नवीन लेखन...

जिनके घर शिशेके होते है…

काही काही माणसं स्वत:वर इतकं अफाट प्रेम करतात की त्यातुन त्यानां बाहेर येणं जमतच नाही. त्यात त्यांचे स्वत:चे असे काही अंगभूत गूण वैशिष्ठ्यही असतात त्यामुळे अशी माणसं दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यात ती जर कलावंताच्या कुळीतील असतील तर मग बोलायलाच नको !!!! अनेकदा त्यांच्या विक्षिप्त वागण्याने ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात. गमंत म्हणजे त्यांच्यावर मना पासून प्रेम करणारा एक मोठा वर्गही असतो. शास्त्रज्ञ, साहित्य, खेळाडू, कलावंत या क्षेत्रातील अनेक नामवंत त्यांच्या विशिष्ट अशा स्वभावामुळे कायम चर्चेत राहतात.

बलुचिस्थान येथे एका काश्मिरी पंडीताच्या घरात एक देखणे मूल जन्मले. इतर मुलां सारखेच शालेय व कॉलेज शिक्षण घेत मोठे झाले. १९४० च्या दरम्यान या तरूण मुलाला मुंबईतल्या माहिम पोलिस स्टेशनात पोलिस इन्स्पेक्टरची नोकरी लागली. या चौकीतला हा एकदम रूबाबदार व देखणा इन्स्पेक्टर अनेकानां भूरळ घालत असे. मग एक दिवस कुणी तरी त्याला म्हटले -‘तुम तो एकदम हिरो दिखते हो. फिल्मोमे काम क्यूँ नही करते.’ मग काय ? त्याच्याही डोक्यात किडा गेला की मी का प्रयत्न करू नये. पोलिस स्टेशनला अनेकदा चित्रपटसृष्टीतली अनेक माणसे येत असत. यापैकी एक होते चित्रपट निर्माते बलदेव दुबे. या तरूण इन्स्पेक्टरची एक खासियत होती ती म्हणजे त्यांची बोलण्याची विशेष ढब. दुबेला ती जाम आवडली. त्यांनी या तरूणाला चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली. ज्या क्षणाची हा तरूण वाट बघत होता ताक चालून त्याच्याकडे आला होता. क्षणाचाही विलंब न करता तो हो म्हणाला. दूबे यांनी आपल्या “शाही बाजार” या चित्रपटासाठी मूख्य नायकाची भूमिका त्याला देऊ केली.

या तरूणाचे नाव होते कुलभूषण पंडित. मागचा पूढचा फारसा विचार न करता मग त्याने चित्रपटासाठी धाडकन् नोकरीचा राजीनामा दिला. ही घटना १९५२ ची. विशेष म्हणजे पूढच्या पाच वर्षात या तरूणाला रंगीली, अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी,कृष्ण सुदामा असे चित्रपट मिळाले खरे पण सूर काही सापडेना. कलावंत असो की शाही माणूस पोट नावाचा अवयव त्याला नेहमीच आपल्या ताब्यात ठेवत असतो. नोकरी गेल्यामुळे आथिर्क परिस्थिती पण बिघडली. मग १९५७ मघ्ये मेहबूब खानचा महत्वकांक्षी चित्रपट ‘मदर इंडिया’ आला. हा संपूर्ण चित्रपट नर्गिसच्या राधा या मूख्य पात्रा भोवती केंद्रीत केलेला होता. त्यात तिच्या नवऱ्याची एक छोटीशी भूमिका कुलभूषणला मिळाली आणि त्या छोट्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटा पासून कुलभूषणचा खऱ्या अर्थाने नवीन जन्म झाला व मग सुरू झाला ‘राजकूमार’ या काहीशा विक्षिप्त अभिनेत्याचा चित्रपट प्रवास.

एस.एस. वासन या दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शकाचा १९५९ मध्ये “पैगाम” हा चित्रपट आला जो सूपरहिट झाला. या चित्रपटात राजकुमार (रामलाल) दिलीपकूमारचा मोठा भाऊ होता. खरे तर राजकुमार ज्या सामाजिक घटकात व परिस्थितीत वाढलेला होता त्याला बरीचशी छेद देणारी भूमिका पैगाम मधील रामलाल या पात्राची होती. रामलाल हा एक सामान्या मील कामगार पण आपल्या भावावर अत्यांतिक प्रेम असणारा व यासाठी अफाट कष्ट करून त्याला शहरात शिकायला पाठवणारा. ही भूमिका त्याने खरोखच मना पासून केली. दिलीप राज या दोन्ही कुमारांनी आपापल्या अभिनयात जान ओतली. त्यांची जुगलबंदी बघावयास मिळाली. पण नंतर मात्र हे दोघे एकत्र कधीच दिसले नाही. दिसले ते थेट ३२ वर्षानंतर सुभाष घईच्या ‘सौदागर’ मध्ये. मी कुठे तरी वाचल्याचे आठवते की पैगाम चित्रपटातल्या एका प्रसंगात राजकुमारला दिलीपकुमारला थप्पड मारायची होती आणि ती त्याने खरोखरीच सणकावून लगावली आणि मग दोघांचा बेबनाव झाला व कधी एकत्र आलेच नाही. असो. अभिनेत्यातील अहंकारी माणूस किंवा माणसातील अहंकारी कलाकार असे अनेकदा आमने सामने येतात तेव्हा असा बेबनाव होणे चित्रपटसृष्टीसाठी काही नवे नाही. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांतील सहजसुंदर व नैसर्गिक अभिनयाने राजकुमार यांना अभिनय सम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरु झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरु राहिला.

मग त्यांच्या आयुष्यात १९६५ मध्ये आणखी एक कलाटणी देणारा चित्रपट आला. बी.आर. चोप्राचा भारतातील पहिला मल्टीस्टार चित्रपट ‘वक्त’. बलराज सहानी, राजकूमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिल टागोर, रेहमान, मदन पूरी असे सर्वच नामवंत अभिनेते यात होते. चित्रपटात भव्यते सोबत संगीताची मेजवानीही होती. विविध सुंदर लोकेशन्स वरील चित्रीकरण, श्रीमंती थाट व गरीबीचा खास भावूक ड्रामा सर्व काही यात होते. या चित्रपटातील राजकुमारची भूमिका आगोदरच्या सर्व चित्रपटापेक्ष वेगळी होती. कृष्णधवल चित्रपटातील गरीब, कामगार, मध्यमवर्गीय अश्सा चेहरा असणारा राजकूमार या चित्रपटात एकदम लॅव्हीश व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणून पडद्यावर आला. जिच्यावर आपण प्रेम करतो ती आणखी कुणावर प्रेम करते आणि योगायोगाने तो आपलाच भाऊ आहे हे समजल्यावर होणारे भावनिक ताणतणाव यात राजकुमार यांनी अप्रतिम साकार केले. या चित्रपटातील त्यांचे सर्व डायलॉग “हम” या शब्दाने सुरू होत किंवा संपत.मात्र या चित्रपटा नंतर ही “हम”ची बाधा त्यानां कायम जडली किंवा बिंबवून घेतली. राजकूमार स्वत:ला ‘हम’ या संबोधना पासून बोलायला लागले ते अखेरचा श्वास घेई पर्यंत. या चित्रपटातील त्यांच्या तोंडचे संवाद हे तुफान लोकप्रिय झाले. संवाद बोलण्याच्या त्यांच्या अंदाजावर प्रेक्षक इतके फिदा होते की ज्या चित्रपटात राजकुमार असत तो चित्रपट कसा का असेना प्रेक्षक डॉयलागबाजी ऐकायला चित्रपटाला तुफान गर्दी करायचे. याच वर्षातला त्यांचे “काजल” हा मिना कुमारी सोबतचा “रिश्तेनाते” आणि “उंचे लोग” हे चित्रपट चांगलेच गाजले.

भारतीय ग्रामीण नायकाचा चेहरा म्हणून ते अनेक चित्रपटात शोभले. भारतीय संस्कृतीत वडीला नतंर मोठा भाऊ हा वडीलाच्या ठायी असतो. हा भाऊ बहूतेक वेळा कुटूबांसाठी आपल्या अनेक इच्छा व भावनानां दडपून टाकतो. राजकुमार यांचा अशा भूमिकेतील अभिनय खरोखरच अप्रतिम असे. मनाचा होणारा कोंडमारा ते आपल्या अभिनयातुन उत्कृष्ट सादर करत. सोबत त्यांच्या आवाजाचा एक विशिष्ठ पोत आणि संवादफैकीमुळे अभिनय सहज व नैसर्गिक होत असे. खरे तर प्रत्यक्षात ते अत्यंत उजळ कांतीचे अभिनेते होते. कृष्णधवल चित्रपटामुळे त्यांचा रंग फारसा आडवा आला नाही. पण म्हणून कदाचित रंगीत चित्रपटात नंतर त्यांना तशा भूमिका मिळाल्या नसाव्यात.

चेतन आनंद या निर्माता दिग्दर्शक शिवाय अख्ख्या चित्रपटसृष्टीत या अभिनेत्याचे कुणाशी वैयक्तिक असे सूर कधी जुळले नाही चेतन आनंदच्या सर्व चित्रपटात राजकुमार आणि प्रिया राजवंश हे हमखास असत. चेतन आनंद यांचा ‘हिर रांझा’ (१९७०) हा चित्रपट एक वेगळा प्रयोग होता. या चित्रपटातील काव्यमय संवाद हा त्या चित्रपटाचा आत्माच होता. राजकुमार आणि प्रिया राजवंश या दोघांनही यातील सर्व काव्यमय संवाद अप्रतिमच म्हटले आहेत. हमराज, नई रोशनी (१९६७), मेरे हुजूर, नील कमल, वासना (१९६८), लाल पत्थर, मर्यादा (१९७१), पाकिजा, दिल का राजा(१९७२), हिंदुस्तान की कसम(१९७३), ३६ घंटे(१९७४), एक से बढकर एक (१९७६), बुलंदी व चंबल की कसम (१९८०), कुदरत (१९८१), या सर्व चित्रपटापैकी काही वगळता ते मूख्य नायक जरी नसले तरी त्यांची समातंर भूमिका लक्षणीय असे. १९९१ मधील सुभाष घई निर्मित दिग्दर्शीत “सौदागर” मध्ये ते दिलिपकुमार सोबत पुन्हा दिसले. ९० च्या दशकात चित्रपटाच्या तंत्रात लक्षणीय बदल झाले होते. या दोघांचे समोरा समोरचे प्रसंग शूट करतानां हे तंत्र कामी आले. या चित्रपटात एकाच फ्रेममध्ये हे दोघे क्वचितच दिसतात. चित्रपटात जरी दोघे एकत्र दिसत असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही अभिनेत्याच्या मनातील अतंर कमी झाले होते का? माहित नाही. पण व्यावसायिक तडजोडी करतानां खाजगी आयुष्य शक्यतो मिसळू देता कामा नये हे अनुभवाने अनेकानां समजते तसे ते या दोघानाही कदाचित समजले असावे. १९९३ मधील काहीसा भडक असणारा “तिरंगा” हा मराठमोळा नाना आणि राजकुमार यांच्यामुळे चांगलाच गाजला. याती दोघांनीही आपापल्या स्टाईलने संवादाची चांगलीच फटकेबाजी केली.

८० च्या दशका नंतरच्या बहूतेक चित्रपटात त्यांच्या डायलॉगबाजीने त्यांच्यातल्या सहज सुंदर अभिनयावर मात केली. संवाद फेकीच्या नादात अभिनय लुप्त होत गेला. आयुष्यभरात ६०-६५ चित्रपटात काम करणारा हा अवलिया नट सर्वांच्या लक्षात राहिला तो संवाद फेकीमुळे आणि स्वत:च्या खाजगी आयुष्यात कुणालाच कधीच शिरकाव करू न देण्या बाबत. “दिल एक मंदीर” आणि “वक्त” या दोन चित्रपटाने त्यांना सह कलाकाराचा फिल्मफैअर पुरस्कार मिळवून दिला पण पुरस्कारात त्याना अजिबातच रस नव्हता आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी कधीच आपल्या कुटूबांला कुठल्याही सिने पार्टीत् वा शुटींग वा प्रिमियरमध्ये येऊ दिले नाही. आयुष्यभर हा अभिनेता कायम चर्चेत राहिला. अत्यंत लॅव्हिश जगला. चित्रपट सुष्टीत त्यांच्या केसां बद्दल एक चर्चा नेहमी होत असे. त्याना खूप लवकर टक्कल पडले व त्यांनी विग वापरायला सुरूवात केली. हा विग त्यांनी आपल्या केसांच्या मूळ वळणा सारखा हुबेहुब बनवुन घेतला आणि वाढत्या वया सोबत विगचे केसही पांढुरके करून घेतले. स्वत:च्या प्रेमा पडलेला माणूस ही पण त्यांची एक ओळख होती त्यामुळे ही खरीखोटी चर्चा होत असावी. जेनीफर या अंग्लो-इंडियन एअर होस्टेसशी त्यांनी लग्न केले. नंतर जेनिफरने हिंदू धर्म स्विकारला व गायत्री हे नाव घेतले. पूरू, पाणिणी हे दोन मुलगे आणि वास्तविकता ही मुलगी..पूरू ने काही चित्रपटात काम केले पण तो टिकू शकला नाही. राजकुमारने आपल्या मुलाला शेवटची इच्छा सांगितली ती अशी- ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’ ‘जानी’ ही दोन अक्षरे राजकुमारची ओळख होती असे म्हटले तर वावगे होणार नाही. तर अशा या झक्की अभिनेत्याचे काही खास संवाद-
# चिनायसेठ, जिनके घर शीशे के होते है…..,(वक्ता)आपके पांव देखे, बहुत हसीन हैं, इन्हेंग जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे……. (पाकीजा)
# हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह वक्त भी हमारा होगा। बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी…..। (सौदागर)
# काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते….। (‘सौदागर’)
# हम आंखो से सुरमा नहीं चुराते। हम आंखें ही चुरा लेते हैं……। (तिरंगा)
# हम तुम्हें वह मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी और न ही किसी मुजरिम ने सोची होगी…¬¬। (मरते दम तक)
# हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है। दुश्मन से सीधी बात करती है………..। (‘तिरंगा’)
# दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक ऊपर वाला और दूसरा मैं………….।

…….आज त्यांचा जन्म दिवस. मन:पूर्वक अभिवादन..

-दासू भगत

( ८ ऑक्टोबर २०१८ )

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..