जे घडते ते मान्य ईश्वरा
वेळ अशी का सांगून येई
लोभ कदापी सुखें न देई
ईश्वरास त्या दोष येई!!
सुख गिळूनी टाकतो प्राणी
दुःखे रवंथ होती
ईश्वरास त्या बकोटे धरुनी
खावी लागे माती
अर्थ–
‘वैतागलोय, खरंच मला पळून जावसं वाटतंय. असं वाटतंय ना की निघून जावं. हे माझ्याच नशिबी का? मी वैरी आहे का देवाचा? काय घडतंय हे माझ्याच आयुष्यात?’- हे असे शब्द, ही अशी वाक्य आपल्या आजूबाजूला काही ना काही कारणाने कोणी ना कोणी म्हणत असतोच.
कोणाला जॉब नाही म्हणून, कोणी परीक्षेत पास झाला नाही की, कोणाला व्यवसात जमत नाही म्हणून तर कोणी 2 लाख पगार असूनही एवढाच का? म्हणून.
जीव जन्माला आला की त्याला लोभ, हव्यास, ईर्षा, क्रोध, द्वेष या पाच जणांनी घेरलंच म्हणून समजा, पण जर तेथे प्रेम, आपुलकी, आदर, समाधान, माणुसकी या पाच पडद्यांचा वावर असला की दूषित हवा या मानवी घराच्या आतल्या म्हणजेच मनाच्या गाभाऱ्यात येत नाही आणि तेथेच माणूस कमी पडतो.
मला एखादी गोष्ट मिळाली नाही, किंवा एवढीच मिळाली, किंवा मला नाही मिळाली पण त्याला मिळाली, अथवा मला मिळाली पण त्याला का मिळाली? या असमाधानी विचारांनी घेरला जाऊन त्याचा संपूर्ण दोष हा देवावर टाकला जातो. आणि ती प्रक्रिया पुढचे कित्येक महिने सुरु राहते. पण जर एखादी चांगली गोष्ट घडली तर मात्र आपण अतिशय चांगल्या मनाने त्याच देवासमोर केवळ 5 सेकंद हात जोडून उभे राहतो आणि नंतर ती गोष्ट विसरून जातो.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply