दादा, अवो दादा, बिगी बिगी चला, बाळाप्पा मालकाला कायतरी झालंया….. ओरडतच शिवाप्पा आत आला.त्याचा चेहरा भीतीने ग्रासला होता, चित्त ठिकाणावर न्हवते. जणू त्याचे खूप कांही हरवले होते. मी क्लिनिक मधील पेशंटस् संपवून नेहमीसारखा पुस्तक वाचत बसलो होतो.बाबुराव अर्नाळकरांचा मानसपुत्र झुंजार आज काय करामती करणार आणि इन्स्पेक्टर आनंदरावांची कशी फिरकी घेणार याचे रसभरीत वर्णन वाचत होतो.1980 च्या दशकात हाच तो काय विरंगुळा होता, नाहीतर माडीवर घरी गेल्यावर विविधभारती, सिलोन वरची गाणी. मी म्हणालो, अरे शिवाप्पा, काय झालंय नक्की ते तरी सांग, बसून बोल. शिवाप्पा बसला.दीर्घ श्वास घेतला, तो पळत आल्यामुळे दम लागला होता. उसासे घेत म्हणाला, दादा बिगी बिगी चला, मालकास्नी कायतरी झालंया, वरडत वरडत खुंट्या,खिडकी धरत जोरात जिमिनिवर पडल्यात.घामानं बदडल्यात, कांदा लावला ,पानी मारलं पन एक नाय दोन नाय. मी त्याचे ऐकत ऐकत पायात चपला घातल्या,बॅग नेहमीच भरलेली असायची, रोजचे 4-5 कॉल असायचे, त्यामुळे रिफिल ही रोज करायचो.ग्रामीण भाग, आमच्या खेड्याभोवती 15-20 वाड्या, वस्त्या, 5 -6 खेडी.पंचक्रोशीत आम्ही मोजून 4 डॉक्टर.त्यातून मी खाली दवाखाना आणि वर घर असणारा म्हणजे 24 तास उपलब्ध ! पैशासाठी किचकिच न करणारा.त्यामुळे दिवसभर पेशंट्सची भरपूर गर्दी असायची.
मी सायकल काढली, शिवाप्पाला कॅरेज वर बसायला सांगितलं, बॅग मांडीवर घेऊन तो बसला, मी पेडल दाबून फिरवू लागलो,बाळाप्पा खोताच्या मळ्यात जायचं म्हणजे अर्धा तास नक्कीच लागणार होता.
बाळाप्पा खोत बऱ्यापैकी श्रीमंत. दहा एकराचा काळ्याभोर मातीचा मळा, त्यात असणाऱ्या दोन तुडुंब भरलेल्या विहिरी. एक विहिरीला पंप तर दुसरीला मोट, शेताला पाणी पाजवून हिरवं गार करायची आणि बाळाप्पाचा खिसा नोटांनी भरत ठेवायची. साईड बिझनेस म्हणून बाळाप्पा सावकारी करायचा, अडल्या, नडलेल्याला पैसे देऊन जास्त अडचणीत आणायचा, पैसे देतानाच वर्षाचे व्याज कापून घ्यायचा. आलेला गरजू डोक्यावर भोपळ्याएवढे कर्ज आणि कनवटील आवळ्या एव्हढे पैसे घेऊन तीन तीन वेळा पाया पडून जायचा.
बाळाप्पाची बायको विहिरीच्या पंपावर शॉक बसून 6 महिन्यांपूर्वी देवाघरी गेली आणि पन्नाशीच्या बाळाप्पाने दोन महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केल्याचे कानावर आले होते.फारसा गाजावाजा न करता बाळाप्पा यादीवर शादी करून आला होता. शिवाप्पा हा त्याचा सालकरी गडी, गेली अनेक वर्ष बाळाप्पा सावकाराकडे होता.पडेल ते काम करायचं, गुरेढोर सांभाळायचा.
दादा, मालकाचं आज कायतरी भांडान झालं बगा, मालकीनी संगट. दोगं बी वरडून वरडून भांडत हुती, मालकानं काटीनं हाणलं मालकिणीला, तिचं केस धरून वडत जोत्यावर आनली आणि मालकाला छातीत कळ आली, काटी टाकून छाताडावर हात बडवत, हाताला काय लागलं त्या खुटीला, खिडकीला धरत खाली पडला बघा, घामात भिजला हुता..मालकीणीन कांदा आणला, मी जनावरांची वैरण कडबा कुट्टी करत हुतो, जाऊन मालकाला धरलं, पानी मारलं तोंडावर, कांदा लावला, पन मालक उटचना, मग पळत सुटलो बगा तुमास्नी हाटकायला ……..हे सगळं दवाखान्यात तो बोलला असता तर कदाचित मी जायला नकार दिला असता, या भीतीपोटी मनांत साठवलेलं सगळं एक दमात बोलून रिकामा झाला, जणू छातीवरचा मणाचा धोंडा कुणीतरी काढला.
शिवाप्पाने सगळी स्टोरी सांगून मन मोकळे करून घेतले.काय झाले असणार याचा अंदाज येऊन मी थोडा निराश झालो, पण वेळेत पोचू शकलो तर त्याला वाचवायचा काही प्रयत्न करता येईन या आशेवर जोराने पायडेल फिरवू लागलो.आशा हीच एक शक्ती आहे जी नेहमीच नवीन बळ देते, शक्ती देते त्या जोरावर आम्ही 5 मिनिटे लवकरच पोचलो.तरीही खूप उशीर झाला होता.नियतीने जे ठरवलेलं असतं तेच घडतं, याचा प्रत्यय आला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बाळाप्पाचा जीव घेतला होता.मी विमनस्क आणि हताश झालो होतो, मृत्यूशय्येवरील रुग्णाला वाचवता आले तर त्यात आभाळाएव्हढे समाधान मिळते, रात्ररात्र जागून अभ्यास केल्याचे फळ मिळाले अशी सुखद भावना पुनः रुग्ण पहायला, उपचार करायला हत्तीचे बळ देते.
मी बाळाप्पाच्या नाडीवरचा हात काढत वर बघितलं, बाळाप्पाची बायको भेदरलेल्या हरिणीसारखी उभी होती, कावरी बावरी झालेली, खूप घाबरलेली.माझ्याशी नजरा नजर होताच तिला सगळे समजले आणि तिनं हंबरडा फोडला. ऐन विशीतली, काळी सावळी पण रेखीव चेहरा असणाऱ्या बायकोचे शरीर उफाडयाचं होतं. मी दोन मिनिटं थांबलो, तिचं सांत्वनही करू शकत न्हवतो, शिवाप्पाला म्हणालो, कळव बाबा भावकीला. तसे बाळाप्पाचे भाऊबंद बरेच होते, काहीतरी शेतातच रहायचे, बाळाप्पासारखे.बांधाला बांध असणारे. एव्हाना शेजारच्या मळ्यातील माणसं पोचू लागली होती. एक जीव वाचवू शकलो नाही हि खंत मनात घेऊन मी निराश होऊन सायकलवर स्वार झालो, धीम्या गतीनं पायडेल फिरू लागलं. खरेतर मला जीव वाचवण्यासाठी काही करण्याची संधीच मिळाली न्हवती, शिवाप्पा माझ्याकडे पोचण्यापूर्वीच हा जग सोडून गेला असणार त्यामुळे सायलकच काय मी विमानाने आलो असतो तरी काही करू शकलो नसतो. आणि शेवटी कुणाची जीवनरेखा किती हे ठरवणारा तो आहे, मी एक पामर, मी काय करणार अशी मनाची समजूत घालत मी वेग घेतला.
डॉक्टरने पेशंटशी भावनाप्रधान होऊन गुंतू नये, हे माहीत होतं, पण नुकताच डॉक्टर झालो होतो, अनुभवाचे टक्के टोणपे खाऊन येणारे शहाणपण हळू हळू येत होते, पण मन व्याकुळ झाल्याने रस्ता संपत न्हवता.
कामाच्या रगाड्यात हा विषय पुसट होत गेला. आणि अचानक एके दिवशी बैलगाडीतून एक पेशंट घेऊन शिवाप्पा आला. पेशंट म्हणजे बाळाप्पा खोताची बायको होती, मलूल झालेली, उलट्या, जुलाब यामुळे त्राण न राहिलेली.मी वेळ न घालवता आय व्ही लावले,इंजेक्शन दिली. चार बाटल्या सलाईन संपतो ती बऱ्यापैकी रिकव्हर झाली, आता काळजीचे कारण न्हवते, संध्याकाळी पेशंट संपले आणि शिवाप्पा आला.
काय शिवाप्पा, अजून खोताकडेच आहेस का ? काहीतरी विचारायच म्हणून विचारलं. तो हळूच हसला, डोळे मिश्किल झाले, नकळत मिशिवर बोटे न्हेत तो म्हणाला, दादा, तसं न्हाई आता, मी लगीन केलंय रेखासंगट ! मी दचकलोच, आणि खऱ्या अर्थाने मी त्याच्याकडे नजर टाकली, त्याचा अवतार पूर्ण बदलला होता, बंडी आणि मुंडास जाऊन टेरिकॉटचा शर्ट , फेटा आला होता, पट्ट्या पट्ट्याच्या चड्डीच्या जागी विजार आली होती, बोटांत अंगठ्या, मनगटावर सोनेरी घड्याळ ..गळ्यात चेन !
मी आश्चर्याच्या धक्क्यातून बाहेर पडण्यापूर्वी तो बोलू लागला…..
दादा, सावकार मेला आणि हि एकटी पडली,भाऊ बंद हिरीच्या पान्यासाठी, बांधासाठी हिला तरास देऊ लागलं,मी गडी मानुस काय बोलनार ? पन मी हिची बाजू घेऊन राहिलो बघा, मग तिला म्हणलो, बाई ग तू एकटी, एव्हढा मळा सांभाळणार आनी दुनिया तुला काय सरळ जगू देनार न्हाई, बग करतीस का लगीन ?
मी शिवाप्पा कडे पहातच राहिलो.इतकी वर्ष खोता कडे गपगुमान, खाली मान घालून अंगावर पैसे घेऊन मुकाट्याने राबणारा सालकरी फक्त कर्ता पुरुष गेल्यावर किती धीट झाला !
अरे,तुझं लग्न अजून झालं न्हवत ?
तो थोडं हसत,थोडं लाजत बोलू लागला. ते का दादा झालंय मागचं, तवा तुमी बारकं हुतासा.. एक पोरगा बी हाय, आताच दहावी पास झालाय. मागीनदी जरा वांदं झालं आनी बायको म्हायेरला गेली, जमखंडीला .. पोराला घेऊन.ती ईना मी बलविना ह्यातच संपलं बघा. पोरगं शिकत हुत तिकडं कानडी शाळत म्हून गप्प हुतो, आता त्याला आननार हाय, आता धा एकरचा मळा हाय, पोरगं लागलंच की.औंदा ट्रॅकटर बी घेनारं हाय, चालवल की त्यो!
अरे आणि बायको ? तिचं काय ?
माझ्या प्रश्नांन थोडा खजील होत म्हणाला, दादा ते लगीन मागं पडलं आता, दैवात जेवडं हुत तेवडं टिकलं … आता तिची ती, माजा मी.
आर्थिक परिस्थिती बदलली आणि उत्तम झाली की माणसाची निर्णय क्षमता वाढते !
रेखा बरी होऊन घरी गेली. आणि चार महिन्यांत शिवाप्पा मुलग्याला घेऊन माझ्याकडे आला, कुठल्यातरी सरकारी योजने अंतर्गत त्याला ट्रॅक्टर साठी बिन व्याजी कर्ज मिळणार होते आणि त्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट हवे होते.
काय शिवा सावकार, काय नांव मुलाचं ….
सत्याप्पा ….शिवा उत्तर देत असतांनाच मुलगा बोलू लागला. मराठीत बोलला तरी हेल कानडी होता. नको, सतीश म्हणा, मी नांव बदलून घेतलो बघा.
अरे इतकी मस्त बॉडी आहे, सहा फूट उंची आहे, मिलिटरीत का गेला नाहीस ! मी त्याला तोंडी सर्टिफिकेट आधी दिले आणि लेखी नंतर !
दिवस पुढे जात होते, अधून मधून सतीश गावातील रस्त्यावरून ट्रॅकटर पळवत जाताना दिसायचा. माझे रहाट गाडगे नियमित सुरू होते. वेगळे पेशंट, वेग वेगळे आजार, नवी येणारी औषधं,वाढलेल्या बाळंतपणाच्या केसेस यामुळे काम हि खूप वाढलं होतं. मी स्कुटर हि घेतली. गावात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झालं होतं. हळू हळू गांव कात टाकत होतं. गावाजवळ एक सहकारी सूतगिरणी सुरू झाली होती आणि गांवात शेकडो नवी कुटुंब भाड्याने घर घेऊन राहू लागली होती. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. बघता बघता वर्ष कशी सरत होती हेच कळत न्हवते.
मी दोन दिवस माझ्या बहिणीच्या लग्नानिमित्य परगावी गेलो होतो
परतलो आणि समजले, शिवाप्पा सर्प दंशाने मृत्युमुखी पडला. ग्रामीण भागातील डॉक्टरच्या नशिबात असा जन्म मृत्यूचा खेळ अगदी शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असा चालू असतो.
आता मी लग्नासाठी तयार होतो, वधू परीक्षेचे चहा पोहे दर आठवड्याला होऊ लागले, असे वर्षभर चालले, लग्न ठरले, लग्न झाले. माझे व्याप वाढले.
एक दिवशी रात्री अकरा वाजता, घरासमोर ट्रॅकटर थांबल्याचा आवाज आला, पाठोपाठ कर्ण कर्कश हॉर्नचा आवाज.मी गच्चीत आलो,लाईट लावला, पाहिलं तर सतीश आला होता.
सायेब, मळ्यात चला, बायको बाळंतपणाला बसलीया ….
अरे इकडे नाही का आणायचं ? मी निरर्थक प्रश्न विचारला.
खेड्यात बहुतेक सगळी बाळंत पणं घरातच सुईणी करवी व्हायची, अगदी बाळंतीण अडली, कॉम्प्लिकेशन्स झाल्या की मग डॉक्टर ची आठवण यायची. मग त्या अवघड वेळी बाळंतिणीला आणणे शक्य नसायचे. धड चालायला रस्ते नाहीत, तिथं वाहनं कुठून येणार ? मग बोलावणे यायचे. मी एकदा बाळंतपणाला गेलो की कधी कधी 3-4 तास हि लागायचे. त्यामुळे आज रात्री झोप मिळणार नाही हि खूणगाठ मनाशी बांधत त्याला म्हणालो, चल हो पुढे, पाणी तापत ठेव, येतोच मी.
बाळंतपणाला जायचे म्हणजे माझ्या 2 बॅग्स तयार असायच्या, एकदा बॅग उघडून नजर फिरवली आणि स्कुटरला किक मारली.
खोताच्या मळ्यात पोचलो, बॅग घ्यायला लगबगीनं सतीश आला, घरातून बाळंतिणीच्या ओरडण्याचा आवाज येत होता, वेळ न घालवता मी आत गेलो, सुईण अमिना बसलेली होतीच. अमिना हुशार आणि प्रसंगावधानी सुईण होती. मी तिला अम्मा म्हणायचो.मी सतीशला बाहेर थांबायला आणि खोलीत लाईट चालू करायला सांगितले. खेड्यात बहुतेक बाळंतपण अंधारातच पार पडायची.
दिवा लावून सतीश बाहेर गेला, मी बाळंतिणीकडे पाहिले, रेखा …उखडी बसून बाळंत कळा सोसत होती. मनांत म्हटलं, सतीश मुर्खच आहे,आई बाळंतपणाला बसली हे कसं सांगायचं म्हणून बायको म्हणाला असेल ! वेळ विचार करण्याची न्हवती, माझ्यातला डॉक्टर कार्यरत झाला.
तासाभरात मुलगी झाली, इतर सोपस्कार पार पाडून बाहेर येईतो अजून अर्धा तास गेला. अम्माने मुलगीचा जन्म होताच ओरडून बाहेर वर्दी दिली होतीच.
मी बाहेर आलो, सतीश समोर आला, त्याने मला वाकून नमस्कार केला. गांगरून गेलेला दिसत होता, नाहीतरी 18 -19 वर्षाचा पोर काय करणार?
मी त्याची पाठ थोपटली. म्हणालो, अरे सगळं ठीक झालंय, बाळ-आई ठीक आहेत, काळजी करू नकोस.
तो तसाच गोंधळलेला होता. मग मीच बोलू लागलो.
काय झालं रे ? कसली काळजी करतोस ? आता तुझी आई बाळंतीण आहे, लहान बहीण आलीय घरी, तूच कर्ता आहेस घरातला.तूच सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजेस.शिवाप्पाची जागा तूच घेतली पाहीजे…
सायेब, हि माजी भन न्हाय, पोरगी हाय….बाबाला मरून तर दोन वरस झाली बगा.रेखा गरवार झाली आणि मग आमास्नी लगीन करावं लागलं……
अरे, म्हणजे ? सगळं माझ्या लक्षात आलं होतं, पण पचलं न्हवत.
सायेब, एव्हड्या मोट्या मळ्यात आम्ही दोगच बगा. दिसा गडी मानसं असायची पन रातीला …..
दोगांच्या जवानीनं घात केला सायेब. पोटाला बोट लागलं आनी हे आक्रीत घडलं…..
मी सुन्न झालो.
सायेब, पोटचं पाडायला गावठी औषध दिलं पण उपेग नाही झाला,काय करनार सायेब, एवढी इस्टेट हाय, मळा, घर, कसं सोडून देऊ ? मग केलो लगीन.
अरे पण…….आता मी गोंधळलेला होतो, माजी बुद्धी सुन्न झाली होती, म्हणतात ना….कांही गोष्टी अनाकलनीय असतात.
कुठल्या तरी खेड्यातून आलेल्या या रेखाचा प्रवास उमगत न्हवता. आपल्या बापाच्या वयाच्या बाळाप्पाची बायको म्हणून आली. परिस्थिती बदलली तर शिवाप्पा शी लग्न केलं, तो मेला तर त्याच्या मुलाशी ! अगतिकता की ……अजून काही ? प्रत्येक घटनेला अनेक पैलू असतात, बाजू असतात.जी बाजू आपल्याला दिसते त्यावरून आपली मतं बनतात.
न सुटणाऱ्या प्रश्नांचं, मानवी गूढ नात्याचं ओझं घेऊन मी स्कुटरला किक मारली. पण का कुणास ठाऊक आज काळ थबकला होता, स्कुटर पुढे जात होती मला घेऊन पण माझे मन अजूनही रेखाच्या भोवतीच फिरत होते. रेखा ! किती विलक्षण होती तिची जीवनरेखा !
@ अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
Leave a Reply