ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे
उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे १
संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले
समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले २
खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे
बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ३
विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो
यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ४
संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी
प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ५
वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची
आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ६
एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी
शोधीत होतो ‘आनंद’ तेथे, मिळेल काहीतरी ७
हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे
गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ८
ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह
संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ९
मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम
कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण १०
आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला
देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ११
हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही
‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई १२
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply