहीत होता त्यांना ही गोष्ट जाणवत होती की, गाडगीळसाहेबांना सांभाळणे किती कठीण काम होते. एकीकडे गाडगीळसाहेब तर दुसरीकडे वृत्तपत्र घरात टाकणारा हॉकर… अशी परिवाराची एक साखळी बाबूजींनी त्यांच्या सभोवताली निर्माण केली आणि त्याच संस्काराचा भाग म्हणून विजयबाबूंनी नागपूर लोकमत कार्यालयाच्या परिसरात सायकलवरून लोकमत वाटप करणाऱ्याचा पुतळाच उभा करून टाकला. छोट्यातील छोट्या कर्मचाऱ्याशी बाबूजी इतके प्रेमाने वागायचे की, आपल्या पानातील अर्धी भाकरी शेजारच्या पानात वाढताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखा होता. किती विषय सांगावेत आणि किती सांगू नयेत. त्यांच्याशी बोलताना एक एक विचार मिळायचा. भारताच्या मंत्रिमंडळात १७ वर्षे राहिल्यानंतर बाबूजींनी सरकार किंवा मंत्रिपद आणि पत्रकारिता यांची भेसळ कधीच होऊ दिली नाही. माझ्या मंत्रिपदाची चिंता करू नका… तुमचे काम तुम्ही करत राहा, असे बाबूजी सांगायचे. ते शब्द हवेतील नव्हते.
एक उदाहरण मुद्दाम सांगतो, मी नागपूर लोकमतला संपादक असताना श्रीमती सीमाताई साखरे ‘मधुमालती’ हा कॉलम लिहीत असत. दर आठवड्याला तो कॉलम छापून येत असे. श्रीमती इंदिरा गांधी आणि त्यांची सून श्रीमती मनेका गांधी यांच्यात काही कौटुंबिक वाद होऊन मनेका गांधी घरातून बाहेर पडल्या होत्या. सीमातार्इंनी त्यांच्या कॉलममध्ये ‘सुनेला बाहेर काढणारी खाष्ट सासू’ या शीर्षकाने कॉलम लिहिला. संपादनासाठी कॉलम माझ्याकडे आल्यावर मी आगाऊगिरी करून त्या कॉलममध्ये इंदिरा गांधी आणि मनेका गांधी यांचा फोटो छापला. नागपूरमधील त्या वेळच्या एका काँग्रेस आमदाराने इंदिरा गांधींकडे तो लेखाचा फॅक्स पाठवला. दुसऱ्या दिवशी माखनलाल पोतेदार यांचा बाबूजींना फोन आला की, ‘मॅडमने आपको बुलाया हैं…’ कशाला बोलावले असेल ते लगेच लक्षात आले. बाबूजींनी मलाही बरोबर घेतले. इंदिरा गांधीजींच्या कार्यालयात भेट झाल्याबरोबर इंदिरा गांधींनी तो फॅक्स बाबूजींच्या समोर ठेवला. बाबूजी केवळ संपादक नव्हते. काँग्रेसमधील एक नेते होते. बाबूजींनी इंदिराजींना सांगितले की, ‘मॅडम, मेरे साथ सौ पार्टी के विचारधारा रखनेवाले काम करते हैं ऐसी चीजोंपर आपने जादा गौरसे ध्यान नही करना चाहिए…’
किती शांतपणे पण निश्चयाने बाबूजी बोलत होते. ते मी ऐकत होतो. न राहून मी मॅडमना म्हटले की, ‘बाबूजी रोज का अखबार देखते हैं ऐसा होता नही. जो किया मैने किया…’ इंदिराजींनी तो विषय तिथेच थांबवला. संध्याकाळच्या विमानाने नागपूरला परत आलो. बाबूजींमधील विशाल मनाचा माणूस मी पाहत होतो. एखाद्या वृत्तपत्राच्या मालकाने संपादकाला आणि कॉलम लिहिणाऱ्याला काढून टाकले असते. सीमाताई साखरे बाबूजींना भेटल्यावर म्हणाल्या की, ‘माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला…’ बाबूजी शांतपणे म्हणाले…, ‘ताई, तुम्ही तुमच्या कामाला न्याय दिला आहे. तुम्ही तुमचे काम करत राहा, माझी चिंता करू नका…’ असा मालक किंवा संपादक आज कुठे मिळेल? माणूस म्हणून बाबूजी फार मोठे होते. बाबूजींनी लोकमत परिवारातील किती जणांसाठी काय काय केले आणि किती केले त्याचे सगळे तपशील मला माहिती आहेत. पण बाबूजींनी डाव्या हाताचे उजव्या हाताला कळू दिले नाही.
१९८५च्या काँग्रेस शताब्दी अधिवेशनात यवतमाळच्या वृद्ध स्वातंत्र्यसैनिकाला मुंबईपर्यंत सुखरूप आणून त्यांना अधिवेशनाचा आनंद बाबूजींनीच दिला. राजीव गांधींची भेट करून दिली. त्यांच्यासमवेत फोटो काढले. नानासाहेब गोहकार, श्रीराम आप्पाजी आसेगावकर, दादा हूड, बिज्जीभय्या यादव हे सगळे बाबूजींचे सहकारी किती किती खूश झाले होते.
लोकमत आज दिगंत यशाच्या शिखरावर आहे. तिसरी पिढी आज लोकमत चालवते आहे. लोकमत उभा करताना बाबूजींच्या सोबतच विजयबाबू आणि राजेंद्रबाबू यांची जिद्दही मोठी आहे. शिवाय पसारा वाढल्यावर या दोन बंधूंचा मुकेश-अनिल झाला नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. शंभर रुपयांची जाहिरात मिळवण्यासाठी विजयबाबू मुंबईत पायपीट करीत होते हे आज कोणालाही खरे वाटणार नाही.
बाबूजींची इच्छा होती की, मुंबईत लोकमत सुरू करून लोकमतच्या यशाचे वर्तूळ पूर्ण व्हावे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शेवटच्या दिवसांत उपचार घेत असताना बाबूजींचे शेवटचे वाक्य होते, ”विजय-राजन, बम्बई का क्या?” अवघ्या सात महिन्यांनंतर मुंबईचा लोकमत सुरू झाला. तो बघायला बाबूजी नव्हते. पण बाबूजींनी लोकमतची कमान खूप पक्की बांधून ठेवली. कमान बांधताना त्याला लोखंड – बांबूंचा आधार देतात. कमान बांधून झाल्यावर आधार काढून घेतात. आधार काढून घेतल्यावर कमान कोसळली नाही, तर तो आधार पक्का होता असे समजतात. लोकमतच्या उंच कमानीचा मुख्य आधार बाबूजी होते आणि म्हणून लोकमतची कमान उंच राहिली. बाबूजी आज नसल्याने त्यांची उणीव सतत वाटत राहिली तरी लोकमतने त्या मार्गावरूनच जायला हवे. देशातील सर्वांत श्रीमंत माणूस मुकेश अंबानी आहे हे पत्रकारांनी शोधून जगाला सांगितले.
लोकमतने महाराष्ट्रातील सर्वांत गरीब माणूस शोधून काढावा आणि त्याच्या मागे लोकमतने उभे राहावे. नागपूर लोकमत म्हणजे वडाचे झाड आहे. औरंगाबाद लोकमत हे पिंपळवृक्ष आहे या दोन वृक्षांच्या दहा शाखा आहेत. या दहा शाखांमध्ये महाराष्ट्रातील गरीब माणूस, नडलेला माणूस, पीडलेला माणूस आणि गांजलेला माणूस लोकमतकडे आशेने पाहतो आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढय़ात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सने स्वातंत्र्य सैनिक जवाहरलाल दर्डा यांना मरणोत्तर लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित केले होते.
जवाहरलाल दर्डा यांचे निधन २५ नोव्हेंबर १९९७ रोजी झाले.
— मधुकर भावे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply