कमलाकर सोनटक्के यांचा जन्म २ फेब्रुवारी १९३९ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वडोद चैथा या एका लहान खेडेगावात झाला.
कमलाकर सोनटक्के हे नांव तसे मराठी -हिन्दी नाट्यश्रुष्टीशी खूपच निगडीत आहे. तसे म्हटले तर ह्या नाट्यकर्मींचे पाय जसे साहीत्य संघ मंदीरास लागत तसेच तें जे.जे. कला मंदीरास देखील लागत. त्याला कारण होती आमच्याकडील दोन माणसे. एक म्हणजे प्रत्यक्ष नाट्य क्षेत्राशी निगडीत असलेले नाट्यकर्मी प्रा. दामू केंकरे व दुसरें आमचे नाट्यप्रेमी प्रा. षांताराम पवार. या दोघांकडे बऱ्याच नाट्यकर्मींचे येणे जाणे असे.अश्यापैकीच एक नांव म्हणजे कमलाकर सोनटक्के. एक जेष्ठ आणि श्रेष्ठ असे नाट्य दिग्दर्शक व अभीनेते. ते औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाट्यशाखेचे प्रमुख होते. मुंबईला आल्यावर त्यांचे ओघानेच जे.जे.मध्ये येणे होत असे. मग केंकरें कडचे बोलणे आटोपले की स्वारी पवारांच्या केबीन मध्ये डोकावत असे. आणि मग रंगत दोघांच्या गप्पा. अर्थातच त्या नाट्य शास्त्रावरच्याच असत. कधीमधी तेथील विभागातील गंमतीही तोंडी लावण्यासाठी होत असत. आणि कुणालाही वाटावे की अश्या माणसाची मैत्री करावी.
कमलाकर सोनटक्के ह्या व्यक्तीला पाहील्यावरच त्यांचे भारदस्त व्यक्तीमत्व एखाद्यावर छाप पाडणारे होते. उंचापूरा देह. गौरवर्ण, डोक्यावर कुरळे केस, चेहऱ्यावर जाणवणारा खानदानी अन संस्कारी भाव आणि या सर्वावर कळस म्हणजे त्याचे इंदुरी लहेज असलेले अदबशीर बोलणे. जणू एखादा संस्थानिकच सामोरा आहे. असे वाटे की ऐतिहासीक चित्रपटातील नायकाचे काम करणारा अभिनेताच वाटावा असे. आणि प्रत्येकवेळी आल्यागेल्याचे ‘ जय हो!’ म्हणून केलेले प्रेमळ स्वागत. त्यामुळे एखादा प्रथमदर्शनीच त्यांच्या प्रेमात पडत असे.
पुढे मागे कायद्याचे शिक्षण घेऊन वकीली करायची ही माफक अपेक्षा बाळगून असलेला हा खेड्यातून आलेला लाजरा बुजरा मुलगा अचानक दिल्लीच्या ‘नॅंशनल स्कूल ऑफ ड्रामा ‘ (एन.एस.डी.) या जगविख्यात संस्थेत प्रवेशासाठी ऑडीशन देतो काय, देशभरातून केवळ वीस विद्यार्थी निवडण्यात येतात त्यातून या मुलाला रंगभूमीचा विशेष अनुभव नसतानाही त्याची निवड होते काय, एवढेच नव्हे, तर शेवटच्या वर्षी सर्वप्रथम येऊन सुवर्ण पदक व भरत पुरस्कार मिळवतो काय, सर्वच त्यांच्या बाबतीत अघटीत होते. आणि निवड समितीत होते ते इब्राहीम अल्काझी, एक ख्यातनाम पेंटर, कवी, अभिनेते, स्टेज डिझाईनर आणि दिगदर्शक अश्या विविध गुणांची यूक्त असे एक आदरणीय व्यक्तिमत्व. या अल्काझींनी नाट्यश्रुष्टीला अनेक मौल्यवान असे हिरे शोधून त्यांना पैलू पाडून दिलें आहेत. मुन्शी प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ या कादंबरीवर आधारीत एक नाट्यप्रयोग त्यांनी बसवला होता, त्यातही सोनटक्केंचा सक्रीय सहभाग होता.
थोड्याच दिवसात सोनटक्केनी अल्काझींचे मन जिंकले. व ते त्यांचा जणू उजवा हातच बनले. सोनटक्के यांना तेथे शिकवणारे शिक्षकही देशांतील आपापल्या क्षेत्रांत नांव कमावलेले असें होते. आणि या सर्वाना अल्काझींनी प्रशिक्षीत केले होते. अल्काझींच्या प्रत्येक कामात त्यांना सोनटक्केंचा सहवास भासु लागला. पहिल्याच वर्षी त्यांच्या ‘अंधायुग’ या निर्मितीचे स्क्रिप्ट इनचार्ज म्हणून त्यांनी काम पाहीले. अल्काझींच्या कामाची ताकद त्यांना जाणवत होती. एकदा तर पंतप्रधानांची कांही मिनिटासाठी असलेली भेट, त्यांनी संपूर्ण शो पाहून गेल्याची त्यांची आठवण होती. याशिवाय एन.एस.डी.च्या फादर, कंजूष, द ट्रोजन वुमन, तुघलक, किंग लियर, हिरो, अंधा युग अशा काही महत्वाच्या निर्मितीमध्येही सोनटक्केंचा सहभाग होता. त्यावेळी जागतीक नाट्य महोत्सवात आलेल्या ३७ नाट्यकृतींच्या राष्ट्रीय महोत्सवामध्ये ‘किंग लियर’ या नाटकाला सर्वोत्तम नाटकाचा सन्मान मिळाला. त्यांचे ‘गोदान’ जे कष्ट घेऊन त्यांनी उभारले त्यावेळी त्याच्या स्टेजचा एकेक इंच त्यांनी डिझाईनच्या दृष्टीने कसा उपयुक्त आहे, याचे सुंदर विवेचन केले. अल्काझींनी देखील त्यात तितकाच रस घेतला. आणि ‘गोदान’ने एक क्रांती केली. त्यावेळी त्याच्या उदघाट्न प्रसंगाला अल्काझींनी त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. झाकीर हूसेन यांना आमंत्रीत केलें होते. याप्रमाणे अल्काझींच्या एन.एस.डी. च्या व त्यांच्या वैयक्तीक प्रकल्पामध्ये सोनटक्केंचा महत्वाचा सहभाग राहीला त्यात त्यांचा फायदा हा झाला की त्यांना सर्व बाजूनी नाट्य क्षेत्राचा परीपूर्ण अभ्यास करायला मिळाला. या संपुर्ण काळात त्यांनी एक दिवसही रजा घेतली नाही. मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा करून घेतला. पुढे १९६६ ते १९६८ दरम्यान सोनटक्केनी एन.एस.डी. मध्ये संवाद, अभिनय, प्रॉडक्शन या गोष्टी शिकवल्या. सोनटक्के त्यांचे वक्तृत्व व सादरीकरण उत्कृष्ट होते. एकदा त्यांनी कवीवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितांचे हे सादरीकरण केले ते पाहून भारावून जाऊन अल्काझींनी त्यांना तीन वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली.
दिल्लीमध्ये सोनटक्के यांचे खूप काम झाले होते. अनेक नाटके त्यांनी बसवली. एन.एस.डी. चे ते एक मुख्य घटक बनले होते. त्यांच्याकडे आणखी एक काम असे, ते म्हणजे परदेशी पाहुणे, नाटक, चित्रपट, पेंटींग, साहीत्य अश्या क्षेत्रांतील दिग्गज जेव्हां ही संस्था पहायला येत, तेव्हां त्यांना संपूर्ण संस्था दाखवुन तिची माहीती देणे. व सर्व पाहून संपल्यावर त्यांना अल्काझींच्या केबीन मध्ये आणणे. एक दिवस असेच दोघे पाहुणे आले. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सोनटक्के यांनी त्यांना आपल्या गोड इंग्रजी शब्दात अभ्यासपूर्ण माहीती दिली व शेवटी त्या दोघांना अल्काझींच्या दालनात आणले. आत आणताच त्यांनी अल्काझींना विनंती केली, की तुमच्या या तरुण सहकाऱ्यासारखा नाट्यशिक्षक आम्हांला हवा आहे. आम्ही मुंबईत नाट्य शिक्षण अभ्यासक्रम सुरु करू इच्छीतो. मात्र त्याला मराठी भाषा यायला हवी. अल्काझींना आश्चर्य वाटलं. त्यांनी मला म्हटले, सोन, तू या लोकांना ओळखत नाहीस? हे महाराष्ट्राचे सांस्कृतीक आणि शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी, व हे दुसरे महाराष्ट्र राज्य पाठय पुस्तकाचे व साहीत्य संघातर्फे आलेले बापूराव नाईक. आणि त्यांना अल्काझींनी सांगीतले की त्याची जर इच्छा असली तर तो जाऊ शकतो. आणि त्यांना विचारणा झाली. आणि सोनटक्के मुंबईला आले. आणि साहीत्य संघात ‘अमृत नाट्य भारती’ या सायंकालीन नाट्य प्रशिक्षणाचे वर्ग सुरु झाले. सुरुवातीला केवळ बापूराव नाईक, वा.रा.ढवळे व दामू केंकरे यांच्याशिवाय तेथील कोणालाच विषेश गम्य नव्हते. नवतरुण तरुणी सोनटक्केंच्या शिस्तीखाली अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना अश्या सर्व बाबी शिकत होते. प्रत्येक नाटकाचे चार चार प्रयोग होत असत. तोपर्यंत सोनटक्के यांची दिल्ली व मुंबईच्या नाट्य वर्तुळात एक कल्पक दिग्दर्शक व अष्टपैलू नट म्हणून प्रसीद्धी झाले होती. दरम्यान या ‘अमृत नाट्य भारती’ या प्रशिक्षण शाळेत एका बुद्धीवान अशी शिडशिडीत बांध्याची व नाट्यक्षेत्राला वाहून घेतलेली कांचन नावाची विद्यार्थिनी त्यांच्या सहवासात आली. आणि दोघेही मनोमन एकमेकांचे झाले. पुढे ब्रिटिश कौन्सीलच्या शिष्यवृत्तीवर सोनटक्के दोन वर्षे लंडनला गेले. या लंडनच्या काळात त्यानी अनेक बाजूनी नाट्यशास्त्राच्या अभ्यास केला. अनेक दिग्ग्ज परकीय नाटककारांच्या सहवासात ते आले. त्यांच्याशी चर्चा झाली. त्याचा फायदा सोनटक्केना पुढच्या आयुष्यात झाला. या दरम्यान त्यांचा व कांचन यांचा पत्र प्रपंच सुरु होता. यू के वरून आल्यानंतर सोनटक्के औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशात्राचे प्रमुख झाले. आणि त्यानंतर १९७३ साली कमलाकर व कांचन दोघेही रीतसर विवाहबद्ध झाले. तेथे सौ. कांचन सोनटक्के यांनी सासरचे सर्व कुटुंब आपलेसे केले.
तसें पाहीले तर अमृत नाट्य भारती’ (अ ना भा) ही एक शिक्षकी शाळा होती. मोजके १२५ ते १५० प्रेक्षकांची हजेरी. पण त्यात कांही गुणवान समीक्षक असत. माधव मनोहर, राजा कारळे, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, सत्यदेव दुबे, सुहासीनी मुळगांवकर, चिं.त्र्यं खानोलकर, श्री.पु. भागवत, अशी तोलामोलाची माणसं त्यात होती. त्यांनी बराचसा प्रचार केला. पुढे औरंगाबादला गेल्यावरही तेथे सुद्धा हीच गत होती. विद्यापीठात या नाट्य विभागाची फारशी दखल कोणाला नव्हती. मात्र या विभागाचे कमी अगदी चोख चालू असे. विद्यार्थ्यांची उपस्थीतीदेखील जवळ जवळ १०० टक्के. एका शिस्तीत हे काम चालु असे. तेही पुन्हां एक शिक्षकी. शनीवार रविवारीही वाढीव वर्ग घेतले जात. आणि याकाळात सोनटक्केनी या विभागातर्फे एकापेक्षा एक असे सरस नाट्यप्रयोग निर्माण केले. त्यात ‘अंधायुग’ ‘अंधेर नगरी’, ‘चौपट राजा’ ‘पिकलं पान हिरवं रान’ ‘भगवद अज्जु कि यम, अशी नाटके होती. या औरंगाबादच्या पाच वर्षांच्या काळात सोनटक्केनी स्वतःला नाटक विभागात पूर्णपणे झोकून दिले होते. आणि त्यांच्या पत्नीने, जीला ते मॅडम असे संबोधतात, धीरोदात्त पणे सर्व संसार संभाळला. स्वतःच्या आवडीना, नृत्यकलेला मुरड घालून आपल्या दोन्ही मुलींचे संगोपन केले. सकाळी कामावर गेलेला नवरा रात्री दहा वाजता परतत असे. विद्यापीठात येणारे पाहुणे वास्तविक अतीथी गृहात उतरत असत. पण त्यांचा आदर सत्कार सौ. सोनटक्के आदराने करीत. यामध्ये भालबा केळकर, सुहासीनी मुळगांवकर, डॉ. अशोक रानडे, पुष्पा भावे असे नाट्यकर्मी असत. याकाळात संसार फुलवण्यासाठी कांचनताईंनी आपल्या नृत्य, नाटक या कलानाही मुरड घातली. पुढे सोनटक्केना मुंबईच्या इंडीयन नॅशनल थिएटरचे (आय एन टी) चे आमंत्रण आले. पण माझे काम मला हवे तसेच मी करणार हा त्यांचा आग्रह होता. आणि तो मान्यही करण्यांत आला. त्यांचे म्हणणे मान्य करून त्यांना बोलावण्यात आले. आय.एन.टी. च्या काळात त्यांनी मराठी व्यावसायीक नाटकापेक्षा प्राधान्य दिले ते हिंदी नाटकांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाला.
पूर्ण पाच वर्षे औरंगाबादला घालवून सोनटक्केनी त्या विभागाला ऊर्जितावस्थेला आणले. पण आता त्यांना त्याच त्या कामाचा उबग आला होता. आणि मग त्यांनी औरंगाबाद सोडून मुंबईलाच आपले कार्यक्षेत्र करण्याचे ठरवले. आणि निर्णय झाला. अर्थात पत्नीची संमती आणि पाठींबा होताच! मुंबईत व्यावसायिक रंगभूमीवर ‘सत्यम शिवम सुंदरम’ ‘आनंदी गोपाळ’ ‘ रक्त नको मज प्रेम हवे’ या नाटकांचे सुमारें दोनशेच्यावर प्रयोग केले. पुढे आय.एन.टी. च्या आग्रहावरून बहुभाषी प्रवीण अकादमी ऑफ थेटर्स सुरु केलं. नंतर नाटकांचे दौरे सुरु झाले. आणि व्यावसायिक नाटकांचे शेकडो प्रयोग केल्यानंतर पुन्हा ते आपल्या आवडत्या नाट्य प्रशिक्षणाच्या क्षेत्रात आले. त्यांनी वरळीला माझे सासरे बाळासाहेब जोगळेकर रहात होतें, त्यांच्या वरच्या मजल्यावर जागा घेतली. दोघांनी आधीचीच मैत्री. आणि सोनटक्के यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाचे संचालक म्हणून नियुक्त झाले. तेथें नेहमीच आमच्या भेटी होत असत. सतत त्यांचा चष्मा गळ्यात स्ट्रिंगला अडकवलेला असे. भेटल्यावर त्यांचे ‘जय हो’ हे शब्द कानी पडलेच पाहीजेत. इकडे कांचनताईंनी त्यांच्या दोन्ही मुली मानसी आणि मैथिली याना त्यांच्या आवडत्या सेंट कोलंबो स्कुल मध्ये घातल्या. आणि तेथेच पुन्हां कांचनताईंना आपला सूर पुन्हा गवसला. आवड म्हणून तेथील मुलांना त्या अर्धवेळ अभिनय शिकवायला लागल्या. अशोक पाटोळे, वसंत निनावे यांची बालनाट्ये ‘नाट्यशाळे’ तर्फे त्या सादर करू लागल्या. आणि नाट्यदिग्दर्शिका कांचन सोनटक्के यांच्या भराऱ्या उंच झेपावू लागल्या. आणि यशाची एकेक शिखरे पार करीत त्यांची ‘नाट्यशाळा’ उत्तरोत्तर यशस्वी होत गेली. या ‘नाट्यशाळेची’ स्थापना कांचन सोनटक्के यांनी १३ जानेवारी १९८१ साली केली होती. देशभरातील विविधांगी अश्या सांस्कृतीक कार्यक्रमांची ओळख मुले व शिक्षकांच्या माध्यमातून करून त्यायोगे जनतेचा बालनाट्याबद्दल समज घडवून देणे. त्यासाठी बालनाट्य प्रशिक्षण केंद्र व शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेणे. परफॉर्मिंग आर्ट च्या कार्यक्रमाद्वारे अनेक विकलांग, कर्णबधीर, मतिमंद व शारीरीक व्यंग्य असलेल्या बालकांना त्यामध्ये सामील करुन त्याद्वारे एक थेरपी म्हणून वापर करण्यात येत असे. त्यांचा भर सतत त्यांचा व्यक्तीमत्व विकासावर होता. बाधीत मुलांना त्यांच्या व्यक्तीगत न्यूनगंडातून मुक्त करून शरीर, मन आणि एकाग्रतेने अभिव्यक्त करायला त्या शिकवत होत्या. त्यांच्यातील संघभावना वाढवत होत्या. अश्या प्रकारे नाट्यशाळा ही संस्था आज या मतिमंद, कर्णबधिर, दिव्यांग मुलांना गुरु म्हणून मार्गदर्शक ठरली आहे. आणि हें सर्व निस्वार्थपणे उभारले आहे ते सोनटक्के यांच्या आवडत्या मॅडमनी, कांचन सोनटक्के यांनी!
यापुढील काळात सोनटक्केना केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या दक्षिण मध्य विभागाचे संचालक म्हणून नेमले गेले. त्यावेळी त्यांना नागपूर येथे जावे लागले. तेथेही त्यांनी पाच वर्षाचा कालावधी काढून आपल्या कामाचा ठसा उमटविला. इथंही त्यांनी माणसं घडविण्याचा, त्यांना सक्षम करण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला. १९८८ साली संचालक या नात्याने भारतीय नाटय सृष्टीला त्यानी भारतातून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. आंतरराष्ट्रीय नाटय मेळा ज्यामध्ये चीन, फ्रान्स, आफ्रीका असे देश सामील होते, असा हा मेळा मॉरीशस येथे भरला होता. त्यांचे उदघाटन आपले तत्कालीन प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव यानी केले होते. त्यामध्ये सुमारे १४० लोक कलाकार आणि ३६ कथक डान्सर सामिल होते, त्यांना सोनटक्केनी नेले होते. मुंबईच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक म्हणूनही काही काळ त्यांनी काम पाहीले. त्यावेळी पून्हा आमचा संबंध त्यांच्याशी आला. विशेषतः चित्ररथाची तसेच इतर कलात्मक सांस्कृतीक कामे आमच्याकडे असत. त्यावेळी एकदा मी जेजेचा डीन असताना त्यांना आमचा डिनचा बंगला पहावयास बोलावले. त्यावेळी तो सुंदर बंगला पाहून ते म्हणाले, हा जर आमच्या खात्याला मिळाला, तर त्याचा मी सुंदर रीतीने वापर करेन. तेव्हां मी त्यांना म्हणालो, आपल्यासारख्या सौंदर्यदृष्टी असलेले व निरंतर नाट्य हा धर्म समजून काम करणारे असे लोक नेहमीच असतील असे सांगता येत नाही. सदर व्यक्ती तेथून गेली की त्या खात्याचा चुथडा झालेला मी स्वतः पाहीले आहे. आणि हे प्रत्येक क्षेत्रात होत असते. आणि दुर्दैवाने आज आपण तो ओसाड बंगला पाहीला तर त्यातील सत्यता जाणवेल. एका मुलाखतीत त्यांनी सांगीतले होते की, कांहीजण म्हणतात की, दरवर्षी तुम्ही महोत्सवात तेच ते प्रकारे करत असता. पण हे लोक विसरतात की दरवर्षी येणारे स्पर्धक वेगळं असतात, नाटके वेगळी असतात, येणारे प्रेक्षक वेगळं असतात. त्यामुळे त्यात दरवेळी नावीन्य असतेच! महाराष्ट्रातील नाटकामुळे, नाट्यस्पर्धांमुळे त्यांचा लौकीक खूप दूरवर पसरलेला आहे. महाराष्ट्रातील कला अकादमी उभी राहील्यानंतर वेगवेगळे उपक्रम य अकादमीने घ्यायला हवेत. त्यासाठी या भागातील, या देशातील, परदेशातील दिग्दर्शक बोलावून त्यांच्याकरवी चांगल्या संहीता लिहून घ्यायला हव्यात, यामुळे एक वेगळ्या प्रकारचे दालन महाराष्ट्रात निर्माण होईल. पण आपल्याकडे यासाठी अग्रक्रम आखलेला दिसत नाही. यावेळी ते उदाहरण देतात ते मध्यप्रदेशातील लोककला अकादमीचा आणि भारत भवनचा. तेथे साहित्याच्या दालनापासून नाट्याच्या दालनापर्यंत आणि आदिवासी कलापासून ते अभिजात कलापर्यंत खऱ्या अर्थाने सर्वदूर जाणारे जे उपक्रम आहेत ते राबवले जातात. आपल्याकडे तसे उपक्रम राबवायला हवेत हे ते गौरवाने सांगतात. उलट महाराष्ट्रात तशा प्रकारची तज्ञ मंडळी अधिक आहेत. ज्यांचा लाभ आपल्याला घेता येईल, पण एका बाजूला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व दुसरीकडे कलावंतांचा शासनावर आणि प्रशासनावर जो एक प्रभाव पाहीजे तो दुर्दैवाने दिसत नाही.
पुढील काळात वरळीच्या ‘नेहरू सेंटर’ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहीले. २०१३ साली सोनटक्के यांना ‘संगीत नाटक अकादमी अवार्ड’ने सन्मानीत करण्यात आले. सोनटक्के जेव्हां आपल्या कारकिर्दीचा मागोवा घेतात, तेंव्हा त्यांच्या आठवणीतील नाटक म्हणजे १९७७ साली नाटककार वसंत कानेटकरांच्या रायगडला जेव्हां जाग येते या नाटकाचे संगीत कला अकादमीने बसवलेले हिंदीत केलेले ‘जाग उठा है रायगड’ हे नाटक. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्यातील नाते संबंधावर आधारीत आहे. या नाटकात सोनटक्के यांच्या सोबत त्यांची पत्नी कांचन, आणि मुलगी मानसी यांनीही भूमिका केल्या होत्या. अनेक संस्थांचे सल्लागार म्हणून काम केलेल्या सोनटक्के याना महाराष्ट्र शासनाने २००३ मध्ये ‘कला गौरव पुरस्काराने गौरविले. तसेच त्यांना इंडियन थेटर मधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी अवार्ड देऊन गौरविण्यात आले.
आज कोणीही विचारले तर प्रा. कमलाकर सोनटक्के सांगतात की, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने त्यांचा पिंड घडवीला. कला – नाट्य प्रशिक्षणाची दिशा दाखवली. अल्काझींच्या निःस्पृह सेवावृत्तीचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया समृद्ध केला. समोरून आलेल्या कामाचा नेहमीच सन्मानाने त्यानी स्विकार केला. आणि याचं संपूर्ण श्रेय ते देतात आपल्या ग्रामीण संस्काराला, श्रद्धेय माळकरी संस्कृतीला, आपली पत्नी सौ. कांचन सोनटक्के यांना, ज्यांनी आपलं सारं आयुष्य अपंगांच्या विकासाला वाहून घेतलं आहे. जिने आपल्याकडून कुठल्याही गोष्टीसाठी साधी अपेक्षाही केली नाही! गेली कित्येक वर्षे कांचनताई बाधीत मुलांच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा घेत असत. पुढे त्यांनी १५० बाधीत मुलांच्या कार्यशाळा घेतल्या. त्यांच्या या आगळ्या कामासाठी मॅडमना ‘दलित मित्र’ पुरस्कार मिळाला. ‘हिरकणी’ पुरस्कारानेही त्याना गौरविण्यात आले. ‘गोमंतकाच्या कर्तृत्ववान कन्या’ अंतर्गत त्यांचा लता मंगेशकर, प्रफुल्ला डहाणूकर, किशोरी आमोणकर अश्या दिग्गज कन्यकांसोबत गौरव झाला. तरीही हे जोडपे नेहमीच प्रसिद्धीपासून दूरच राहीले. आणि त्याच सोबत त्यांच्या कन्या मानसी आणि मैथीली यांनाही श्रेय अर्थातच जाते. तृप्त जीवन जगलेले कमलाकर सोनटक्के यांचा नाटक हा धर्म आहे. तर नाट्य माध्यम हा त्यांच्या दृष्टीने अनेकांना मोक्षाकडे नेण्याचा खेळकर मार्ग आहे. त्यांना राज्य स्तरांवर, तसेच राष्ट्रीय स्तरावर काम करायला मिळाले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या प्रशासकीय कामाला कलात्मकतेची जोड दिली. दिल्ली येथे त्यांच्या राष्ट्रीय नाट्य शाळेत अभिनय व दिग्दर्शन करणारे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी होते. तर मुंबईला मराठी साहीत्य संघात पहील्या महाराष्ट्र नाट्याभ्यास प्रशिक्षणाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते. मुंबईच्या इंडीयन नॅशनल थिएटरच्या बहुभाषी प्रवीण जोशी अकादमी मध्ये वेगळ्या रंगमंचीय अनुभवाचे विद्यार्थी होते. सोनटक्केनी राज्याच्या सांस्कृतीक धोरणात अनेक बदल केले. आजच्या नाट्यस्पर्धांतून हे अनेक अभिनेते मुख्य प्रवाहात पोचतात, त्या राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन कसे असावे यांचे त्यांनी घालून दिलेले धडे आजही आचरणात आणले जातात. कांचन सोनटक्के या त्यांच्या पत्नी. त्या अपंगांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी व पुनर्वसनासाठी काम करत असतात.
— प्रा. मं.गो.राजाध्यक्ष.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply