प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी
कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।।
जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो
विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।।
मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन
अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।।
कांहीं असती नास्तिक कांही असती आस्तिक
त्यांत कांही ज्ञानी मस्तक चर्चा करिती प्रभूची ।।४।।
सत्य परिस्थीती ऐसी कुणी न जाणले प्रभूसी
सर्वांची चालना तर्कासी प्रभू अस्तित्वा विषयीं ।।५।।
फक्त एकमुखी वाच्यता असे ती सर्वता
महान शक्ति असता त्या ब्रह्मांडामध्यें ।।६।।
सर्वानी जाणले एक ‘अपूर्व शक्ती’ ह्याचा चालक
त्याच उर्जेचे हे प्रतीक सारे विश्वमंडल ।।७।।
कुणी नाहीं दुजा भाव समजोनी त्या शक्तीची ठेव
ज्ञान विज्ञान देती नाव निरनिराळे त्या शक्तीसी ।।८।।
कुणी म्हणती राम कुणी म्हणे रहीम
कुणी संबोधती गौतम येशू असे कुणाचा ।।९।।
परी तत्व नसे वेगळे नांवे होत निरनिराळे
सामान्यास ते न कळे हीच खरी शोकांतिका ।।१०।।
सारे जीवन निघून जाई परी त्या शक्तीचा बोध न होई
विश्लेषण करीत राही त्याच्या अस्तित्वाविषयी ।।११।।
जाणावी ती शक्ती रुप आकार त्यासी नसती
शक्ती समजोनी करावी भक्ती आदरभाव ठेवून ।।१२।।
मानवजन्म श्रेष्ठ ठरविला विशेष बुद्धी मिळून त्याला
विचार शक्ती उमजण्याला सर्वप्राण्यामध्ये ।।१३।।
बहूत झाले विद्वान कर्तव्याने मिळवी मान
मानव जातीची ती शान ह्या संसारी ।।१४।।
मार्ग निरनिराळे दाखवी सारे मिळती एक ध्येयी
सर्वार्पण त्या शक्ती होई ध्येय मिळतां जीवनी ।।१५।।
विचार करा मनाशी वैर आपले आपणाशी
नसते केंव्हां प्रभूशी हेच मूळ दुःखाचे ।।१६।।
वाद नसतो ध्येयापरी चर्चा असे मार्गापरी
हीच मानव निर्मिती खरी सर्व सुख दुःखाची ।।१७।।
तथा कथीत पंडित विद्वान सामान्यात
बहूजनांपेक्षां ज्ञान त्यांचे थोडेसे ज्यास्त ।।१८।।
वापरुन ज्ञान शक्ती सामान्यजनास वाकविती
आपले अस्तित्व स्थापती विसरुन प्रभू शक्तीसी ।।१९।।
तर्क शक्ती थोर “आहे चा नाही” करणार
“नाहीं ला आहे” पटविणार , करुनी ज्ञानाचा खेळ ।।२०।।
मार्गाचा करुनी भेद वाद करीत राही
जीवन करी बरबाद विसरुनी ध्येयासी ।।२१।।
ध्येय हे साध्य, मार्ग हे साधन
वाया जाई आयुष्य माध्यम साधन समजून ।।२२।।
साध्य नका समजू साधनासी ठेवा विश्वास साध्यासी
कोणत्याही साधनाने साधका प्राप्त साध्य होई ।।२३।।
अनेक मार्गाचे प्रयोजन ज्ञान शक्ती वापरुन
स्व अस्तित्व ठेवण्या टिकवून ।।२४।।
आस्तित्वाची भावना मोठी प्रत्येक झगडतो त्यासाठीं
सकळजन आयुष्य खर्ची त्या पोटी ।।२५।।
न कळे त्यास देवपण भांडण्यांत जाई विसरुन
टाकी आयुष्य मातीमोल करुन ।।२६।।
विसरुन जा सर्व भेद मिटवा वादविवाद
नष्ट करा त्वरीत लहान मोठ्यांचा संवाद ।।२७।।
न कुणी मोठे न लहान सारेच आहे समान
असती सारे मानवनिर्मित घ्या सारे समजून ।।२८।।
ज्ञात धर्म होत अनेक हे मानवनिर्मीत प्रतिक
न कळे अज्ञाना सर्व मार्गाचे ध्येय एक ।।२९।।
मानव शक्ती तीच ईश्वर दुसरा नसे कोणी वर
सगुण रुप देऊनी आपणची देतो त्यासी आकार ।।३०।।
मानवता हाच धर्म खरा आपसातील भेद विसरा
जीवन सुखी करण्या प्रभू देई तयांना आसरा ।।३१।।
— डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply