नवीन लेखन...

जिम कॉर्बेट – भाग ३

जिम कॉर्बेटचे भारतावर व भारतीय लोकांवर अतिशय प्रेम होते. तो म्हणतो, ‘माझ्या भारतातील बहुसंख्य लोक नि:संशय भुकेकंगाल आहेत, धनहीन आहेत. पण ते अतिशय साधे, भोळे, प्रामाणिक, निष्ठावान व कष्टाळू आहेत. माझे त्यांच्याशी प्रेमाचे नाते जडलेले आहे.’ जिम बऱ्याच वेळा परदेशी गेला होता पण तो कुठेच रमू शकला नाही कारण त्याचे भारताविषयीचे प्रेम व ओढ! भारत हा त्याचा देश होता. भारताविषयी उल्लेख करताना तो नेहमी ‘माझा भारत’ असा करत असे. आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकाला त्याने ‘माझा भारत’ नाव देऊन ते भारतीय जनतेला अर्पण केले आहे. त्याच्या शब्दा-शब्दात भारत व भारतीय लोकांच्याबद्दलचे प्रेम स्पष्ट होते.

आज लोकांना पर्यावरण व पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व कळू लागले आहे. पण जिम कॉर्बेटला हे महत्त्व त्याच वेळी कळले होते. जनजागृतीचे कार्य तेव्हाच त्याने सुरू केले होते. तो सभा घेऊन लोकांना पर्यावरणाचे व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगत असे. १९२६ पासून त्याने पर्यावरण रक्षणाच्या जागृतीसाठी आपली लेखणी उचलली. जंगलतोड, जंगलाच्या भूमीवर अतिक्रमण, पशुहत्त्या, जंगलात लावले जाणारे वणवे या विषयावर तो वृत्तपत्र, मासिकात लिहून जनजागृतीचे काम करत होता. विशेषत: तरूण पिढीला या विषयीचे महत्त्व पटवून देण्याकडे त्याचा जास्त कल असे. “The all India conference for preservation of Wild Life” या संस्थेने पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. या संस्थेने जिमशी जवळीक साधली.आता जिमला पण एक चांगले व्यासपीठ मिळाले. या संस्थेच्या Indian Wild Life या मासिकाचा प्रकाशन समारंभ जिमच्या हस्ते झाला होता.

जिमने अनेक लेख लिहिले व त्याला चांगली प्रसिद्धी पण मिळाली. त्याचा “Wild life in village. An appeal” हा लेख तर खूप गाजला. जंगलात लावल्या जाणाऱ्या वणव्याविषयीच्या लेखाची सुरुवात त्याने, “Stop! You fools. Stop.” अशी केली होती. या लेखात त्याने अशा लावल्या जाणाऱ्या आगीबद्दल राग प्रगट केला होता. वनाधिकारी, ब्रिटिश अधिकारी तसेच राजे-रजवाडे यांच्याकडून होणारी वन्य प्राण्यांची हत्या व जंगलाचे नुकसान याबद्दल त्याने खूप नाराजी व राग व्यक्त केला होता. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्याच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी प्रयत्न करणारी जिम कॉर्बेट ही भारतातील पहिली व्यक्ती असावी.

जिम कॉर्बेट निसर्गवेडा होता. तो म्हणतो, “निसर्ग ग्रंथाला अंतही नाही व आरंभही नाही. निसर्गाचे ज्ञान निसर्गात राहून शोषले पाहिजे. माझ्या आनंदी जीवनाचे निसर्ग हेच कारण आहे.” जिम पर्यावरण, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी मनापासून प्रयत्न करीत होता. त्याच्या सामाजिक कार्यामुळे तो कुमाऊं भागात आदराने ओळखला जात होता.

वन्य प्राण्यांना बंदुकीने शूट करण्यापेक्षा कॅमेराने शूट करणे त्याला जास्त पसंत होते. ही प्रेरणा त्याला फ्रेड चॅम्पियन व त्याच्या ‘विथ ए कॅमेरा इन टायगर लँड’ या पुस्तकाकडून मिळाली. फ्रेड चॅम्पियनने फ्लॅशलाईटचा वापर करून वाघाचे फोटो घेतले तर त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन जिम कॉर्बेटने दिवसाउजेडी फोटो घेतले. त्याच्या एका उदार दोस्ताने त्याला बेल अँड हॉवेल कंपनीचा सोळा मिलीमीटरचा कॅमेरा दिला. मग त्याने तो कॅमेरा घेऊन जंगलात मनसोक्त भटकंतीचा कार्यक्रम सुरू केला. काही वेळा आपल्या भक्ष्याजवळ, पिल्लाजवळ जिमला भटकताना पाहून वाघांनी नाराजी व्यक्त केली. काही वेळा तो वाघांजवळ पोहचला सुद्धा पण त्याला मनपसंत छायाचित्रीकरण करता आले नाही. कधी कमी जास्त प्रकाश तर कधी काचेवर पाने, धूळ, कोळीष्टके पडत. शेवटी त्याने एक जागा निवडली. दिडशे फूट रूंदीचे खोरं. दोन्ही बाजूला झाडे-झुडपे. मधूनच वाहणाऱ्या झऱ्याला कृत्रिम अडथळे निर्माण करून छोटे धबधबे तयार केले व या ‘जंगल स्टुडिओ’त चित्रीकरणाची तयारी केली. मग जिम वाघांना आपल्या जंगल स्टुडिओत आणू शकला. दहा ते साठ फूट अंतरावरून सूर्यप्रकाशात त्याने ४ वाघ व २ वाघिणी आपल्या कॅमेऱ्याने टिपल्या. हे सर्व करायला त्याला साडे चार महिने लागले. आपल्या जंगल स्टुडिओत तो तासन् तास पडून असे आणि विशेष म्हणजे एकाही वाघाने त्याला पाहिले नाही. ६०० फूट लांबीचे सुरेख चित्रीकरण त्याने केले. दिवसाढवळ्या वाघांच्या इतके जवळ जाणे ही अशक्य कोटीतील गोष्ट म्हणून सकाळच्या पहिल्या प्रहरी दिवसाचा प्रकाश हळूहळू पसरत असताना त्याला वाघावर नजर ठेऊन बसावे लागले. जिमने काढलेले जंगलांचे, वन्य पशूंचे फोटो लंडनच्या ‘नॅचरल हिस्टरी म्युझियम’ मध्ये आजही जतन करून ठेवले आहेत. या फोटोवरून त्यावेळी भारतात वनसंपदा किती संपन्न होती हे लक्षात येते.

१९२० साली जिम कॉर्बेट नैनिताल नगरपालिकेचा उपाध्यक्ष बनला. आपल्या कारकिर्दीत त्याने नैनितालमध्ये खूप सुधारणा केल्या. नैनितालच्या सरोवराकाठी बँड स्टँड बांधले. भूमिगत विद्युतवाहक तारा, आखीव रस्ते, पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा, ड्रेनेज सिस्टिम, झाडांची लागवड, व्यापारी लोकांकडून कर आकारणीचे नियम व त्या अनुषंगाने कायदे आणि या सर्वांच्या अंमलबजावणीसाठी नियमित बैठका! भविष्यात नैनिताल हे पर्यटन स्थळ बनावे हा सुद्धा त्या मागचा हेतू होता.

नैनिताल नगर परिषदेचा तो सभासद असताना नैनिताल परिसरात वृक्षतोड व पशुहत्येला त्याने बंदी घातली. तसे कायदे केले व त्यांची कडक अंमलबजावणी सुरू केली. नैनितालच्या पायथ्याशी असलेल्या पाटलीदून परिसरातील जंगल व पशुधन वाचवण्यासाठी त्या परिसराला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्याचे त्याने प्रयत्न केले. त्याच्या प्रयत्नांना यश येऊन ६ ऑगस्ट १९३६ साली या परिसराला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला व भारतातील पहिले व जगातील तिसरे राष्ट्रीय उद्यान ‘हॅले नॅशनल पार्क’ नावाने अस्तित्वात आले. आज हेच पार्क ‘जिम कॉर्बेट नॅशनल पार्क’ म्हणून जगात प्रसिद्ध आहे.

नैनिताल परिसरात सुद्धा पक्ष्यांचे अभयारण्य त्याने स्थापन केले. पूर्वपरवानगीशिवाय कोणीही झाडे तोडू शकत नव्हते. आणि जर झाड तोडले तर तसलेच झाड लावून त्या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी झाड तोडणाऱ्या व्यक्तीवर असे. एके दिवशी नैनितालच्यां चर्चचे प्रिस्ट एक झाड तोडण्याची परवानगी मागण्यासाठी जिमकडे आले. कारण त्या झाडामुळे क्लॉक टॉवरवरचे घड्याळ नीट दिसत नव्हते. पण जिमने त्या प्रिस्टनासुद्धा नियमातून कोणतीही सवलत दिली नाही.

इतकेच नाहीतर त्यावेळी घोडे, गाढवे तसेच खेचरांचा कामासाठी वापर केला जात असे. या मुक्या जनावरांनासुद्धा आठवड्यात किमान एक दिवस तरी विश्रांती मिळेल याकडे सुद्धा जिमचा कटाक्ष होता. दुसऱ्या महायुद्धाच्या `समाप्तीपर्यंत नैनिताल व आजूबाजूचा परिसर जिमच्या नजरेखाली होता. त्यामुळे इथे वनश्री बहरली. पशु-पक्ष्यांची वर्दळ वाढली. आज मात्र हे काहीच उरलेले नाही.

१९१४ साली पहिल्या महायुद्धाचा वणवा पेटला. त्यावेळी जिम मोकामा घाट या ठिकाणी रेल्वेत काम करीत होता व त्याचे वय होते ३९ वर्षे! लष्करात द्राखल होण्यासाठी तो कलकत्त्याला पोहोचला. पण त्याचे वय पाहून त्याला लष्करात प्रवेश दिला गेला नाही. १९१७ साली त्याने परत प्रयत्न केला तेव्हा मात्र त्याला लष्करात दाखल करून घेण्यात आले व कॅप्टन हा हुद्दा मिळाला. अल्पावधीतच त्याने कुमाऊंमधील ५०० तरुणांची तुकडी बनवली व सर्वजण १९१७ च्या मे-जूनमध्ये मुंबईमार्गे इंग्लंडला रवाना झाले. ही तुकडी लष्करात No 70 kumoan Company म्हणून ओळखली जाऊ लागली व या तुकडीची फ्रान्समध्ये रणभूमीवर रवानगी झाली. जिमला स्वत:पेक्षा या तरुणांच्या जीवाची जास्त काळजी होती. युद्धानंतर बक्षिसे, ट्रॉफिज मिळवून सर्वजण सुखरूप परत आले. जिम आता कॅप्टनचा मेजर बनला होता. त्याला ‘व्हॉलेंटियर्स डेकोरेशन’ हा बहुमान देण्यात आला.

१९३९ साली हिटलरने सर्व जगाला महायुद्धाच्या वणव्यात ढकलले. १९४३ साली जपानी सेना ब्रह्मदेशात पोहोचून भारताचा दरवाजा ठोठावू लागली. हा सर्व प्रदेश पर्वतशिखरांनी, घनदाट जंगलांनी वेढलेला! दोस्त राष्ट्रातील तरुण सैनिकांना हे सर्वच अनोळखी होते व जपानी सैन्य याचा पुरेपूर फायदा उठवत होते आणि एके दिवशी जिम लष्करी कार्यालयात हजर झाला. लष्कराला अशा जाणकाराची गरजच होती आणि तसा माणूस मिळाला. जाणकार, सल्लागार, शिक्षक म्हणून जिम, फ्रँक मूर यांना भेटला. ते ३९ व्या ट्रेनिंग डिव्हिजनचे कमांडर होते. जिमची लेफ्टनंट कर्नल म्हणून नेमणूक झाली व छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे नियुक्ती झाली. आता जिमवर जबाबदारी होती या तरुण जवानांना जंगलाचे ज्ञान देण्याची! वनस्पतींची, प्राण्यांची ओळख, त्यांच्या सवयी याविषयी माहिती करून देण्याची! तसेच आणिबाणीच्या प्रसंगी घेण्याची काळजी, दक्षता, कृती, अवघड प्रसंगी मार्ग कसे काढायचे हे सांगण्याची! हे सर्वकाही १४४/ हिमशिखरांच्या सहवासात जिम त्यांना सांगत होता, दाखवत होता, शिकवत होता, पारंगत करत होता. एक अनोखे ज्ञान तो देत होता की जे प्रत्यक्ष युद्धभूमीवर जरूरीचे होते, उपयोगी ठरणारे होते. जिमने काही काळ ब्रह्मदेशातही वास्तव्य केले. तेथील जंगले त्याने निरखली. त्या काळात अनेक अमेरिकन वैमानिक त्याचे मित्र झाले होते.

–प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..