बस्तर मधील सुरगुजा जिल्हा जंगल, नद्या. दर्याने वेढलेला, खळाळणारे असंख्य नाले, रस्त्याला रस्ता म्हणायचे तरी कसे?काही वेळा घनदाट जंगलात नक्षलवादी वस्तीस येत, आदिवासींकडून हक्काने शिधा गोळा करत, तसे पाहता हा प्रदेश इतका मागासलेला, आदिवासींचे विखुरलेले पाडे, थोडीपार शेती, गुजराण तरी कशी करणार? अर्ध पोटी जीवन चालू होते इतकेच.
कारवा खेडे म्हणजे पाच पंचवीस चंद्रमोळी झोपड्या,काहींच्याच पडवीत मिणमिणती केरोसीनची चिमणी, जोरात वारा आला तर फडफडून विझणारा दिवा, पेटविण्यास काड्यापेटी मिळविणे महा मुश्कील, बहुतेक घरात अंधाराचेच साम्राज्य, चुलाणाचा पडेल तो उजेड, चार घास पोटात ढकलायचे, की मग सामसूम, रात्री दूरवरून कोल्हेकुईचे भीषण आवाज, आणी त्यांना प्रत्युत्तर देणारे ह्डकुळया कुत्र्यांचे केकाटणे, साथीला अखंड रातकिड्यांची साथ प्रत्येक झोपडीत माणसे जीवन कंठीत होती.जगायचे म्हणून जगत होते.
अशाच एका चंद्रमोळी झोपडीत रामू खालसे, बायको राजी, मोठा मुलगा रवींद्र, १९ वर्षाचा, दोन मुली मोठी मीना १८ वर्षाची, तर धाकटी राजनाथी १४ वर्षाची,रवींद्र रोज ८ किमी शाळेत चालत जात असे, नुकताच १०ची परीक्षा पास झाला होता.घर अगदी जंगलाच्या वेशीवर, तेथून हाकेच्या अंतरावर छोटा शेत जमिनीचा तुकडा,कुटुंबाला पुरेल एवढा तांदूळ,तूर,मुग पिकत असे,अर्धपोटी जगण्याची तर सर्वाना जन्मापासून सवय होती.झोपडीला लागून चार बांबूवर झावळ्यानी शाकरलेला गोठा त्यात ५ गाई पाळलेल्या,त्यांचे थोडेफार जे काही दुध मिळे ते विकून चार पैसे मिळत. मीना गाईना रोज गवत खाण्याकरता दिवसभर जंगलात घेऊन जात असे, तिचे त्यांच्यावर विलक्षण प्रेम होते,त्यांची नावे तिने ठेवली होती,सुखीनी,सुक्ता सुरिला,भूतिनि. आणी लाड्गुडनी.घराजवळ छोटे तळे होते,त्याच्या बाजूला सुके गवत अस्ताव्यस्त पसरलेले असे, पहिला चारा खाण्याचा थांबा तेथे असे, ती तर गाईची शाळाच भरवत असे, हळूहळू पक्षीही जमा होत असत, त्यानाही तिने नावे दिली होती,५वी पर्यंत ती आणी तिची धाकटी बहीण राजनाथी दोघी बरोबर शाळेत जात, पण हळूहळू मीनाचे शाळेतील लक्ष उडत चालले, गाई पक्षांची शाळा हीच तिची शाळा बनली. ती गाई पक्षांना त्यांच्या नावाप्रमाणे हाक मारी, त्यांचे हंबरणे, पक्षांचा चिवचिवाट,यात ती इतकी रमत असे की बरोबर आणलेली भाताची पेज खाण्याचेही तिला भान राहत नसे.भर १२चे कडक उन, असो वा धुवाधार पाऊस असो,ती सारा वेळ तळ्याकाठी जंगलात त्यांच्याशी गप्पा मारण्यात दंग असे.सन्ध्याकाळी जंगलातून येणाऱ्या पाउलवाटेवरून राजनाथी शाळा सुटल्यावर धावत मीनाच्या नावाने हाका मारत तळ्या जवळ येई तर मीना गायब झाडांमागे,तिला शोधून हसत खेळत दोघी घरी परतत.त्यांना गोठ्यात व्यवस्थित दावणीला बांधण्याचे काम मीनाचे असे.त्यांचा दादा वडलाना शेतीत मदत करी,दूर १० किमी अंतरावरील शाळेत शिपायाची नोकरी मिळविण्याकरता अनेक वेळा चालत फेरी मारायची,पण नोकरी काही मिळत नव्हती,घरापासून २ कीमी अंतरावर घनदाट जंगल होते.त्याच्या वेशीवर शेवटचे घर विमला भगतचे होते,पंचक्रोशीत तो एकमेव भगत,चेटूक काढणे, अंगारा देणे, गरीब आदिवासींच्या घरच्या समस्या, त्यांच्या आजारपणावर उपाय ही त्याची कामे,मधून मधून नक्षलवादी जंगलात मुक्काम करण्यास येत,पण यांना तसा त्रास नव्हता.
मीना वयात येत होती, तिला नटण्याची महा आवड,गजरे, रंगीत फुलांच्या वेण्या तिला गावातील बाजाराच्या दिवशी मिळत, वडलांबरोबर हमरस्त्याने जाताना तिला वेगळे विश्व दिसत असे, गाईंची देखभाल इतकी उत्तम करत असल्याने वडील तिचे लाड पुरवत, रंगीत फण्या, पावडर मधून मधून वडील विकत घेऊन देत,त्या दिवशी घरी आल्यावर नट्टाफटटा करून जंगलात एकटीच आपल्या गाई बरोबर हुंदडत असे.राजनाथीला शिकण्याची मनापासून आवड,होती पुढे शिक्षिका बनेल, आणी आपल्या घराला बरे दिवस येतील या आशेवर आई वडील तिला मनापासून मदत करत होते. शाळेतून घरी आल्यावर ताई तिला मेकअपचे सामान दाखवत असे,ती आनंद दाखवी, पण मनापासून तिला नटण्याची आवड नव्हती, रात्री नटलेली ताई आणी राजनाथी गळ्यात गळे घालून गाढ झोपी जात.
मीना आता आपल्या गाईना जवळच्या जंगलातील चंडो खेड्यात घेऊन जात असे, तेथे तीची मैत्रीण पगुना राहत असे, तिच्या जवळ पण भरपूर मेकअपचे सामान असे, मग काय दोघी त्याच्याच गप्पागोष्टीत रममाण होत,खेड्या जवळून जाणारा एक रस्ता पुढे हायवेला मिळत असे, या रस्त्यावरून ट्रकची बरीच रहदारी असे. काही थेट झारखंड रांची पर्यंत जात, त्या दोघी जाणारे ट्रक कुतहुलाने पाहात मधेच आतील बसलेल्या चालकांना हात करीत, पगुना च्या घराजवळ राहणारा सोपान गाडी चालक त्या दोघींचा आता छान दोस्त बनला होता. गाडीबरोब्र तो तेथून येताना अनेक नट्यांचे फोटो मेकअप सामान आणत असे, त्या तिघांची छान मैत्री झाली होती.
अमावस्येची संध्याकाळ होती,मीना नटून थटून सगुनाच्या घरी जाण्यासाठी जंगलातून एकटीच मजेत चालली होती, आज तिच्या घरी सोपान ट्रक घेऊन परत येणार होता, रांची मधून नवीन पंजाबी ड्रेस चपला घेऊन येणार होता, रस्ता तिचा रोजचा पायाखालचा मीना हिंदी गाणे गुणगुणत चालली होती,पुढच्या एका वळणावर ती आली आणी गाडीच्या प्रखर उजेड तिच्यावर पडला, ती पोलिसांची जीप होती. मीना आपल्याच धुंदीत चालली होती.समोर बसलेल्या पोलीसने गाडी तिच्या जवळच थांबवली,गाडीतील सर्व पोलिसांच्या भेदक नजरा तिला न्याहाळत होत्या,त्यातील एकाने दमात घेत विचारले ‘ कोणत्या नक्षलवादीकडे चालली आहेस? असे पुकारत मीनाला गाडीत कोंबण्यात आले,बावरलेल्या मीनाला काहीच कळत नव्हते, तिने नक्षलवादी कधी पाहिलाही नव्हता.जीप सुसाट वेगाने चालली होती, मीना आज प्रथमच मोटारीत बसली होती,तिला आता मजा वाटत होती, सर्व पोलीस शांतपणे तिला न्याहाळत होते,थोड्याच वेळात पोलीस स्टेशन आले, एक पडकी दोन खोल्यांची जागा, एक पेट्रोmax चा दिवा,भयांण शांतता,एका बाकड्यावर तिला बसण्यास सांगितले,थोड्याच वेळात एक चहाचा कप आणी बीस्कुट देण्यात आले. मीना खुश झाली,पण तो आनंद क्षणात नाहीसा झाला, एका नराधमाने तिला आतल्या खोलीत खेचत नेले. अंधारात मीनाला कळण्याचा आत तिच्या अब्रूचे धिंदवडे निघाले, एकामागोमाग एक एक पोलीस आत जात होत तोंडावर रुमाल ठेवलेला, ती किंचाळत होती,पण या घनदाट जंगलात आवाजाची दखल कोणीच घेणार नव्हत,अर्धमेलेली, रक्तबंबाळ अवस्थेत मीना निपचत पडली होती,सर्वांची भूक शमल्याने सर्वकडे सन्नाटा पसरला होता, तासाभराच्या क्रूर अत्याचारांनी मीनाचे आयुष्य धुळीला मिळाले होते,पोलीसांना आता पुढील काम उरकण्याची घाई झाली होती,मीनाला धड उभेही राहता येन नव्हते,राजनाथीच्या नावाने आक्रोश करत होती,आता तिची अवस्था पोत्यांसमान होती, दोन पोलीसांनी तिचे मुटकुळे गाडीत घातले,मीनाचा अखेरचा प्रवास चालू झाला,गावाच्या वेशीवर भगतच्या घराजवळ मीनाचे मुटकुळे टाकून जीप पुढे गेली, भगतच्या घरात मीणमीणता दिवा जळत होता, मीना आक्रोश करत भगतच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करत होती, इतक्यात जंगलाच्या बाजूनी दोन गोळ्या सुटल्याचा आवाज आला,मीना रक्ताच्या थारोळ्यात कोसळली होती, भगतने गोळ्यांचा आवाज ऐकून बाहेर आला त्याने मृत पावलेल्या मीनाला ओळखले, काही क्षणात पोलिसांची जीप आली, भगतची जबानी घेण्यात आली, गोळ्यांचे आवाज ऐकू आल्याची जबानी दिली गेली.नक्षलवादिंची मीना खबरी होती, त्यात कोणीतरी गोळ्या घातल्या.जीप मधील दोन पोलीस आधीच जंगलात उतरून झाडा मागे लपले होते. नक्षलवादी आपला खबरा मारला गेला तर प्रेत नेहमी उचलून नेतात. मीनाचा मृतदेह जीप मध्ये पोलीसनी ठेवला,व स्टेशन कडे निघून गेले.भगत भीत भीत रामू खालसोच्या झोपडीत शिरला,मीनाच्या मृत्यूची बातमी पोलीसांनी भगत मार्फत कळविण्याचे काम शिताफीने केले, सोपान बरोबर तिचे लैंगिक संबंध होते,ती खबरी होती म्हणून तिला मारण्यात आले असा प्राथमिक अहवाल पोलीसांनी तयार केला.रामूच्या घरात काहोल मजला, सर्व गावकरी पोलीस स्टेशन बाहेर जमा झाले, प्रकरण हाताबाहेर जाऊ लागले, गावकरी तावातावात भांडू लागले, ; आमचा नक्षल लोकांशी काही संबंध नाही, पोलीस बनवाबनवी करत आहेत, गावचे आमदार आले,गावकर्यांची कशीबशी समजूत घालत मीनाचे शवविच्छेदन करण्यात आले,अहवाल रिपोर्ट धक्कादायक होता, तिच्यावर अनेक लोकांनी बलात्कार केला होता, गर्भाशय, मूत्राशय गुप्तांग फाटले होते,तिला गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली, संशयाचे बोट पोलिसांकडे गेले, योनीतील घेतलेल्या द्रावाची तपासणी आणी जे पोलीस गाडी बरोबर होते त्या सर्वांच्या वीर्याची DNA तपासणी यांचा काही मेळ आहे का याचा अहवाल ताबडतोब देण्यात यावा अशा सूचना दिल्या गेल्या, शरीरातील गोळ्या आणी पोलिसांच्या बंदुकीतील गोळ्यांची छाननी करण्यात आली, अहवाल येण्यास बराच अवधी लागणार होता.
घराजवळील कान्हार या छोट्या नदीकाठी मीनाच्या आवडीच्या मेकअप सामानासकट तिचा देह भूमीत विलीन झाला आहे,राजनाथीने जत्रेत काढलेला आपल्या बहिणीचा हसरा फोटो जपून ठेवला आहे, रामू खाल्सोच्या मुलीने आपल्या गावकीला कलंक लावला म्हणून त्या सर्वाना वाळीत टाकण्याचे मनसुबे रचले जात आहेत, मीनाचा थडग्या भोवती सुखीना लाड्गुडनी केवीलवाणी हंबरडा फोडत आहेत.
अहवाल अजून आलेला नाही, मोठया भावाला शाळेत ताबडतोब शिपायाची नोकरी मिळाली आहे. पोलीसांची नोकरी व्यवस्थित चालू आहे.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply