इतरांचे आपल्याबद्दलचे मत,निरीक्षण सरळ दुर्लक्ष करावे या वैचारिक समृद्धीपर्यंत मी काही वर्षांपूर्वी पोहोचलो. माझ्यावरील संस्कार, माझे पालक, गुरुजन आणि माझा जीवनप्रवास यांच्याबद्दल कृतज्ञता हा सध्या स्थायीभाव केलाय! बाकीचे शांतपणे कुंपणापलीकडे ठेवतो मी.
माझे लढे, माझ्या पडझडी, माझ्या बेरजा-वजाबाक्या आणि त्यातून झालेले आघात यांच्याबद्दल सजग राहणे जास्त महत्वाचे. स्वतःभोवती चौकटी बांधणे रुचते आणि इतरांना त्या खिडक्यांमधून अलिप्तपणे निरखणे मस्त वाटते.
त्याला आधार मिळाला डॉन मिगुएल रूईझ या मेक्सिकन सर्जन च्या अनुभवांमधून, जो विज्ञानाकडून एका साक्षात्काराच्या क्षणी अध्यात्माकडे वळला. त्याच्या मते पौर्वात्य शहाणीव भावनिक स्पष्टता, उपचार आणि स्वातंत्र्य यांवर उभारलेली आहे. यांच्या मदतीने आयुष्य अधिक समृद्धपणे जगता येते असे त्याच्या प्रत्ययाला आले.
आयुष्याच्या प्रवासात खरेखोटे, बरेवाईट यांचा अदमास घेणारी एक आंतरिक यंत्रणा असते जी इतरांच्या मतमतांतरावर विसंबून नसते. स्वतःला आतून जे आवडते,त्यांवर प्रेम करावे आणि जगावे. अशावेळी आपल्याबद्दल काय बोलले जाते याकडे शांत दुर्लक्ष करावे. ही आंतरिक यंत्रणा आपल्या श्रद्धा,अनुभव,आस्था, इतरांचे मूल्यमापन करण्याची व्यक्तिगत कुवत यांवर आधारलेली असते.
एखादी आस्था परंपरेने कदाचित अशी आलेली असेल- ” बाकीचे म्हणतात त्यात काहीतरी तथ्य असेलच ना! “. म्हणजे आपल्या अस्तित्वावर त्यांच्या मताचे शिक्कामोर्तब (validation) असावे. समाजाला मान्य असतील असे काही वर्तनाचे ठोकताळे आपण पाळायलाच हवेत का? अन्यथा माझ्याबद्दल जे बोलले जाते,ते खरे असेल असे मी स्वतःला बजावायला हवे का?
या समजुती विचारांमध्ये कधीतरी अडकल्या की सगळं आपोआप बंधनकारक होत जातं आणि अचेतन पातळीवर वावरायला सुरुवात करतं.
धडा १ – आपला भवताल आणि संस्कार, भरणपोषण पुरेसे असते आपल्या शोधाला, सर्जनाला.
धडा २- स्वतःशी सहमत असाल तर इतरांच्या मतांचा विचार न करणे
धडा ३- आंतरिक यंत्रणा जर सदोष आणि घातक असतील तर तिच्या दुरुस्तीसाठी आतल्या आवाजावर अधिक विसंबणे.
स्वतःशी करार-
१) शब्दांमधील सामर्थ्य सत्य आणि प्रेम यासाठीच उपयोगात आणणे
२) दुसऱ्यांच्या मतांची,कृतींची तमा बाळगू नका.
३) गृहीतके टाळा.
४) फक्त सर्वोत्तमावर विसंबून राहायला शिका
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply