आधीच्या दोन नाटीकांत पाहिलतं ना मुखवटे कसे घालावे लागतात ते आणि ते मुखवटे कसा चेहरा मोहराच बदलून टाकतात ते? तरीही मुखवटे घालण्याची हौस कांही जात नाही. जोपर्यत मानवजात ह्या जगांत आहे तोवर तोंडाला रंग फासणे चालूच रहाणार. नाटकाच्या अपार आकर्षणाचं एक कारणं हे ही असू शकेल की माणसाच्या वाट्याला येतं उणंदुणं एकच आयुष्य. पुनर्जन्म असलाच तरी फक्त आताचच आठवतं ना? म्हणजे एकच हे खरं? ह्या एका आयुष्यांत बालपणापासून आपल्याला कोण कोण होण्याची इच्छा असते. क्रीकेट मॕच पाहून आलो की क्रीकेटर व्हायचं मनाशी पक्क ठरवतो. मला विजय हजारे सारखा क्रीकेटर व्हायची इच्छा असायची. २० डब्यांच्या मेलमधून जाताना इंजिन ड्रायव्हर होण्याचं पक्क व्हायचं. शिक्षक होण्याची इच्छाही होती पण आमच्या एका शिक्षकांनीच, शिक्षकांना फार कमी पगार असतो, “”मिळत नाही भीक तर मास्तरकी शीक””, इ. हे वारंवार ऐकवून शिक्षक होण्यापासून परावृत्त केलं. झालं इतकचं की एका सद्गुणी शिक्षकाचा सन्मान करण्याची राष्ट्रपतींची संधी गेली. तर लहान पणापासून अशा भूमिका करायच्या राहून जातात. एखादाच आचार्य अत्रे किंवा पु.ल.देशपांडे एकाच आयुष्यांत शिक्षक, लेखक, नाटककार, पत्रकार (आ.अत्रे), नट, दिग्दर्शक (पु.ल.), सिने निर्माता अशा अनेक भूमिकांतून लिलया विहरतांना दिसतात. बाकी सर्व बहुदा एकच भूमिका पेलताना मेटाकुटीला आलेले दिसतात. म्हणून नाटकांत थोडा वेळ कां होईना वेगळ्या नावाने वेगळ्या जगांत वावरायचं आकर्षण वाटणारचं. मग त्या पात्रावर लेखक दिग्दर्शक यांनी किती कां बंधने टाकलेली असेनात. किंवा भूमिका कितीही छोटी कां असेना? ज्या भूमिकेत एका हातांत भाला
घेऊन, प्रेक्षकांकडे पाठ करून स्टेजवर दोन तास फक्त उभ रहायचं काम असतं, ती करायलाही कोणीतरी पुढे येतो. जीवननाट्याची लांबी रूंदी सुध्दा त्या आद्य नाटककारानेच बेतलेली नसते कां? आता ह्याच प्रसंगात काय झालं पहा ना?
(गावातल्या डॉक्टरांचा एकसष्टी समारंभचालू आहे. स्टेजवर डॉक्टर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आणखी कोण कोण असेल ते तुमच्या कल्पनेवर सोडतो. डॉक्टरांच्या गळ्यांत हार आहे).
पहिला वक्ता –अध्यक्ष महाशय, सत्कारमूर्ती
डॉक्टरसाहेब आणि बंधुभगिनीनो, डॉक्टरांच्या एकसष्टीनिमित्त होणा-या या सत्कार समारंभाला आपण हजारोंच्या (गांवची लोकवस्ती हजारहून कमी) संख्येने उपस्थित राहिलांत, यावरूनच त्यांची लोकप्रियता सिध्द होत नाही काय? हातच्या कांकणाला आरसा कशाला अशी गोष्ट झाली ही. डॉक्टर हे आपल्या गावाचं भूषण आहेत. (खूण करतो. टाळ्या) डॉक्टर आपल्या गावाचं वैभव आहेत. (टाळ्या).आपल्या गावामधलं चालतं बोलतं, अं..स्मारक आहेत.( यालाही टाळ्या). डॉक्टरांनी ह्या गावासाठी काय नाही केलं? (थांबतो). डॉक्टरांनी या गावासाठी सर्व कांही केलं आहे. जे जे शक्य होतं ते सर्व केलं आहे. ( पुन्हा काय काय केलं ते आठवण्याचा प्रयत्न करतो. कांही आठवत नाही.) त्यांनी केलेल्या कार्यांची यादी जर मी देत बसलो तर सभेची वेळ आपल्याला पुरणार नाही. शिवाय त्यांनी केलेलं कार्य तुमच्या समोरच आहे. (कॕमेरा डॉक्टरांच्या मुलावर). अशा ह्या डॉक्टरनी आता फक्त ह्या गावातच सडत राहूं नये. त्यांनी आता राजकारणात गेलं पाहिजे. महाराष्ट्राला आज त्यांच्या सेवेची गरज आहे. म्हणजे राजकारण आजारी आहे ना! (स्वतःच हंसतात). गेला बाजार आरोग्यमंत्रीपद तरी त्यांना मिळायला हरकत नाही. तशी त्यांची लायकी मुख्यमंत्री व्हायचीच आहे. पण डॉक्टर भिडस्त आहेत. ते कांही मुख्यमंत्र्याच्या पदासाठी
होणा-या वादांत पडणार नाहीत. तर आता डॉक्टरांनी दवाखान्यात थोडं कमी लक्ष घालून राजकारणांत लक्ष घालावं. कधी नव्हे एव्हढी आज राज्याला त्यांची गरज आहे. त्यांच्या एकसष्टीला हीच इच्छा प्रदर्शित करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो.
दुसरा वक्ता– आजचे अ-आद्यक्स, आमच्ये लाडके डाक्तरसाहेब आणि बंधुभगिनीनो, डाक्तरांच्या एकसष्टीच्या प्रसंगी आपण सर्व्यांनी डाक्तरांबद्दल चांगलच बोललं पायजे. त्ये बरोबरच हाय. तरी पन त्यांनी पुढं काय करावं हे सांगनं म्हणजे मास्तराला आपन लिवायला शिकवण्यासारखं हाय. आमाला पन डाक्तरांची लायकी माहित हाय. उलट आमाला त्यांच्याबद्दल जे सिक्रेट माहित हाय, ते कुनाला भी माहित नसलं. (जीभ चावतो). आणि बंधुभगिनीनो, डाक्तरांच्या एकसष्टीच्या प्रसंगी आपण सर्व्यांनी डाक्तरांबद्दल चांगलच बोललं पायजे. त्ये बरोबरच हाय. तरी पन त्यांनी पुढं काय करावं हे सांगनं म्हणजे मास्तराला आपन लिवायला शिकवण्यासारखं हाय. आमाला पन डाक्तरांची लायकी माहित हाय. उलट आमाला त्यांच्याबद्दल ज्ये सिक्रेट ठावं हाय ते दुस-या कुनाला भी ठावँ नसलं (जीभ चावतो.) डाक्तर राजकारनांत ग्यालं अन तेन्ला मंत्रीपद नाय गावलं तर त्यालही गेलं नी कायतरी ग्यालं म्हनत्यात तसं
व्हनार नाय काय? डाक्तरांनी तेच्यापक्षी आपलं काय म्हनत्यात ते सोताचं चरीतर ल्याव्ह. ते बघा ते समद्या गावच्याच नाय पन देशाच्या भी लोकांना मारग दावील. लोक तेंच्यापासून लई शिकतील. त्यात ते आपलं हम दो हमारे ते बी आपोआप येईल. कारन डाक्तरांनी तेच्यासाठी आपल्यावर लई मेहनत केलीय. तरी आपल्यांत कायी गणंग हायतचं. पर ते आसू द्या. तर डाक्तरांनी असं कांहीबाही ल्याव्हं मंजी त्येना ते कुटलं बघा –हां त्येच- नोबल पराईजही मिळेल. आता मला तुमीच सांगा राजकारन बरं की हे पराईज बरं? थांकू.
तिसरा वक्ता- (बोलण्याचा ढंग नाटकी) अध्यक्षमहाशय, माननीय डॉक्टरसाहेब आणि सज्जन स्त्रीपुरूषहो, आतापर्यंतच्या वक्त्यांची भाषणे ऐकून मला आज डॉक्टरांची एकसष्टी आहे की चंपाषष्ठी आहे हेच कळेनासे झाले आहे. ( हंसतो).
आज दस-याचा सण, तुम्ही हजारो नाही (हंसतो) पण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेले आहात, हा कपिलाषष्ठीचाच योग म्हटला पाहिजे. मला गहींवरून आल्यामुळे
कांही दिसेनासं झालेलं आहे. समष्टी आज डॉक्टरांच्या एकसष्टीला एकत्र आली आहे. अशा प्रसंगी डॉक्टरांच्या गुणगौरवाची गाथा गायची सोडून आपले सज्जन मित्र डॉक्टरांनी हे करावं, डॉक्टरांनी ते करावं असे सल्ले कां बरं देताहेत? डॉक्टरांनी केलेलं काम इतकं महान् आहे की सृष्टीने सुध्दा मान डोलावली आणि आज कार्यक्रमाआधीच पावसाची वृष्टीही केली. डॉक्टरसाहेब आमच्या छोट्या नाट्यसंस्थेचेही अध्यक्ष आहेत. त्या नात्याने त्यांनी आम्हांला अनेकदां मदत करून उपकृत केले आहे. डॉक्टरांचा नाटकांकडला ओढा पाहून आम्ही अनेकदां चकीत झालो आहोत. त्यांना अभिनयाची उत्तम जाण आहे, त्या शिवाय कां त्यांनी आम्हाला मदत केली असती? त्यांच्यात एक कुशल दिग्दर्शकही दडलेला आहे. ते शस्त्रक्रियेतही निपुण असल्याने नाटकांतला कुठला भाग जसं शरीरावरचं गळूं कापावं, तसा कापावा हे त्यांना चांगलं कळतं. माझी खात्री आहे की डॉक्टरांनी मनावर घेतलं तर ते एक रसिकमान्य लेखक-दिग्दर्शक-नाटककार होतील. मी डॉक्टरांना या उपक्रमांत सुयश चिंतीतो.
अध्यक्ष– बंधुभगिणींनो, आतापर्यंतच्या वक्त्यांणी डॉक्टरांचे बरेच गुनगौरवगाण केलं आहे. आमचं एकच म्हननं आहे की ह्यांणी डॉक्टरांवर पक्षपात केला आहे. ह्या सर्वांणी सांगितलेल्या गोस्टी डॉक्टर एकाच वेळी करू शकतील. आम्हाला खात्री आहे की डॉक्टरांची पंचात्तरी होईल, ती सुध्दा आमच्याच अध्यक्षतेखाली होईल आनि तेव्हां डॉक्टर मंत्री, णोबेलप्राईजईनर आनि नाटककार अशे सर्व कांही झालेले असतील. डॉक्टरांचा सत्कार झालेला आहे.
भाषनेही झाली आहेत तर आतां मी डॉक्टरांना विणंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे.
डॉक्टर– अध्यक्ष महाशय, गांवची प्रतिष्ठीत मंडळी आणि बंधुभगिनीनो, तुमचा सर्वांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि तुमचं प्रेम मला सदैव स्फूर्ती देत राहील. आजचा सत्कार आणि तुम्ही व्यक्त केलेल्या सदीच्छा मला सदैव नवीन बळ देतील. (मनांत थकलेली बीलं आठवून आवंढा गिळतात.) तुम्ही माझ्या भावी आयुष्याबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा– मी–मी– पु-या — —
(डॉक्टर अचानक खाली कोसळतात. गर्दीतून “”अरे डॉक्टरांना अचानक काय झालं? हार्ट अॕटॕक आला कां काय?”” वगैरे आवाज. आतापर्यंत दृष्टीपथांत नसलेले डायरेक्टर आणि कॕमेरामन दृष्टीपथांत येतात)
डायरेक्टर — कट इट. कट इट ! छेः,
डॉक्टर — (पुन्हा उभे राहता राहता) कां? काय झालं?
डायरेक्टर — अरे हे काय पडणं झालं? अचानक अॕटॕक आल्यामुळे पडणारा माणूस काय असा पडतो? आणि तोसुध्दा स्वतः डॉक्टर असणारा? हात छातीवर न्यायचा वगैरे सगळं विसरलास? अगदीच भिकार शॉट दिलास — चला, चला — लेट अस हॕव रिटेक — फक्त शेवटच्या भागाचा…
समाप्त.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply