जे का संकटी अडकले
त्यांसि म्हणे जो आपुले l
तो ची ‘सोनू सूद’ ओळखावा
‘देवदूत’ तेथेची जाणावा ll
परवा ‘सोनी’ वाहिनीवर कपिल शर्माच्या शो मध्ये सिने अभिनेता सोनू सूद आला होता. त्या कार्यक्रमातून त्याने कोरोना लाॅकडाऊनच्या काळात दाखविलेल्या माणुसकीची ओळख नव्याने झाली. रुपेरी पडद्यावर खलनायक रंगवणारा हा अभिनेता प्रत्यक्षात आजच्या देशव्यापी संकटात ‘महानायक’ ठरला.
सोनूचा जन्म १९७३ ला पंजाबमधील एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई शिक्षिका तर वडिलांचे कपड्यांचे दुकान होते. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने नागपूरला येऊन बी. ई. ची पदवी प्राप्त केली. नंतर नोकरीसाठी त्याने मुंबई गाठली. महिना साडे पाच हजार रुपये देणारी नोकरीही त्याने काही वर्ष केली. जोडीला जाहिरातीसाठी माॅडेलिंगही करीत होता. पहिल्या माॅडेलिंगच्या कामाचे त्याला पाचशे रुपये मिळाले, ते खर्चून त्याने स्वतःला जीन पॅन्ट घेतली. १९९६ साली त्याने सोनालीशी लग्न केले आणि त्याचे दिवस पालटले.
सोनूला अभिनयाची आवड होतीच. प्रयत्नातून त्याला पहिली संधी १९९९ मध्ये एका तमिळ चित्रपटाने मिळाली. साऊथच्या पाच यशस्वी चित्रपटांनंतर तो हिंदी चित्रपटात काम करु लागला. त्याची हिंदी चित्रपटसृष्टीला खरी ओळख झाली ‘युवा’ मधील अभिषेकच्या भावाच्या भूमिकेपासून. ‘दबंग’ने त्याचे नाव झाले व फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला. आजपर्यंत त्याच्या नावावर ८० हून अधिक चित्रपट आहेत. तेलगु, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी, पंजाबी, इंग्रजी भाषेत त्यानं चित्रपट केलेत. ‘कुंग फू योगा’ या चायनीज चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चेन बरोबर सोनूने काम केले आहे.
सोनू हाॅलिवूड अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलीओनला आदर्श मानतो. तब्येतीसाठी तो जिम कधीही चुकवत नाही. एकवीस वर्षांच्या या कारकीर्दीत त्याने भरपूर कमाई केली. मुंबईत आल्यावर संघर्षाच्या काळात वन रुम किचनमध्ये पाच मित्रांबरोबर रहाणाऱ्या सोनूने स्वतःचे थ्री स्टार हाॅटेल उभे केले.
सगळं काही सुरळीत असताना मार्च २०२० पासून देशाला कोरोना महामारीचे ग्रहण लागले. सर्व छोट्या-मोठ्या व्यवसायांबरोबर चित्रपटसृष्टी देखील ठप्प झाली. सोनूने एक समाजकार्य म्हणून स्वतःचे थ्री स्टार हॉटेल कोरोनाने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी मोकळे करून दिले तसेच उपासमार होणाऱ्या परप्रांतातील कामगारांना जेवणाची पाकीटे देण्यास सुरुवात केली. एके दिवशी त्याला दहा तरुण मुलांनी विनंती केली की, आम्हाला जेवणाची दहा पाकीटे पार्सल करुन द्या. सोनूने त्याचे कारण विचारल्यावर त्यांनी आम्ही आमच्या गावी चालत जाणार आहोत असं सांगितलं. सोनूला त्या रात्री झोप लागली नाही. त्याच्या डोळ्यासमोर गावी निघालेले ते दहाजण पायी चालताना दिसत होते.
त्याने दहा तज्ञ मित्रांची एक टीम उभी केली. प्रत्येकाला वेगवेगळी कामे वाटून दिली. ज्या लोकांना आपल्या गावी जायचे आहे त्यांची राज्यानुसार वर्गवारी केली. त्यांचे नाव, मोबाईल नंबर, इ. माहिती संगणकावर जमा केली. सुरुवातीला काही लक्झरी गाड्या बुक करुन एकेक ग्रुप राज्यानुसार पाठवला. प्रवासात त्यांची खाण्यापिण्याची काळजी घेतली. हळूहळू आपल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढू लागली. या सर्वांचे योग्य नियोजन करून हजारो लोकांना त्यांच्या कुटुंबात सुखरूप पोहचविले. बिहारमधील एका तरुणाने तिथे पोहचल्यावर वेल्डींगचे दुकान सुरू केले व त्या दुकानाला कृतज्ञतेपोटी ‘सोनू सूद वेल्डींग वर्क्स’ असे नाव दिले.
प्रत्येकाची घरी व्यवस्थित पोहचल्यावर सोनू सूद ने फोन करुन खात्री करून घेतली. त्यांना तेथेच कामधंदा मिळावा म्हणून एक अॅप तयार केले, त्यामुळे जेणेकरून त्यांना तिथेच रोजगार मिळून ते सुखी राहू शकतील. केरळमधील १७० लोकांनी सोनूला ओरीसामध्ये सोडण्याची विनंती केली. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन त्यांना विमानाने ओरीसाला पोहोचवले. आज त्याला अनेकांचे ‘धन्यवाद’ ‘म्हणून फोन येतात. सोनू मात्र हे आपले कर्तव्यच आहे असे मानतो. कोरोना गेल्यावर सोनू सूद भारतातील कोणत्याही राज्यात गेला, तर त्याच्या स्वागताला या शेकडो सुहृदांचे दरवाजे उघडे असतील.
आज मुंबईत हजारो करोडपती आहेत, त्यातील एखाद्याच सोनूला समाजासाठी काहीतरी करावं असं वाटणं हे देखील फार मोलाचं आहे. कोरोनामुळे अनेकांनी परराज्यातील लोकांसाठी आपले दरवाजे बंद केले, सोनू सूदने आपल्या हृदयाचे दरवाजे उघडून त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहचविले. त्या हजारों माता पित्यांचे आशीर्वाद त्याला आयुष्यभर साथ देतील. तो किती मोठ्या मनाचा आहे याचं उदाहरण म्हणजे वडिल गेल्यानंतर त्याने ‘बाॅम्बे क्लाॅथ स्टोअर्स’ हे दुकान बंद न करता दुकानातील कामगारांकडून पैशांची अपेक्षा न ठेवता त्यांना त्यांच्याच उदरनिर्वाहासाठी चालू ठेवायला सांगितले.
सोनू सूद ने कार्यक्रमाच्या समारोपावेळी सांगितले की, आजपर्यंत व यापुढेही चित्रपट सृष्टीत काम करुन मिळणाऱ्या पुरस्कारांपेक्षा अधिक समाधान मला हे समाजाचे ऋण फेडून मिळाले आहे….
सोनूच्या या अलौकिक कार्यावर म्हणावं वाटतं…
सोनू, तुझ्यावरच सर्वांचा भरोसा हाय, हे तुला ठाऊक नाही काय?…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३-८-२०.
Leave a Reply