३ एप्रिल १९८० ची रात्र !
“मंतरलेली चैत्रवेल ” पाहण्यासाठी, विशेषतः जयराम हर्डीकरला भेटण्यासाठी आमची वेगवान पावले सांगलीतील जनता नाट्यगृहाकडे निघालेली ! जयराम म्हणजे रंगभूमीच्या संसारातील हाताशी आलेला कर्ता मुलगा – ” सिंहासन “, “सर्वसाक्षी ” आणि “२२ जून ” मधून आकर्षण केंद्र बनलेला, तर शांताबाई (जोग) म्हणजे घरातला मायेचा वृद्ध वृक्ष !
धावतपळत गेलो तरी नाटक सुरु होऊन गेलेलं . आम्ही प्रेक्षागृहाच्या दारात आणि जयराम रंगमंचावरील दारात !
पहिलंच दर्शन हाताला कायमचा सुगंध जडवून गेलं.
मध्यंतरात त्याला भेटलो, सही घेतली. बोलता बोलता नकळत त्याने प्रेमाने मारलेली थाप अंगभर भिनवून घेतली.
५ एप्रिलची दुपार – अपघाताची आणि जयराम/शांताबाईंच्या मृत्यूची वार्ता आली.
दुसऱ्या दिवशी माझी व जयरामची – म्हणजे कोळशाच्या ढिगाची वृत्तपत्रातून अखेरची भेट झाली.
शक्य असूनही मी अपघातस्थळी (कामेरीला ) गेलो नाही. तो ढीग माझ्या पाठीवर थाप मारणार नव्हता. समिंद्रा / पूर्णिमा पाटीलचा निरोप घेणार नव्हता, टॉम अल्टरला चाफेकर बंधूंची माहिती देणार नव्हता. स्मिता पाटीलशी नजरेची जुगलबंदी करणार नव्हता.
जयंताला रडताना मी पहिल्यांदाच पाहिलं. एकदा त्याच्याशी लावलेली पैज अनाहूतपणे आठवली – ” एकदा तुला रडताना पाहायचंय.”
“शक्य नाही. या इंजिनिअरिंग च्या चार वर्षात मी तुला कधीच रडताना दिसणार नाही.”
पण जयरामचा अकाली मृत्यू त्यालाही भिजवून गेला होता. त्याच्या अश्रूंच्या थेंबातून जयराम मला खिजवत होता. ही हार कोणाची?
नंतर जयंताने सांगितले – ” आमचे भाऊसाहेब ( निवृत्त प्राचार्य असनारे ) नेहमी म्हणतात ”
” आयुष्याची पैज जिंकणाऱ्याचा गौरव, परमेश्वर त्याच्या अकाली मृत्यूने करतो.”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply