लहानपणी मला तुझ्या आजोळी नातेवाईक किती, असा प्रश्न विचारला की मी लगेच सांगायचे, पाच मामा, पाच मावश्या, मग सगळ्यांची नावं सांगायचे. मावश्यांची नावं सांगताना अक्का, ताई, शकू, शालू आणि जोशी असं सांगायचे. बाकी सगळ्यांची नावं घेऊन मी पुढे मावशी म्हणायचे आणि या मावशीला मात्र जोशी असं आडनाव घेऊन मावशी म्हणायचे. मोठी झाल्यावर म्हणजे कॉलेजला गेल्यावर कळलं, की ती माझ्या आईची सख्खी बहीण नाही, तर माझ्या एका मावशीची ऑफिसमधली मैत्रीण आहे, पण तोपर्यंत कधी कळलंच नाही आणि खरं तर जाणवलंच नाही. माझ्यासाठी ती माझी सख्खी मावशी आणि तिच्यासाठी मी सख्खी भाची. आमचं सारं घरच तिचं.
सख्खं सख्खं म्हणणाऱ्यांचं सख्य होत नाही, पटत नाही हे पाहताना ही मावशी नेहमी आठवते. म्हणावं तर नातं काहीच नाही आणि म्हटलं तर अगदी घट्ट, प्रेमाचं, आपलेपणाचं नातं. तिचा आम्हाला लळा आणि आमच्यासाठी तिचा जिव्हाळा! खरंच, काय म्हणायचं अशा नात्यांना? आणि एकदम एक शब्द, कुठे तरी वाचलेला आठवला – जिव्हाळ्याची बेटं! अशी कितीतरी हिरवीगार, सुंदर, टवटवीत जिव्हाळ्याची बेटं आपल्या रोजच्या जगण्यात असतात. नव्या जागेत नवा संसार सुरू केल्यावर शेजारच्या आजी आपलं जिव्हाळ्याचं बेट कधी बनतात कळत नाही. ‘पिंटूचा ताप वाढलाय, काय करू हो आजी?’ या प्रश्नाने सुरू झालेला संवाद, सुरू झालेलं नातं कधी फुलतं कळतच नाही. आई, सासूबाई यांच्याच वयाच्या शेजारच्या, आजी, पण कुठल्याही नात्याने बांधल्या न गेलेल्या कधी कधी नात्यांपेक्षाही अशा जिव्हाळ्याच्या नात्यांचा आधार अधिक वाटतो. नातं जवळचं असलं तरी जिव्हाळ्याचं असतंच असं नाही. नातेवाईक दूर असताना जवळ असतात ती ही जिव्हाळ्याची बेटंच! अशा नात्यांना बेट म्हणण्याचं कारण हेच, की आपल्या दूरच्या प्रवासात आपण बेटावर काही काळ थांबतो, विसावतो, सुखावतो आणि ताजेतवाने होऊन पुढचा मार्ग आक्रमतो. आलेल्याने बेटावर राहायला पाहिजे, थांबायला पाहिजे अशी सक्ती नाही. ही बेटं अपेक्षारहितच असतात.
एखादी मैत्रीण, एखादा मित्र, एखाद्या काकू-आजी, एखादे काका, एखादे सर, एखाद्या मॅडम आपल्या आयुष्यात येतात आणि जणू आपल्याला समजून घेणारी व्यक्ती हीच असं आपल्याला वाटायला लागतं. मनातले छोटे छोटे प्रश्न, शंका, अस्वस्थता, आनंद सारं त्यांना सांगावं, विचारावं असं वाटायला लागतं. त्यांचा सल्ला पटतो. त्यांची आवडनिवड आवडते. त्यांची विचार कवण्याची पद्धत भावते. इतकंच काय, पण त्यांचा ओरडाही चालतो. कारण आपण स्वतःहून त्यांना आपलं मानलेलं असतं. कोणाकडून तरी चालत आलेलं ते नातं नसतं. त्यात इगो, मानापमान, स्पर्धा काही काहीच नसतं आणि केवळ ते टिकवण्यासाठी टिकवायचं बंधनही नसतं. कधी समान आवडीनिवडींमुळे, कधी जुळणाऱ्या वैचारिक पातळीमुळे, कधी बौद्धिक उंचीमुळे, कधी भावनिक सामंजस्यामुळे हे बंध तयार होतात. हळूहळू दृढ व्हायला लागतात, पण ते तीही दृढ झाले, तरी नात्यातल्यासारखी निरगाठ बसण्याची शक्यता फार कमी असते. या जिव्हाळ्याच्या बेटांमुळे घरातली माणसं आपल्यापासून दुरावत नाहीयत ना, हा विचार होणं मात्र फार गरजेचं. घरातल्या नात्यांची वीण ढिली पडू न देता ही जिव्हाळ्याची नाती सांभाळता येणं हे नक्कीच कौशल्याचं काम. नाही तर घरातल्या, नात्यातल्या आजारी, वृद्ध मंडळींची चौकशीही करायची नाही आणि जिव्हाळ्याच्या बेटावरच्या आजींसाठी मात्र त्यांच्या पोटच्या पोरापेक्षा जास्त सेवा करायची, हे वागणं दोन्हीही घरांत खटकणारच.
त्यातही या जिव्हाळ्याच्या नात्यांत दोन्ही स्त्रिया, दोन्ही पुरुष असतील तर फारसं कोणाला खटकत नाही, पण या बेटावर एक स्त्री एक पुरुष असेल तर मात्र भुवया वक्र व्हायला लागतात. अशी जिव्हाळ्याची नाती कितीही स्वच्छ, निर्मळ असली, तरी अवतीभवतीची माणसं अशी नाती निर्मळपणे स्वीकारतातच असं नाही.
स्त्री-पुरुष या भेदाच्या पलीकडे जाऊन भावना, विचार, बुद्धी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आवडीनिवडी या पातळ्यांवर दोन व्यक्तींची फ्रिक्वेन्सी जुळू शकते. असी फ्रिक्वेन्सी जुळली तर व्यक्तिविकासच घडतो.
या जिव्हाळ्याच्या बेटाचं आपल्याकडचं पौरणिक काळातलं फार सुंदर उदाहरण म्हणजे द्रौपदी आणि कृष्ण. नात्याने तर दोघे बांधलेले आहेतच, पण त्याहीपेक्षा सखा या नात्याने ते एकमेकांना पूरक आहेत. असं सख्यत्व, सहत्व नेहमीच आनंददायी असतं आणि नात्यापलीकडे घेऊन जाणारं असतं.
मागे फ्रेंडशिप डें होता. मैत्रीवरचे किती तरी सुंदर सुंदर मेसेजेस सकाळपासून येत होते, पण तरीही आठवत होत होती ती मैत्रीची व्याख्या, माझे वादक मित्र अजित वैद्य यांनी केलेली.
एकदा त्यांनी मला विचारलं, मित्र आणि दोस्त यात काय फरक आहे? मी म्हटलं, एक संस्कृत शब्द एक हिंदी. ते झटकन म्हणाले, छे, छे! त्यापेक्षाही एक वेगळा फरक मला जाणवतो. म्हणजे गंमत गं… दोस्त म्हणजे जे अजूनही दोन स्तरावर आहेत आणि मित्र म्हणजे जो ‘मी’ला त्रयस्थ नाही तो! वा! गमतीशीर पण तरीही पटणारी व्याख्या…
ही व्याख्या उधार घेऊन म्हणता येईल, की समोरच्या व्यक्तीच्या परिघात नात्याच्या अधिकाराने हस्तक्षेप न करताही, दूर असूनही जे त्रयस्थ नसतं ते खरंखुरं जिव्हाळ्याचं बेट!
– धनश्री लेले
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply