मानवाला जीवनमुक्त अवस्था प्रदान करण्याच्या एकमेव उद्देशाने अम्मा-भगवान यांनी वन्नेस विद्यापीठाची स्थापना केली. आंध्र प्रदेशातील वरदेपालयम येथे या विद्यापीठाचे जागतिक केंद्र आहे आणि जगाच्या विविध भागांत त्यांच्या वतीने आध्यात्मिक अभ्यासक्रम राबविले जातात. जीवनमुक्ती अर्थात अकारण आनंद आणि प्रेमावस्था ही प्रदान केली जाते, ती मिळविता येत नाही, हे त्याचे सूत्र आहे. स्वतः अम्मा-भगवानांनी ‘जीवाश्रम’ या शाळेच्या स्थापनेतून आपल्या ईप्सित कार्याला प्रारंभ केला आणि आज त्यांचे जगात लक्षावधी साधक आहेत. भगवान म्हणतात, ‘मानवी जीवन म्हणजेच नातेसंबंधांचा प्रवास आहे. हे नातेसंबंध सुरळीत झाले की मानवाच्या मुक्तीच्या अवस्थेतील अडसर दूर व्हायला विलंब लागत नाही.’ एखाद्या आध्यात्मिक गुरूकडून ज्याप्रमाणे काही तत्त्वं सांगितली जातात, त्यातलंच हे एक, असा माझाही समज होता; पण जेव्हा वन्नेसच्या अभ्यासक्रमांना मी सुरुवात केली, त्या वेळी या नातेसंबंधांचा आपल्या जीवनावर होणार्या परिणामांची जाणीव होऊ लागली. आजवर आपल्याला जे जे आध्यात्मिक ज्ञान, उपदेश देण्यात आले होते, त्यापेक्षा वेगळे भगवानांनी काही सांगितले नव्हते; पण वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या जे संस्कार होतात त्याचेच वेगळे संदर्भ या अभ्यासक्रमातून
जाणवू लागले. एखाद्या मुलाचा वा मुलीचा जन्म होतो म्हणजे काय होते? कोणी आई होते, कोणी वडील, कोणी भाऊ, आजोबा, काका, मामा… असंच बरंच काही. स्वाभाविकपणे जन्माबरोबर मिळतात ते नातेसंबंध… त्यातून मिळणारं प्रेम, माया, ममत्व आणि असूया, द्वेष, तिरस्कारही! अशा या जन्मसिद्ध नातेसंबंधांना सुरळीत आकार देण्यातून जीवन सुरळीत होऊ शकतं. अन्यथा आपल्यावर सातत्यानं अन्यायच झाला, असं आई-वडिलांना सुनावणारी मुलं आपण सहजी पाहतो. भाऊ हा स्पर्धक असतो की सखा हेही अशा संबंधांवरूनच कळतं. आपल्या मुलांचा द्वेष करणारे आई-वडील काही कमी नाहीत. नातेसंबंधातले हे अंतरच मग तुमचं जीवन स्वर्ग किवा नरक बनवितात. भगवान म्हणतात, ‘प्रत्येक जण परमेश्वराचं अस्तित्व मानतो असं नव्हे;
पण आई-वडिलांच्या अस्तित्वाशिवाय आपलं अस्तित्व असूच शकत नाही यावर वाद होत नाहीत. त्यामुळेच मानवी जीवनाचा प्रारंभ जिथून होतो, त्या आई-वडिलांना परमेश्वर मानणे ही नातेसंबंध सुधारण्यातील पहिली पायरी आहे. आज आमच्याकडे अनेक युवक-युवती येतात. कल्पक, विचारी, जबाबदार, बुद्धिवान आणि तरीही विस्कटलेले, निराश झालेले, दिशा गवसत नसलेले आणि मनात कमालीची हळहळ ठासून भरलेलेही! या मुलांशी आम्ही
संवाद साधतो, त्यांचा त्यांच्या स्वतःशी संवाद घडवितो, त्यांना त्यांच्या यशाच्या मार्गातील अडथळ्यांचे दर्शन घडवितो आणि अवघ्या चार-सहा दिवसांत सुरवंटाचं फुलपाखरू व्हावं तशी ती मुलं मोहरून जातात. आई-वडिलांशी त्यांचं नवं नातं तयार होतं. एकदा मनातले मळभ दूर झालं की सारी दृष्टीच स्वच्छ होते. अवकाशही स्पष्ट होते आणि दृष्टीला यशाचा टप्पा निश्चित करता येतो. नातं मग ते पती-पत्नीचं असो वा सासू-सुनेचं. ते बॉस आणि सबॉर्डिनेटचं असो वा ग्राहक आणि विक्रेत्याचं… एकदा नातेसंबंधातले अडथळे दूर झाले, नातं घट्ट झालं मग सुरू होतो तो आनंद आणि आनंदच…
मानवाला जीवनमुक्त अवस्था प्रदान करण्याच्या एकमेव उद्देशाने अम्मा-भगवान यांनी वन्नेस विद्यापीठाची स्थापना केली. आंध्र प्रदेशातील वरदेपालयम येथे या विद्यापीठाचे जागतिक केंद्र आहे
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.
Leave a Reply