जीवटराम भगवानदास तथा आचार्य कृपलानी यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी हैदराबाद (सिंध) येथे झाला.
आचार्य कृपलानी यांनी स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी अशी ओळख होती. त्यांना आचार्य कृपलानी असे म्हणत असत. त्यांचे वडील काका भगवान दास तहसीलदार होते. कृपलानी यांचे शिक्षण हैदराबाद तसेच मुंबईतील ‘विल्सन कॉलेज’ व पुण्यातील ‘फर्ग्युसन कॉलेज’ मधून झाले. शिक्षक म्हणून त्यांनी व्यावसायिक आयुष्याची सुरुवात केली. १९१२ ते १९१७ या काळात ते बिहारच्या मुझफ्फरपूर महाविद्यालयात इंग्रजी आणि इतिहासाचे प्राध्यापक होते. ते ‘गुजरात विद्यापीठ’चे प्राचार्यही होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी त्यांचा जवळचा संपर्क होता. कृपलानी जी गांधीजींच्या हरिजनाच्या उद्धारासाठी त्यांचे सतत सहयोगी म्हणून कार्यरत राहिले. १९२७ नंतर आचार्य कृपलानी यांचे आयुष्य स्वातंत्र्यलढ्यात आणि गांधींच्या सर्जनशील प्रवृत्ती पुढे नेण्यात व्यतीत झाले. खादी व ग्रामीण उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशात ‘गांधी आश्रम’ नावाची संस्था स्थापन केली. ते ‘ऑल इंडिया नॅशनल कॉंग्रेस’ चे सरचिटणीस आणि १९४६ सालच्या मेरठ कॉंग्रेसचे अध्यक्षही होते.
आचार्य कृपलानी यांनी १९६३ मध्ये पहिल्यांदा जवाहरलाल नेहरु सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा पहिला अविश्वास प्रस्ताव ठरला होता. हा प्रस्ताव ३४७ मतांनी फेटाळण्यात आला आणि नेहरु सरकारवर याचे परिणामदेखील झाले नव्हते. मात्र, पहिला प्रस्ताव म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली. त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी देशातील पहीली महिला मुख्य मंत्री होत्या. सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत.
आचार्य कृपलानी यांचे १९ मार्च १९८२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply