जे नाही हाती
ते सोडून द्यावे
विचारें मना तरीही
सुखं कसे पहावे
दुःख जागून जातो
अश्रू ही फुलांचा
भ्रमर नेई तोही
क्षण आसवांचा
अर्थ–
जे आपलं नाही त्याचा अट्टाहास करणं कितपत योग्य आहे? सुखाने जगण्यापेक्षा समाधानाने जगणे जास्त महत्वाचे नसते का? सुख- दुःख येतात जातात, पण समाधान हे टिकून रहातं आणि त्यामुळे दुःखाचाही सुखाकडे जाणारा मार्ग न्याहाळता येतो आणि समाधानाने जगता येतं. एवढं होऊनही मनुष्य सुखाने कसे जगता येईल, दुःख कमी कसे करता येईल, हेच पहातो. पण समाधानी कसे होता येईल हे मात्र त्याला साधे विचारात सुद्धा घ्यावेसे वाटत नाही.
आजच्या काळात एखाद्याच्या दुःखाचा सुद्धा वापर काही वृत्ती त्यांच्या असुरी आनंदासाठी उपभोगतात आणि मग विश्वास या नावाच्या गोष्टीचा तिथेही अंत होतो. फुलाची पाकळी जेव्हा कळीतून उमलणाऱ्या फुलाकडे प्रवास करीत असते तेव्हा बाजूने उडणारा भ्रमर म्हणजे भुंगा त्यातुन निर्माण होणाऱ्या मधुर अशा रसाला आपल्यात घ्यायच्या संधीची वाट पहात असतो. म्हणून माणसाने वृत्तीने समाधानी असावं म्हणजे कोणाच्या आनंदाचा क्षण आपण चोरून किंवा उध्वस्त करून आपली सुखाची शिदोरी भरू नये. कारण दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेलं सुख फार काळ टिकत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply