वर्षावती अखंड जीवनी परागकण
छोटे छोटे अगणित असे चैतन्यकण
अमोलिक असतो अविरत अपूर्व आनंद
जपण्यात जगण्यातले सारे इवलेपण
इवल्या गोजिऱ्या हळव्या कळ्या
नाजूक निष्पाप कोवळ्या पाकळ्या
फुलतानाही बिचकत दचकत अवघडलेल्या
उबदारशा एका ओंजळीस आसुसलेल्या
निर्माल्यणापूर्वी हृदयी धरुन येतील फुलवता मळे का?
अथक, अखंड ध्यास हव्यासाचा
धडपड मी माझा जोपासण्याचा
सोडून भास मृगजळ गाठण्याचा
का न वहावा निर्झर निखळ समर्पणाचा
सत्यभामेचा पारिजातक जोपासणे अंगणी मला जमेल का?
जीवन आहे अव्याहत धडपड
शरीरमनाची सतत पडझड
पराभवाचे कढ नि अवमानाचे सल
झेलूनही फुलवावा स्नेहाचा परिमल
नीलकंठाचा दाह पचवून हसणे ओठी विलसेल का?
आयुष्याची समीकरणे जेव्हा उपचारापुरती
विरते वाळू, उरती केवळ गृहित नाती
भासाने तुझ्या दव माझ्या डोळ्यांत जिवंत व्हावा
कोरडलेल्या काळजात कोंब पुन्हा तरारुन यावा
चांदण्यांना स्पर्शणारे श्वास मला कधी गवसतील का?
-यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(२८/७/१९९८)
Leave a Reply