नवीन लेखन...

ज्ञानपीठ पुरस्कार

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो.
हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा पुरस्कार देण्याचे ठरवले. २२ मे १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा रमा जैन यांनी १६ सप्टेंबर १९६१ या दिवशी संस्थेच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्काराबाबतचा ठराव मांडला. या पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यासाठी २ एप्रिल १९६२ या दिवशी दिल्लीत देशभरातून ३०० विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. या विद्वानांचे दोन सत्रांत संमेलन झाले. सत्रांचे अध्य्क्षपद डॉ. वी. राघवन आणि डॉ. भगवतीचरण वर्मा यांच्याकडे होते. सूत्रसंचालन डॉ. धर्मवीर भारती यांनी केले. या संमेलनाला काका कालेलकर, हरेकृष्ण मेहताब, निसीम इझिकेल, डॉ. सुनीति कुमार चॅटर्जी, डॉ. मुल्कराज आनंद, सुरेंद्र मोहंती, देवेश दास, सियारामशरण गुप्त, रामधारी सिंह दिनकर, उदयशंकर भट्ट, जगदीशचंद्र माथुर, डॉ. नगेन्द्र, डॉ. बी.आर. बेंद्रे, जैनेन्द्र कुमार, मन्मथनाथ गुप्त, लक्ष्मीचंद्र जैन यांसारखे विद्वान हजर होते. या संमेलनातून तयार झालेली पुरस्काराची संपूर्ण योजना डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली व निवडसमितीचे प्रमुखपदही स्वीकारले पण १९६३ साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर ही जबाबदारी काकासाहेब कालेलकर व डॉ. संपूर्णानंद यांच्याकडे आली.

२९ डिसेंबर १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो. ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला असेल, त्याच्या पुढील तीन वर्षे त्या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही.

सुरुवातीला एक लाख, नंतर दीड लाख, नंतर पाच लाख, सात लाख त्यानंतर आता अकरा लाख रुपये एवढी रक्कम पुरस्कार विजेत्याला दिली जाते. काहीवेळा एका ऐवजी दोन साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड होते त्यावेळी ही रक्कम विभागून दिली जाते.

१९६७ साली गुजराती व कानडी, १९७३ साली उडिया व कानडी तसेच २००८ साली कोकणी आणि संस्कृत अशा दोन भाषांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले होते. भारतातील विद्यापीठे, त्यांचे भाषाप्रमुख, अन्य शिक्षणसंस्थांचे प्रमुख, विख्यात साहित्यिक, समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ अशा सर्वांना आपापल्या मातृभाषेतील साहित्यकृतीची शिफारस करण्याची विनंती करण्यात येते. ज्ञानपीठ पुरस्काराच्या पहिल्या निवडसमितीवर सातपेक्षा कमी व अकरापेक्षा जास्त मान्यवर असू नयेत असे धोरण ठरविण्यात आलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नावाची छाननी करण्यासाठी प्रत्येक भाषेची तीन सदस्यांची एक समिती असते. तिला एल.ए.सी. म्हणजेच लोकल ॲ‍डव्हायझरी कमिटी म्हणतात. ही समिती आपल्या भाषेतील एका समर्थ साहित्यिकाच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ व्यवस्थापनाला करते. नंतर मध्यवर्ती निवड समितीत एकाच साहित्यिकाच्या ग्रंथाची निवड केली जाते.

ज्ञानपीठ पुरस्कारात ‘पुरस्कार-पत्र’, ‘वाग्देवीची प्रतिमा’ आणि ‘अकरा लाख रुपयांचा धनादेश’ यांचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने १३०५ साली केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

१९७४ साली वि. स. खांडेकर, १९८७ साली वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि २००३ साली विंदा करंदीकर व २०१४ साली ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकांचा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

आजवर भारतीय भाषांमधीलच साहित्यिकांना ज्ञानपीठ दिले जात होते. तीन वर्षांपूर्वी ज्ञानपीठसाठी भारतीय इंग्रजी साहित्याचाही विचार होऊ लागला आणि या वर्षी ५४ वा ज्ञानपीठ पुरस्कार इंग्रजी कादंबरीकार अमिताव घोष यांना जाहीर झाला आहे.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..