‘जिथे सागरा धरणी मिळते..’ ही ओळ आठवली, की मग ‘तिथे तुझी मी वाट पाहाते..’ ही ओळ चटकन जिभेवर येतेच. हे गांणंच जीवलगाच्या भेटीशी संबंधीत आहे. अर्थात प्रत्येक वेळी ही भेट जीवलगाचीच असायला हवी असं काही नाही, कोणाचीही पहिलीच भेट उत्सुकता वाढवणारी, हुरहूर लावणारीच असते असा माझा तरी अनुभव आहे. म्हणून आजच्या आमच्या भेटीला मला हे शीर्षक द्यावसं वाटलं..
फेसबुकवर भेटलेले आम्ही काही मित्र. प्रत्यक्षात एखाद दुसऱ्याची सोडल्यास कुणाचीच ओळख नाही. सर्वांच्याच वय, व्यवसाय यात भयंकर तफावत. परंतू सर्वाच्या आवडीचा ल.सा.वि. म्हणजे ‘मुंबई शहर आणि मुंबईचा इतिहास’. ‘समान शिले व्यसनेषु सख्यम’ या न्यायाने फेसबुक व्हाट्सॲप या एकमेकांना जोडून ठेवणाऱ्या माध्यमातून आम्ही व्हर्च्युअली भेटलो आणि पुढेही भेटतच राहीलो. पण म्हणतात ना प्रियेचा फोटो कितीही वेळा पाहिला तरी तिला रुबरू भेटायची उत्सुकताअसतेच. किंवा गोजीरवाण्या बाळाचा फोटो वेड लावणारा असतो परंतू त्या बाळाला दवळ घेऊन कुरवळण्याचा किंवा त्याचं जावळ हुंगण्याचा प्रत्यक्षातला आनंद फोटो नाही देऊ शकत. तसंच फेसबुकवर एकमेकांचे झालेल्या आम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची ओढ लागली होती. मग आजचा दिवस ठरवला आणि तसं आवाहन फेसबुकवर केलं आणि अनेक जणांनी भेटायला यायची त्यांनाही उत्सुकता असल्याचं कळवून येतो असं सांगीतलं..
भेटूला येणाऱ्या इच्छूक मित्रांचा उत्साह बघून ‘शिवाजी पार्क’ मैदानातच भेटायचं ठरवलं. म्हटलं जागा अपुरी पडायला नको. वेळ सायंकाळी ६.३० ची. आता मिटींग, ती ही पहिल्यांदाच आहे म्हटल्यावर पार्काच्या प्रथेप्रमाणे महाराजांच्या आशीर्वादानेच सुरू करुया. शेजारीच गणेश मंदीरही आहे, ‘आधी वंदू तुज मोरया’ म्हणून गणपती महाराजांचाही आशीर्वाद घेऊ म्हटलं. उगाच त्यांच्या भावना दुखवायला नको. हल्ली कुणाच्या भावना कधी दुखावल्या जातील कुणास ठाऊक, गणपती. महाराज झाले म्हणून काय झालं..!
भेटीचं आवाहन मीच केलं असल्यामुळे, मी ठिक ६.१० मिनिटाने महाराजांच्या पुतळ्याजवळ पोचलो. आता नक्की येणारांपैकी चंदन आणि नौशाद असे दोघेच प्रत्यक्ष ओळखीचे, अन्य कुणीच नाही. म्हणून पोचल्या पोचल्या व्हाट्सॲपवर मी पोचल्याचा मेसेज टाकला. तर कुणाचंही उत्तर नाही. म्हटलं ६.३०ची वेळ आहे, येतील हळुहळू. तेवढ्यात नौशादचा फोन आला की तो पण आलाय म्हणून. मी विचारलं, “कुठे आहेस?”. नौशाद “महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर मैदानात”. ‘महाराजांचा अश्वारुढ पुतळा’ हे नौशादचं वाक्य ऐकूनच माझं मन भरून आलं. कारण आम्ही एरवी ‘शिवाजी पुतळा’ हे शब्द ‘शिवाजी पार्क’ म्हणाल्यासारखंच म्हणतो. मग भले आम्ही छत्रपती शिवाजी’ टर्मिनसचं नांव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ करण्यासाठी आंदोलन वैगेरे करू, पण मैदानाला आम्ही ‘शिवाज पार्क’च म्हणणार. हल्ली हल्ली तर शिवाजी पार्कातला शिवाजीही अंतर्धान पावलेत, लोक बोलताना ‘पार्का’त असाच उल्लेख करू लागलेत..महाराज फक्त जयंती, पुण्यतिथी, निवडणुका आणि वेळोवेळी आपापल्या सोयीपुरतेच उरले असल्याने असं होणं नैसर्गिकच आहे. असो, विषयांतर झालं बघा. महाराज म्हटल्यावर मी असा भावनाविवश होतो.
मी आणि नौशाद भेटलो. तेवढ्यात पंकज समेळ आले. त्यांनी फोटोवरून मला ओळखलं आणि थांबले. मला फोटोवरून, ते ही फेसबुकच्या, जिवंत माणसं ओळखणाऱ्या लोकांचं भारी कौतुक वाटतं. चंदन विचारेनीही मला असंच एकदा ओळखलं होतं. मला प्रत्यक्षातली बायको आणि बायकोचा फोटोही ओळखता येत नाही. असो. नंतर प्रभाकर वाळवे आले. या वाळव्यांचं तर मला कवतुकच वाटतं. हे सद्गृहस्थ व्यवसायानिमित्त दिल्लीला असतात, शनिवार-रविवार ऐरोलीच्या घरी कुटुंबापाशी येतात. आज शनिवार असुनही त्यातून वेळ काढून ते आम्हाला भेटायला दादरला आले होते. कुठे दिल्ली, कुठे ऐरोली आणि कुठे दादर..! ओढ असली की सर्व होतं ते असं. कवतुक प्रभाकर वाळव्यांच्या सौचं करायला हवं खरं तर. सात दिवसांनी भेटणाऱ्या नवऱ्याला उंडरायला मोकळं सोडणाऱ्या मिसेसचं कवतुक करायलाच हवं. नंतर कळलं की प्रभाकर वाळवेंनी त्यांच्या सर्वच कुटुंबाला दादरला पिक्चर आणि खाण्याचा बेत करून, मी होतो पुढे तुम्ही या मागून, असं सांगून ते सटकलेत आम्हाला भेटायला. मित्रांना भेटण्यासाठी पुरुष काय करतील त्याचा नेम नाही. शेवटी मेन विल बी मेनच..
मग चंदन विचारे, रोहन पवार, संकेत पाटकर आणि राहूल सावंत ही चौकडी आली. इरिडियम, पॅलॅडियम, प्लटिनम, रुथेनियम ही सर्व मूलद्रव्ये निसर्गात एकत्र सापडतात, तसे हे चौघे कधीही एकत्रच सापडतात. शेवटी माझे मित्र कवि संतोष खाड्ये आणि त्यांच्या सोबत त्यांचा तरुण चित्रकार मित्र मिथिलेश जाधव आले. मधेच माझी मैत्रिण चारू येऊन वातावरण प्रसन्न करून गेली. आता एकूण दहा जण झाले. आजच्या मिटींगला आलेला प्रत्येकजण हजार माणसांच्या तोडीचा होता (मला खरं तर ‘लाख माणसांच्या तोडीचा’ म्हणायचं होतं, पण ‘लाख’ ही संख्या आधीच बुक झाल्याने हजारावर थांबतो.). ‘ा हिशोबाने दहाहजारजण जमले. मिटींगला गर्दी होईल याचा अंदाज घेऊन मैदानात भेटण्याची कल्पना बरोबर होती. नतर कोणी येणार नाही असं लक्षात आलं आणि मैदानात खेळणाऱ्या मुलांच्या खेळात आपल्या दहाहजारी गर्दीने व्यत्यय नको म्हणून आम्ही आमचा मोर्चा ‘जिथे सागरा धरणी मिळते..’ अशा नजिकच्या नारळीबागेत हलवला.
चांगल्या गोष्टींचा प्रारंभ पंचमहाभुतांच्या साक्षीने करावा, म्हणजे तो चांगला सिद्ध होतो, ही आपली श्रद्धा. म्हणून नारळीबागेसमोर पंचमहाभुतांपैकी एक असलेल्या अथांग दर्याला साक्षी ठेवून आम्ही एकमेकांचा परिचय करून घेतला. आपापली आवड जाणून घेतली. किस्से कहाण्या सांगीतले. आपापल्या क्षेत्रातली माहिती दिली-घेतली. प्रभाकर वाळवे आणि नौशाद तर तेल क्षेत्रातले जाणकार, त्यांनी त्यांच्या क्षेत्रातल्यी गमती सांगीतल्या. नौशादने त्याच्या नर्मविनोदी शैलीत कोकणातील गावाकडील धर्म विरहीत जीवनाच्या गंमती सांगीतल्या. पंकज समेळांनी लेणी, वीरगळी, गधेगळी यांची माहिती दिली. संकेत, चंदन, रोहन, राहूल यांनी त्यांचे त्यांचे अनुभव सांगीतले. कविवर्य त्यांच माहिती काव्यमय भाषेत देत होते. एका तासासाठी भेटलेलो आम्ही, आमचे दोन तास कसे गेले तेच कळलं नाही. आम्ही प्रथमच भेटतोय हे खरंच वाटत नव्हतं, वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखंच वाटत होतं..
सोशल माध्यमातील जग खोटं असतं असं म्हणतात. पण मला वाटतं सोशल मिडीयावर आपण कसं वागतो, त्याप्रमाणे आपल्याला तेथील जग भेटतं. आज भेटलेलो आम्ही सोशल मिडीयावर भेटलो. एकमेकांच्या कामाची, तळमळीची खुण आम्हाला सोशल मिडीयावरच पटली. नाहीतरी प्रत्यऱ्क्षात भेटणारी माणसं का कमी खोटं वागतात..? पण हेतू आणि नियत शुद्ध असेल तर मग या जगात खोटं, आभासी असं काहीच नसतं असं मी समजतो. हेतू-नियत साफ असेल तर जे खोटं आहे, ते ही शुद्ध-पवित्र होऊनच समोर येतं..मनाच्या शुद्ध असण्यात प्रचंड ताकद असते, हे मी आज अनुभवलं..
धन्यवाद मित्रांनो..
—©️ नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply