हिंदी चित्रपटसृष्टीत काही अशा अभिनेत्री होऊन गेल्या, की त्यांच्या फोटोतूनही चेहऱ्यावर नेहमी साधेपणाच जाणवत राहिला. उदाहरणार्थ सुचित्रा सेन, नूतन, इ. अशाच एक अभिनेत्रीने ‘जुनून’ नावाच्या चित्रपटातून पदार्पण केले व पुढील काही मोजक्याच चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळविले..
‘जुनून’ नंतर ‘जालियनवाला बाग’, ‘हम पांच’, ‘एक बार फिर’ या चित्रपटात ती दिसली.. तिची ‘मिस चमको’ म्हणून खरी ओळख झाली ती, सई परांजपे दिग्दर्शित ‘चष्मेबद्दूर’ चित्रपटातून..
१९८१ साली प्रदर्शित झालेला ‘चष्मेबद्दूर’ हा हलका फुलका, अप्रतिम चित्रपट आहे. तो अगदी आजही पाहिल्यावर ‘रिफ्रेश’ झाल्यासारखं वाटतं. त्यातील ‘कहासे आये बदरा..’ हे गाणं गाणारी दिप्ती नवल ही अभिनेत्री न वाटता, आपल्या जवळपासच राहणारी साधी मध्यमवर्गीय मुलगी वाटते.. हे तिचं साधेपणच प्रेक्षकांना अतिशय भावलं.. या चित्रपटात तिची व फारूख शेखची ‘केमिस्ट्री’ छान जुळली व या जोडीने नंतर नऊ चित्रपटात एकत्र काम केले..
१९८२ साली तिचा फारुख शेख बरोबरचा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला, तो होता.. ‘साथ साथ’! लेखक व दिग्दर्शक रमणकुमार याने हा चित्रपट ‘कोलंबस का बेटा’ या कादंबरीवरुन केला.
समाजवादी लेखन करणारा फारूख, श्रीमंतीत वाढलेल्या दिप्तीला पहिल्या भेटीतच आवडतो. काॅलेजमध्ये त्यांचं प्रेम, मित्रांसोबत फुलतं. वडिलांचा विरोध असतानाही ती घर सोडून, फारूखशी लग्न करते. काही दिवसांनंतर फारूख पैसे मिळविण्यासाठी आपला स्वाभिमान बाजूला ठेवून सवंग लेखन करु लागतो. दिप्तीला ते अमान्य असतं. यामुळे दोघांमध्ये दरी निर्माण होते. शेवटी फारूखला त्याची चूक कळते व तो प्रोफेसरची नोकरी स्वीकारुन तिच्यासोबत नव्याने, आयुष्याची पुन्हा सुरुवात करतो.
या चित्रपटात कुलदिप सिंग यांचं सुमधुर संगीत, जगजित सिंग व चित्रा सिंग यांच्या आवाजातील ‘तुमको देखा, तो ये खयाल आया..’, ‘ये तेरा घर, ये मेरा घर..’ ही श्रवणीय गीतं ऐकत रहावीत अशीच आहेत.. ती लिहिलेली आहेत जानेमाने गीतकार, जावेद अख्तर यांनी.. दिप्ती नवलच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम चित्रपट आहे. त्यानंतर तिने हृषिकेश मुखर्जी, गुलजार यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांकडे काम केलं.
‘चिरुथा’ चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान तिचा पुनर्जन्म झाला.. या चित्रपटाचं शुटिंग केरळमध्ये चालू होतं. एका प्रसंगात तिला होडी वल्हवायची होती. तिने होडी चालविण्याचा सराव केला होता. प्रत्यक्ष टेकच्या वेळी तिने होडी व्यवस्थित वल्हवून टेक ओके केला. त्यानंतर होडी वळवून परत आणताना अचानक होडी उलटली. ती पाण्यात व वरती पालथी होडी.. तिला पोहताही येत नसल्याने ती बुडू लागली. तातडीने युनिट मधील लोकांनी तिला पाण्याबाहेर काढले व वाचवले…
‘शतरंज के खिलाडी’, ‘कमला’, ‘मोहन जोशी हाजीर हो’, ‘अनाहत’, अशा कलात्मक चित्रपटांतून तिच्या अभिनयाला नवीन झळाळी प्राप्त झाली व अजूनही ती दिखाऊ भूमिकेपेक्षा आशयघन चित्रपट करतेच आहे…
दिप्तीचा जन्म आहे अमृतसरचा. आई आणि वडील दोघेही उच्चशिक्षित प्रोफेसर. शालेय शिक्षण चालू असताना ते सुट्टीत सिमल्याला जात असत. फोटोग्राफी व शायरी हा तिचा तेव्हापासूनचा छंद आहे. नंतर ती आई-वडिलांबरोबर अमेरिकेत गेली. वडील तेथील युनिव्हर्सिटीत इंग्रजीचे प्राध्यापक होते. तिने तिचे शिक्षण पूर्ण केल्यावर एक ट्रीप म्हणून मुंबईत आली. तिला अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून काही प्रसिद्ध दिग्दर्शकांना प्रत्यक्ष भेटायचं तिनं ठरवलं. श्याम बेनेगल यांना भेटल्यावर त्यांच्या एका जाहिरातपटात तिने काम केलं व अमेरिकेला निघून गेली.
१९७८ साली ती पुन्हा मुंबईला आली ती अभिनेत्री होण्याच्या इराद्यानेच. ‘जुनून’ने सुरुवात झाली. या आधी तिने स्टेज किंवा कॅमेऱ्याला कधी तोंड दिले नव्हते.. शशी कपूर, शबाना आझमी, नसिरुद्दीन शाह या दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहून ती शिकत राहिली.
‘चष्मेबद्दूर’ नंतर सई परांजपेचा ‘कथा’ चित्रपट केला. दरवर्षी वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे केलेले तिचे चित्रपट येत राहिले. १९८४ साली केलेल्या ‘हिप हिप हुर्रे’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिची दिग्दर्शक, प्रकाश झा याच्याशी ओळख झाली. पुढच्याच वर्षी तिने प्रकाश झा बरोबर लग्न केलं. एकाच क्षेत्रातील दोघे पती-पत्नी असतील तर अशा लग्नगाठी फार काळ टिकत नाहीत. सतरा वर्षांनंतर ते वेगळे झाले. दरम्यान दोघांनी एका मुलीला दत्तक घेतले होते.
काही वर्षांनंतर तिने पुन्हा लग्न केले. तो देखील काही काळानंतर गेला.
इतक्या वर्षांच्या सिनेसृष्टीतील अनुभवानंतर तिने ‘दो पैसे की धूप, चार आने की बारीश’ नावाचा चित्रपट लिहिला व दिग्दर्शित केला. चंदेरी दुनियेपासून जास्त काळ लांब राहिलं की माणसं तुम्हाला विसरुन जातात, हे कळल्यावर तिने चित्रपटांच्या ऑफर्सना नकार देणं बंद केलं. त्यामुळे अधूनमधून ती पडद्यावर व टीव्हीवर दिसत राहिली..
एरवी तिचं कविता, शायरी लिहिणं चालूच असतं. ती पेंटिंग्ज करते, त्यातही तिचं मन रमतं.. तिच्या कवितांचं पुस्तकही साहित्य वर्तुळात गाजलेलं आहे…
आज आयुष्याच्या उत्तरार्धात मागे वळून पाहिलं तर या लेखाच्या शीर्षकाप्रमाणे तिचं जीवन हे उन्हातच होरपळून गेलेलं आहे, सावली अशी तिला कधी लाभलीच नाही…
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
१५-७-२१.
Leave a Reply