लहानपणी आई मुलाला खाऊ म्हणून एखादा पदार्थ तोंडात भरवते, इथूनच त्याचा तो पदार्थ आवडीचा होतो. बालवाडीत जाऊ लागल्यावर दप्तरात खाऊचा डबा दिला जातो..
हाच खाऊचा डबा शाळेत जाताना मधल्या सुट्टीत खाण्यासाठी पोळी-भाजीचा डबा होतो. त्याची साथ दहावीपर्यंत कशीबशी रहाते.. काॅलेजला जाऊ लागल्यावर तो नकोसा वाटू लागतो. त्यापेक्षा कॅन्टीनमध्ये मित्रांबरोबर वडापाव खाऊन भूक भागवली जाते…
शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी लागते. अशावेळी पुन्हा जेवणाचा डबा सुरु होतो. आई मुलांच्या आवडीचे पदार्थ तयार करुन डबा भरत असते. चार पाच वर्षांनंतर त्याचं लग्न होतं. आता डबा करण्याचं व भरण्याचं काम पत्नी करु लागते. तिनं कितीही चांगला स्वयंपाक करुन डबा दिला तरी आईकडून मीच त्याच्या आवडीचं करत होते, ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाते..
हे डब्याचं रहाटगाडगं, तो निवृत्त होईपर्यंत चालूच रहातं. पन्नाशीनंतर काही गोळ्या चालू झालेल्या असतील तर त्यादेखील डब्याबरोबर दिल्या जातात.. घरच्या पाण्याच्या बाटलीचीही डब्याच्या सोबतीने भर पडलेली असते… शेवटी तो निवृत्त होतो व तो डबा, एक ‘अॅन्टीक’ वस्तू म्हणून माळ्यावर धूळ खात पडून राहतो..
मी पहिलीत असताना, आई मला ग्लुकोजच्या चार बिस्कीटांचं छोटं पॅकेट किंवा गुडदाणीची वडी घेऊन द्यायची. शाळा जवळच होती, त्यामुळे मी डबा कधी घेऊन गेलोच नाही. न्यू इंग्लिश स्कूल शाळा देखील घरापासून जवळच होती. तेव्हाही मी मधल्या सुट्टीत घरी येऊन, जेवण करुन पळत पुन्हा शाळा गाठत असे. कधी आजारी पडल्यावर दुपारच्या सुट्टीत आई माझ्यासाठी, डबा व गरम पाणी घेऊन येत असे..
काॅलेजला डब्याची गरज कधीही वाटलीच नाही. कधी कॅन्टीन तर कधी डेक्कनवर मित्रांबरोबर खाणं व्हायचं…
‘गुणगौरव’मध्ये ऑफिस सुरु केल्यावर घर जवळच असल्याने दुपारी घरी जाऊन जेवण करुन येत होतो. बालाजीनगरला रहायला गेल्यानंतर डब्याला पुन्हा सुरुवात झाली.
सकाळी डबा घेऊन निघायचं. दुपारी दोन वाजता, डबा खाऊन घ्यायचा. रात्री आठपर्यंत घरी परतायचं, असा क्रम काही दिवसांनी कामांच्या व्यापानं बिघडला. एखादे दिवशी कामातून जेवणाला वेळ नाही मिळाला तर डबा तसाच रहात असे. कधी लवकर निघायचं असेल तर डब्याशिवाय ऑफिस गाठावं लागे. दुपारी ‘आस्वाद’ मध्ये जाऊन जेवण होत असे. जर त्यासाठीही वेळ मिळाला नाही तर एखादी डिश खाऊन भूक भागवावी लागे.
कधी डब्याकरिता वेळ लागणार असेल तर मी ऑफिसला निघून येत असे व माझ्या मुलाबरोबर घरुन येणारा डबा घेण्यासाठी मी शाळेजवळ जाऊन रिक्षावाल्याची वाट पहात असे..
अशी तीस वर्षे निघून गेली.. आता मुलाचा व माझा डबा, दोघी करीत असतात. डब्यात आठवणीनं कधी लोणचं तर कधी शेंगदाण्याची चटणी दिली जाते.. असा हा जेवणाच्या डब्याचा प्रवास, आपल्याला जीवनभराची ‘लज्जतदार सोबत’ करतो…
पूर्वीपासून प्रवासाला जातानाही जेवणाचा डबा बरोबर असायचाच. अगदी लहानपणी गावी सातारला जाताना आमची आई, बटाट्याची भाजी व चपात्यांचा डबा बरोबर घ्यायची. कधी प्रवासाला उशीर झाला, काही अडचण आली तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं कधीही चांगलं..
दिल्लीच्या रेल्वे प्रवासातही दोन दिवस पुरेल एवढा जेवणाचा डबा, आम्ही बरोबर घेतला होता. अगदी नाईलाज असेल तरच बाहेरचे पदार्थ खाल्ले जात असत.
आता अलीकडच्या लहान मुलांना, मॅगी सारख्या फास्टफूडचं जबरदस्त आकर्षण आहे. जाहिरातींच्या माऱ्यामुळे त्याची चटक लागलेली आहे. बालवाडीतील मुलाला डब्यात मॅगी दिल्याने, एका आईला मुलाला घेऊन दवाखान्यात जावं लागलं होतं.. काहीजणी मुलांना डब्यात केक, पेस्ट्री देतात. त्यामुळे मुलं लहान वयातच, लठ्ठ होतात.
आता जेवणाचा डबा मुलांना, विद्यार्थ्यांना नकोसा वाटू लागला आहे. फास्टफूडची हाॅटेलं, स्टाॅल्स बेसुमार वाढलेले आहेत. मॅक्डोनल्स, डाॅमिनोज, इत्यादी परदेशी कंपन्यांची पिझ्झा, पास्ताची आऊटलेट्स ठिकठिकाणी दिसतात. ‘ऑनलाईन’ ऑर्डर केल्यावर हवा तो पदार्थ मिळू शकतो म्हटल्यावर डब्याची गरज कुणाला भासेल?
पूर्वी ‘मुंबईचा डबेवाला’ हा सर्वश्रुत होता. प्रत्येकाचे घरुन डबे गोळा करुन ते लोकल प्रवासाने ज्याच्या त्याच्या कार्यालयात जेवणाचे वेळेआधी पोहोचणारी ही मोठी यंत्रणा, खरंच कौतुकास्पद अशीच आहे.. हे डबेवाले डब्यांची मोठी रॅक घेऊन प्लॅटफॉर्मवर, लोकलच्या डब्यातून, रस्त्यावरुन, हातगाडी घेऊन उन्हात, पावसात पळताना पाहिलेले आहेत..
याच डबेवाल्याच्या चुकीमुळे एका माणसाचा जेवणाचा डबा, चुकून दुसऱ्या माणसाच्या टेबलवर जातो.. व त्या डब्याच्या अदलाबदलीवर एक सुंदर चित्रपट तयार होतो..
२०१३ साली प्रदर्शित झालेला ‘लंच बाॅक्स’ हा इरफान खानचा चित्रपट अतिशय सुंदर आहे. त्यातील गृहिणीने आपल्या पतीला दिलेला डबा चुकून इरफानकडे जातो. तिला ते लक्षात आल्यावर ती डब्यातून जाणाऱ्या चिठ्यांमधून आपलं मन मोकळं करते.. दोघं भेटायचं ठरवतात, मात्र इरफान तिला पाहूनही भेटायचं टाळतो… यु ट्युबवर हा चित्रपट उपलब्ध आहे…
अशा प्रकारे हा जेवणाचा डबा.. जो पूर्वी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होता, तो आता आधुनिक काळानुसार ‘ऑनलाईन पार्सल’ या नावानं ‘बाळसं’ धरु लागलेला आहे…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
७-८-२१.
Leave a Reply